पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आसाममधील तेजपूर विद्यापीठाच्या 18 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करतील. आसामचे राज्यपाल प्रा. जगदीश मुखी, केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात वर्ष 2020 मध्ये उत्तीर्ण झालेल्या 1218 विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रदान करण्यात येणार आहे. पदवी प्राप्त करणाऱ्यांमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर कार्यक्रमांच्या 48 अव्वल विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान केली जातील.
दीक्षांत समारंभाचे आयोजन कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून संमिश्र पद्धतीने केले जाईल, ज्याद्वारे केवळ पीएच.डी. विद्वान आणि सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थी त्यांची पदवी आणि सुवर्ण पदके व्यक्तिशः उपस्थित राहून स्वीकारतील आणि उर्वरित प्राप्तकर्त्यांना आभासी पद्धतीने पदवी आणि पदविका प्रदान केले जातील.