उत्तर प्रदेशातल्या वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 22 जानेवारी 2019 ला 15 व्या प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे उद्घाटन करतील.
वाराणसी येथे 21 ते 23 जानेवारी 2019 दरम्यान प्रथमच तीन दिवसांची प्रदीर्घ परिषदआयोजित करण्यात आली आहे. 2019 च्या या परिषदेची संकल्पना ‘नवभारताच्या उभारणीत भारतीय समुदायाची भूमिका’ ही आहे.
कुंभमेळा आणि प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्याच्या बहुतांश जणांच्या भावनांचा सन्मान ठेवून यंदा 15वी प्रवासी भारतीय दिवस (प्रभादि) परिषद 21 ते 23 जानेवारी 2019 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. परिषदेनंतर सहभागी 24 जानेवारीला कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला भेट देतील. त्यानंतर 25 जानेवारीला ते दिल्लीसाठी प्रयाण करतील आणि 26 जानेवारी 2019 ला नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला उपस्थित राहतील.
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनॉथ प्रभादि परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. नॉर्वेतील संसदेचे सदस्य हिमांशू गुलाटी विशेष अतिथी म्हणून तर न्यूझीलंडच्या संसदेचे सदस्य कंवलजित सिंग बक्षी 15व्या प्रभादिचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
प्रमुख कार्यक्रम :-
21 जानेवारी 2019 – युवा प्रवासी भारतीय दिवस. भारतीय समुदायाच्या युवा पिढीला नवभारत उपक्रमांमध्ये सहभागी करुन घेण्याकरिता हा कार्यक्रम संधी उपलब्ध करुन देईल.
22 जानेवारी 2019 – पंतप्रधानांच्या हस्ते मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनॉथ यांच्या उपस्थितीत प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे उद्घाटन
23 जानेवारी 2019 – समारोप सोहळा आणि भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार
इतरही विविध कार्यक्रमांचे आयोजन. दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
प्रवासी भारतीय दिनाबाबत :-
प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याचा निर्णय माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतला होता.
पहिला प्रभादि नवी दिल्ली येथे 9 जानेवारी 2003 रोजी साजरा करण्यात आला. 1915 मध्ये याच दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरुन भारतात परतले होते. त्यामुळे अभादि साजरा करण्यासाठी 9 जानेवारी हा दिवस निवडण्यात आला.
अभादि आता दोन वर्षातून एकदा साजरा करण्यात येतो. परदेशात राहणाऱ्या भारतीयांना आपल्या मुळांशी पुन्हा जोडण्याची आणि सरकारसह काम करण्याची संधी यानिमित्ताने मिळते. भारतात आणि परदेशात विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या निवडक प्रवासी भारतीयांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने परिषदेदरम्यान सन्मानित करण्यात येते.
कर्नाटकातल्या बंगळुरु येथे 7 ते 9 जानेवारी 2019 दरम्यान आयोजित 14 व्या अभादिचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. भारतीय समुदाय भारतीय संस्कृतीचे आणि मूल्यांचे प्रतिनिधित्व करतो आणि आपल्या योगदानासाठी जगभरात त्यांचा आदर केला जातो, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी आपल्या भाषणात व्यक्त केले होते. परदेशातील भारतीय समुदायासोबत सातत्याने संपर्कात राहायला सरकारचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले होते.