देशातल्या पहिल्या विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा, ‘खेलो इंडिया’चे उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. ओदिशाची राजधानी भुवनेश्वर येथे 22 फेब्रुवारी ते 1 मार्च 2020 या कालावधीत या स्पर्धा होतील. केंद्र सरकार आणि ओदिशा सरकार ते संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
देशात तळागाळापर्यंत क्रीडा संस्कृती रुजावी आणि छोट्या भागातल्या शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘खेलो इंडिया’ ही राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेअंतर्गत, सर्व राज्यांमध्ये जवळपास सर्वच क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा होतात.
याच धर्तीवर यंदापासून विद्यापीठ स्तरावर या स्पर्धा भरवल्या जात आहेत. विद्यापीठ स्तरावर आयोजित केली जाणारी ही देशातील सर्वात मोठी स्पर्धा असून त्यात 150 विद्यापीठांमधले 3500 खेळाडू सहभागी होतील.
या स्पर्धेत तिरंदाजी, ॲथलेटिक्स, मुष्टीयुद्ध, अडथळ्यांची शर्यत, ज्युडो, जलतरण, भारोत्तोलन, कुस्ती, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फूटबॉल, हॉकी, टेबल टेनिस, टेनिस, व्हॉलिबॉल, रगबी आणि कबड्डी अशा 17 खेळांच्या स्पर्धा होणार आहे.