राष्ट्रीय शिक्षण धोरण – 2020 (एनईपी – 2020) अंतर्गत “21 व्या शतकातील शालेय शिक्षण” बैठकीत 11 सप्टेंबर 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होईल.
शिक्षण मंत्रालयाच्या वतीने शिक्षक पर्वचा एक भाग म्हणून 10 आणि 11 सप्टेंबर रोजी दोन दिवसांची बैठक आयोजित करण्यात येत आहे.
अलिकडेच 7 ऑगस्ट 2020 रोजी एनईपी – 2020 अंतर्गत `उच्च शिक्षणातील परिवर्तन सुधारणांवर परिषदे`च्या उद्घाटन समारंभाला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले होते.
मोदी यांनी 7 सप्टेंबर रोजी एनईपी – 2020 वरील राज्यपालांच्या बैठकीलाही संबोधित केले होते.
एनईपी – 2020 हे 21 व्या शतकातील पहिले शिक्षण धोरण आहे जे या पूर्वीच्या 1986 मधील राष्ट्रीय शिक्षण धोरणानंतर 34 वर्षांनी घोषित करण्यात आले आहे. शाळा आणि उच्च शिक्षण स्तर अशा दोन्हीतील महत्त्वाच्या सुधारणांच्या दिशेने एनईपी – 2020 आहे.
भारताला समान आणि उल्लेखनीय ज्ञानी समाज बनविण्याचे नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. यात भारत – केंद्रित शिक्षण प्रणालीची कल्पना आहे जी भारताला जागतिक महासत्तेत रूपांतरित करण्यासाठी थेट हातभार लावेल .
एनईपी – 2020 ने देशातील शालेय शिक्षणामध्ये व्यापक स्वरूपात सुधारणा आणल्या आहेत. शालेय स्तरावर 8 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन (ईसीसीई) सार्वत्रिकीकरण करण्यावर भर दिला जात आहे; 10+2 रचनेचा शालेय अभ्यासक्रम आता 5+3+3+4 अशा अभ्यासक्रम रचनेत बदलण्यात आला आहे, त्याशिवाय यामध्ये 21 व्या शतकाच्या कौशल्यांमध्ये अभ्यासक्रम समाविष्ट करणे, गणितीय विचार आणि वैज्ञानिक स्वभाव, शालेय शिक्षणासाठी नवीन व्यापक राष्ट्रीय अभ्यासक्रमाची रचना विकसित करणे, शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके, मूल्यांकन सुधारणा आणि बालकाचे सर्वंकष समग्र प्रगतीपुस्तक, आणि 6 व्या वर्गापासून व्यावसायिक अभ्यासक्रमाचा समावेश असेल.
एनईपी मध्ये उद्दिष्टित व्यापक परिवर्तन देशाच्या शिक्षण प्रणालीमध्ये एक उल्लेखनीय बदल घडवून आणेल आणि माननीय पंतप्रधानांच्या कल्पनेनुसार नवीन आत्मनिर्भर भारतासाठी सक्षम आणि पुनर्रचित शैक्षणिक परिसंस्था तयार केली जाईल.
नवीन शैक्षणिक धोरण 2020 पुढे नेण्यासाठी आणि शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी 8 सप्टेंबर – 25 सप्टेंबर 2020 या काळात शिक्षक पर्व साजरे केले जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 विषयी संपूर्ण देशभरात वैविध्यपूर्ण विषयांवर अनेकविध वेबिनार, व्हर्च्युअल परिषदा, आणि बैठका आयोजित केल्या जाणार आहेत.