पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज नवी दिल्ली येथून जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. डॉ. सिंग यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणे ही साधारण कामगिरी नसून फाळणीनंतर भारतात आल्यानंतर बरेच काही गमावले असले तरीही डॉ. सिंग यांनी यश प्राप्त केले, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. डॉ. सिंह यांचे जीवन भावी पिढ्यांना प्रतिकूलतेवर मात करून त्यातून कसा मार्ग काढता येतो आणि मोठ्या उंचीवर कसे पोहोचता येते हे शिकवते, असेही त्यांनी नमूद केले आहे.
एक ऋजू व्यक्ती, बुद्धिमान अर्थतज्ज्ञ आणि सुधारणांसाठी समर्पितपणे योगदान देणारा नेता म्हणून डॉ, सिंग यांचे नाव कायम स्मरणात राहील असे स्पष्ट करत अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ. सिंग यांनी विविध स्तरांवर भारत सरकारसाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले आहे, आव्हानात्मक परिस्थितीत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून डॉ. सिंग यांनी बजावलेल्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे
माजी पंतप्रधान आणि भारतरत्न पी.व्ही. नरसिंह राव, यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून. डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर येण्याचा मार्ग दाखविला आणि नव्या आर्थिक वाटेवर नेले, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. डॉ. सिंग यांनी पंतप्रधान म्हणून देशाच्या विकासात आणि प्रगतीमध्ये दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, याचाही त्यांनी प्रकर्षाने उल्लेख केला आहे. जनतेशी आणि देशाच्या विकासाप्रती असलेल्या डॉ. सिंग यांच्या बांधिलकीबद्दल कायमच त्यांच्याकडे आदराने पाहिले गेल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.
डॉ. सिंग यांचे जीवन त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि साधेपणाचे प्रतिबिंब होते असेही मोदींनी अधोरेखित केले आहे. डॉ. सिंग यांची संसदीय कारकीर्द नम्रता, सौम्यता आणि बुद्धीमत्ता या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे उल्लेखनीय ठरली, याचाही पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला डॉ. सिंग यांचा राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपण्याच्या अखेरच्या काळाची आठवण करून देत त्याकाळात डॉ. सिंग यांनी समर्पितपणे केलेले काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले आहे. शारीरिक आव्हाने असूनही व्हीलचेअरवर बसून महत्त्वाच्या सत्रांना उपस्थित राहून डॉ. सिंग आपले संसदीय कर्तव्ये पार पाडली.
जगातील प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण घेऊनही आणि उच्च सरकारी पदे भूषवूनही डॉ. सिंग यांना त्यांच्या सामान्य पार्श्वभूमीच्या मूल्यांचा कधीही विसर पडला नव्हता. ते पुढे म्हणतात की, डॉ. सिंग नेहमीच पक्षीय राजकारणाच्या पलीकडे होते, सर्व पक्षांच्या व्यक्तींशी संपर्क ठेवून होते आणि ते सर्वांना सहज उपलब्ध होते. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आणि नंतर दिल्लीतही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर डॉ. सिंग यांच्या सोबत झालेल्या मनमोकळ्या चर्चांचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला आहे. डॉ. सिंग यांच्या कुटुंबीयांचे पंतप्रधान मोदी यांनी सांत्वन करत सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.