पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून १६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी अकरा वाजता महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकास कामांचा पायाभरणी समारंभ होणार आहे. उत्तर प्रदेशमधील बहराइचमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात महाराजा सुहेलदेव यांची जयंती साजरी होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील या समारंभास उपस्थित राहणार आहेत.
या प्रकल्पात महाराजा सुहेलदेव यांचा अश्वारूढ पुतळा बसविणे, तसेच उपाहारगृह, अतिथी कक्ष, आणि लहान मुलांसाठी उद्यान यासारख्या विविध पर्यटन सुविधांचा विकास करणे यांचा समावेश आहे.
महाराजा सुहेलदेव यांची देशभक्ती आणि सेवा ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि या स्मारकाच्या विकासामुळे महाराजा सुहेलदेव यांच्या वीर गाथेबद्दल देशाला अधिक चांगल्या प्रकारे परिचय होऊ शकणार आहे. या क्षेत्राची पर्यटन क्षमता देखील यामुळे वाढण्यास मदत होणार आहे.