सरकारचे प्रमुख या नात्याने 23 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळाचे त्यांनी स्मरण केले आणि ते म्हणाले की त्या काळात समाजाचे सर्व घटक समृद्ध होतील याची सुनिश्चिती करत गुजरात राज्य ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेचे झळाळते उदाहरण म्हणून उदयाला आले. गेल्या दशकातील देशाच्या प्रगतीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की भारताच्या विकासात्मक प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर आपल्या देशाकडे अतिशय आशेने पाहिले जाईल याची सुनिश्चिती झाली आहे. आपण देशहितासाठी अथकपणे काम करत राहणार असून विकसित भारताचे सामुहिक उद्दिष्ट साध्य होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली.
एक्स मंचावरील संदेशात पंतप्रधान लिहितात:
“#23वर्षे सेवेची…
सरकारचा प्रमुख या नात्याने मी 23 वर्षांचा काळ पूर्ण केल्यानिमित्त मला आशीर्वाद आणि शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. दिनांक 7 ऑक्टोबर 2001 रोजी मी सर्वप्रथम गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर राज्य प्रशासनाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवणे हा माझ्या @BJP4India या पक्षाचा मोठेपणा होता.
“मी जेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली तेव्हा, गुजरात राज्यासमोर- 2001 मध्ये झालेला कच्छचा भूकंप, त्यापूर्वी आलेले भयंकर चक्रीवादळ, तीव्र दुष्काळ आणि लुटालूट, जातीयवाद आणि वर्णभेदासारख्या बाबींसह काँग्रेस पक्षाने अनेक दशके केलेल्या गैरकारभाराचा वारसा – अशी असंख्य आव्हाने उभी होती. जनशक्तीच्या सामर्थ्यासह आम्ही गुजरातची पुनर्बांधणी केली आणि या राज्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवले. हे राज्य पारंपारिकरीत्या कृषी क्षेत्रासाठी ओळखले जात नसूनही आम्ही कृषी क्षेत्रात या राज्याला आघाडीवर नेले.”
“माझ्या 13 वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत, गुजरात हे ‘सबका साथ, सबका विकास’चे एक झळाळते उदाहरण म्हणून उदयास आले असून या राज्याने समाजातील सर्व घटकांसाठी समृद्धी सुनिश्चित केली. 2014 मध्ये, भारतातील जनतेने माझ्या पक्षाला विक्रमी जनादेश देऊन आशीर्वाद दिला, आणि मला पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी दिली. तो एक ऐतिहासिक क्षण होता, कारण 30 वर्षांत पहिल्यांदाच एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले होते .”
“गेल्या दशकात, आपल्या देशासमोर उभ्या असलेल्या अनेक आव्हानांना आपण तोंड देऊ शकलो आहोत. 25 कोटींहून अधिक लोकांची गरिबीच्या जोखडातून सुटका झाली आहे. भारत ही पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि यामुळे आपल्या सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप क्षेत्र आणि इतर क्षेत्रांना मदत झाली आहे. आपले कष्टकरी शेतकरी, नारी शक्ती, युवा शक्ती आणि गरीब तसेच समाजातील उपेक्षित घटकांसाठी समृद्धीचे नवीन मार्ग खुले झाले आहेत.”
“भारताच्या विकासाच्या वाटचालीने हे सुनिश्चित केले आहे की जागतिक स्तरावर आपल्या देशाकडे अत्यंत आशावादाने पाहिले जात आहे. जग आपल्यसोबत काम करायला, आपल्या लोकांमध्ये गुंतवणूक करायला आणि आपल्या यशाचा भागीदार बनण्यासाठी उत्सुक आहे. त्याच वेळी, हवामान बदल, आरोग्यसेवा सुधारणा, शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करणे आणि अशा बऱ्याच जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी भारत मोठ्या प्रमाणावर काम करत आहे.”
“गेल्या काही वर्षांत बरेच काही साध्य झाले आहे पण अजूनही बरेच काही करायचे बाकी आहे. या 23 वर्षांतील अनुभवातून मला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर प्रभाव पाडणारे अग्रणी उपक्रम राबवता आले. मी माझ्या देशबांधवांना आश्वस्त करतो की मी लोकांच्या सेवेसाठी आणखी जोमाने अथकपणे काम करत राहीन. विकसित भारताचे आपले सामूहिक उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.”
#23YearsOfSeva…
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2024
A heartfelt gratitude to everyone who has sent their blessings and good wishes as I complete 23 years as the head of a government. It was on October 7, 2001, that I took on the responsibility of serving as the Chief Minister of Gujarat. It was the greatness of…