पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील ऐतिहासिक कोसी रेल महासेतू या विशाल पुलाचे 18 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी बारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रार्पण करणार आहेत.
याशिवाय बिहार राज्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी 12 रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन देखील पंतप्रधान करणार आहेत. यामध्ये किऊल नदीवरील एक नवा पूल, दोन नवे रेल्वे मार्ग, पाच विद्युतीकरण प्रकल्प, एक विद्युत लोकोमोटिव शेड आणि बरह- बख्तियारपूर दरम्यान तिसऱ्या मार्गाच्या प्रकल्पाचा समावेश आहे.
कोसी रेल महासेतूचे राष्ट्रार्पण म्हणजे बिहार आणि ईशान्य भागाला जोडणाऱ्या संपूर्ण प्रदेशाच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचा क्षण असणार आहे.
1887 मध्ये निरमाली आणि भापतियाही दरम्यान मीटर गेज मार्ग सुरू करण्यात आला होता. 1934 मध्ये आलेला महापूर आणि इंडो नेपाळ भूकंप यामुळे हा रेल्वेमार्ग वाहून गेला आणि त्यानंतर कोसी नदीच्या प्रवाह बदलण्याच्या प्रवृत्तीमुळे बराच काळ हा रेल्वेमार्ग पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न झाले नाहीत.
2003-04 मध्ये भारत सरकारने कोसी मेगा ब्रिज प्रकल्प मंजूर केला. कोसी रेल्वे महासेतू हा 1.9 किलोमीटर लांबीचा पूल असून त्याच्या निर्मितीसाठी 516 कोटी रुपये खर्च आला आहे. भारत-नेपाळ सीमेजवळ असलेला हा पूल संरक्षणाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे. कोविड महामारीच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आणि याच्या पूर्णत्वामध्ये स्थलांतरित मजुरांनी देखील योगदान दिले.
या प्रकल्पाच्या लोकार्पणामुळे 86 वर्षांचे जुने स्वप्न आणि या प्रदेशातील लोकांची दीर्घ प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. महासेतूच्या लोकार्पणाबरोबरच पंतप्रधान सहरसा- आसनपूर कुफा या डेमो ट्रेनला सुपौल रेल्वे स्थानकावरून झेंडा दाखवून रवाना करतील. एकदा नियमित रेल्वे सेवा सुरू झाली की ती सुपौल, अररिया आणि सहरसा या जिल्ह्यांसाठी विशेष लाभदायक सेवा ठरणार आहे. तसेच कोलकाता, दिल्ली आणि मुंबईच्या दिशेचा लांब पल्ल्याचा प्रवास देखील या भागातील लोकांसाठी सोपा होणार आहे.
हाजीपूर-घोसावर- वैशाली आणि इस्लामपूर- नटेशर या दोन नव्या रेल्वे प्रकल्पांचे देखील पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. कर्नावती- बख्तियारपूर लिंक बायपास आणि बरह- बख्तियारपूर दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे देखील ते उद्घाटन करतील.
मुझफ्फरपूर-सीतामढी, कटीहार-न्यू जलपायगुडी, समस्तीपूर-दरभंगा-जयनगर,समस्तीपूर- खगरिया, भागलपूर- शिवनारायणपूर सेक्शनच्या रेल्वे विद्युतीकरण प्रकल्पाचे देखील पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत.