पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे जागतिक शाश्वत विकास परिषद 2018 चे उद्घाटन करणार आहेत. ऊर्जा आणि संसाधने संस्थेचे (टेरी) जागतिक शाश्वत विकास परिषद हे महत्त्वाकांक्षी व्यासपीठ आहे. शाश्वत विकास, ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रातील जागतिक नेते आणि विचारवंत यानिमित्त व्यासपीठावर येणार आहेत.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदलमंत्री डॉ. हर्ष वर्धन, उद्योग आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, गृहनिर्माण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) हरदीप पुरी, नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्यासह प्रमुख राजकीय नेते या परिषदेत सहभागी होणार आहेत.
यावर्षी या परिषदेची संकल्पना ‘लवचिक पृथ्वीसाठी भागीदारी’ आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विकसनशील देशांना सामोरे जावे लागत असलेल्या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी कृती आराखडा या परिषदेत तयार केला जाणार आहे. जमिनीचा पोत सुधारणे, शहरांना कचरामुक्त बनवण्यासाठी प्रभावी कचरा व्यवस्थापन यंत्रणा, वायू प्रदूषण कमी करणे, संसाधन आणि ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे, स्वच्छ ऊर्जेचा वापर आणि हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी वित्तीय यंत्रणा उभारणे आदी विविध मुद्यांवर या परिषदेत चर्चा केली जाणार आहे.
‘ग्रीनोव्हेशन’ प्रदर्शनात शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रगतीचे दर्शन घडणार आहे.
जगभरातील धोरणकर्ते, संशोधक, विचारवंत, राजकीय धुरिण यांच्यासह दोन हजारांहून अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होण्याची शक्यता आहे. पूर्ण सत्रांमध्ये प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वक्ते ऊर्जा आणि संसाधनांचा प्रभावी वापर करण्याच्या उपाययोजना तसेच वायू आणि जलप्रदूषण कमी करण्यासह विकवध मुद्यांवर मार्गदर्शन करतील. संकल्पनेवर आधारित चर्चासत्रांमध्ये कार्बन मार्केट आणि मूल्य निर्धारण, शाश्वत वाहतूक व्यवस्था लवचिक शहरे, सौर ऊर्जा आदी मुद्यांवर चर्चा होईल. द एनर्जी ॲण्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटने (टेरी) 15, 16, 17 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत जागतिक शाश्वत विकास परिषद आयोजित केली आहे.