पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 9 नोव्हेंबर 2019 रोजी पंजाबमधल्या गुरुदासपूर येथील डेरा बाबा नानक येथे कर्तारपूर कॉरिडॉरच्या एकात्मिक तपास नाक्याचे उद्घाटन करणार आहेत.
तत्पूर्वी पंतप्रधान सुलतानपूर-लोधी येथे बेर साहिब गुरुद्वारात प्रार्थना करतील.
त्यानंतर पंतप्रधान डेरा बाबा नानक येथे कार्यक्रमात सहभागी होतील.
एकात्मिक तपासनाक्याच्या उद्घाटनामुळे पाकिस्तानातल्या कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या भारतीय यात्रेकरुंची सोय होणार आहे.
डेरा बाबा नानक येथे आंतरराष्ट्रीय सीमेलगत झिरो पॉइंट येथे कर्तारपूर साहिब कॉरिडॉरच्या परिचालनासाठी भारताने पाकिस्तानबरोबर 24 ऑक्टोबर 2019 रोजी एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
गुरुनानक देवजी यांची 550 वी जयंती देशभरात आणि जगभरात भव्य आणि दिमाखदार पद्धतीने साजरी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 22 नोव्हेंबर 2018 रोजी एक प्रस्ताव मंजूर केला होता.
भारतातल्या यात्रेकरुंना वर्षभरात कधीही कर्तारपूर गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देता यावी यासाठी डेरा बाबा नानक पासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत कर्तारपूर साहिब कॉरिडॉरच्या बांधकामाला आणि विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
यात्रेकरुंच्या सुविधेसाठी करण्यात आलेल्या तरतूदी-
अमृतसर येथून डेरा बाबा नानकला जोडणाऱ्या 4.2 किलोमीटर चौपदरी गुरुदासपूर महामार्गाच्या बांधकामासाठी 120 कोटी रुपये खर्च
15 एकर भूखंडावर यद्ययावत प्रवासी टर्मिनल इमारत. ही संपूर्ण वातानुकूलित इमारत असून विमानतळाप्रमाणे येथे दिवसाला 5,000 यात्रेकरुंसाठी 50 इमिग्रेशन काउंटर उभारण्यात आले आहेत.
मुख्य इमारतीमधले प्रसाधन गृह, लहान मुलांसाठी सुविधा, प्रथमोपचार वैद्यकीय सुविधा, प्रार्थनेसाठी स्वतंत्र कक्ष, किऑस्क, खाद्यपदार्थ इ. सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सीसीटीव्ही देखत तसेच जनतेसाठी उद्घोषणा व्यवस्थांसह चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेवर 300 फूट राष्ट्रीय स्मारक ध्वज देखील फडकवण्यात आला आहे.
पाकिस्तानबरोबर 24 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या करारामध्ये कर्तारपूर साहिब कॉरिडॉरच्या परिचलनासाठी अधिकृत रुपरेषा आखण्यात आली आहे.
कराराची ठळक वैशिष्ट्ये:-
सर्व धर्म आणि पंथाचे आणि भारतीय वंशाचे यात्रेकरु या कॉरिडॉरचा वापर करु शकतील.
हा प्रवा व्हिसामुक्त असेल.
यात्रेकरुंना केवळ वैध पारपत्र जवळ ठेवावे लागेल.
भारतीय वंशाच्या व्यक्तींनी त्यांच्या देशाच्या पारपत्रासह ओसीआय कार्ड ठेवणे आवश्यक आहे.
हा कॉरिडॉर सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालू राहील.
सकाळी प्रवास करणाऱ्या यात्रेकरुंना त्याचदिवशी परत यावे लागेल.
हा कॉरिडॉर काही अधिसूचित दिवस वगळता वर्षभर सुरु राहील, याबाबत पुर्व सूचना दिली जाईल.
यात्रेकरुंना वैयक्तिकरित्या किंवा गटाने प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध आहे तसेच पायी प्रवास देखील करता येईल.
प्रवासाच्या तारखेपूर्वी भारत पाकिस्तानकडे यात्रेकरुंची यादी पाठवेल. प्रवासाच्या तारखेपूर्वी चार दिवस यात्रेकरुंना कळवले जाईल.
लंगर आणि प्रसाद वितरणासाठी पुरेशी तरतूद करण्यात आल्याचे आश्वासन पाकिस्तानकडून भारताला करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी पोर्टल:-
कुठल्याही दिवशी प्रवास करण्यासाठी यात्रेकरुंनी prakashpurb550.mha.gov.in या पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करणे गरजेचे आहे. प्रवासाच्या तीन ते चार दिवस अगोदर यात्रेकरुंना नोंदणीबाबत एसएमएस किंवा ई-मेल द्वारे कळवले जाईल. इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन देखील तयार केले जाईल. प्रवासी टर्मिनल इमारतीत दाखल होणाऱ्या यात्रेकरुंकडे पारपत्रासह इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन असणे गरजेचे आहे.