माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. या वर्षीच्या उन्हाळ्याचा विसर पडणे कठीण आहे. मात्र पावसाची वाट पाहिली जातेय. आज, मी आपल्याशी ही बातचित करत असताना रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. रमजानच्या पवित्र महिन्याच्या आगमनाप्रित्यर्थ मी भारतातील व विश्वभरातील लोकांना, विशेषत: मुस्लिम समुदायाला या पवित्र महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. रमजानमध्ये प्रार्थना, अध्यात्म आणि दानधर्म यांना खूप महत्त्व दिले जाते. आपण हिंदुस्तानी खूप भाग्यवान आहोत, की आपल्या पूर्वजांनी अशा परंपरा निर्माण केल्या आणि आज भारत या गोष्टीचा गर्व करू शकतो, आपण सव्वाशे कोटी देशावासी या गोष्टीचा गर्व करू शकतात की जगातले सर्व संप्रदाय भारतात आहेत. हा एक असा देश आहे जिथे ईश्वरावर विश्वास ठेवणारे लोकही आहेत आणि ईश्वराला नाकारणारे लोकही आहेत. मूर्तीपूजा करणारे लोकही आहेत आणि मूर्तीपूजेला विरोध करणारे लोकही आहेत. इथे प्रत्येक प्रकारची विचारधारा, प्रत्येक प्रकारची पूजापद्धती, प्रत्येक प्रकारची परंपरा इथे आहे. आपण एकमेकांसोबत जगण्याची कला आत्मसात केली आहे. आणि शेवटी धर्म असो, संप्रदाय असो, विचारधारा असो की परंपरा असो, या साऱ्या गोष्टी आपल्याला एकच संदेश देतात – शांती, एकता आणि सद्भावनेचा. रमजानचा हा पवित्र महिना शांती, एकता आणि सद्भावनेचा हा मार्ग पुढे नेण्याच्या कामी नक्कीच सहाय्यभूत ठरेल. मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो.
गेल्या वेळी जेव्हा मी 'मन की बात' सांगत होतो तेव्हा मी एक शब्द वापरला होता. विशेषत: तरुणांना मी सांगितले होते, की त्यांनी काहीतरी नवे करावे, comfort zone मधून बाहेर पडावे, नवे अनुभव घ्यावेत आणि आयुष्य अशा तऱ्हेने जगण्याचे, थोडी जोखिम पत्करण्याचे, संकटांना हाक घालण्याचे हेच तर वय असते. मला हे सांगायला खूप आनंद होतो आहे की बऱ्याच लोकांनी मला यावरील प्रतिक्रिया दिल्या. वैयक्तिक स्वरूपात मला आपल्या मनातली गोष्ट सांगण्याचा उत्साह सगळ्यांनी दाखवला. मला प्रत्येक गोष्ट तर वाचता आलेली नाही, प्रत्येकाचा संदेश ऐकता आलेला नाही, इतक्या भरपूर गोष्टी आल्या आहेत. पण या संदेशांवर वरवर नजर टाकल्यावर जे काही दिसले त्यानुसार काहींनी संगीत शिकण्याचा प्रयत्न केला आहे, कुणी नव्या वाद्यांवर हात बसवण्याचा प्रयत्न करतेय, काही लोक youtube चा वापर करून नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत, नवी भाषा शिकत आहेत. काही लोक पाककला शिकत आहेत, काही नृत्य शिकत आहेत, कुणी नाट्यशिक्षण घेत आहे. काही लोकांनी तर लिहिले आहे की आम्ही आता कविता लिहिणे सुरू केले आहे. निसर्गाला समजून घेणे, निसर्गासोबत जगणे यादृष्टीने काही लोक प्रयत्न करीत आहे. या गोष्टींचा मला खूपच आनंद झाला आहे. मी एक फोन कॉल तुम्हालाही ऐकवू इच्छितो.
"मी दीक्षा कात्याल बोलतेय. माझी वाचनाची सवय जवळजवळ सुटलीच होती म्हणूनच या सुट्ट्यांमध्ये मी वाचण्याचा निश्चय केला. जेव्हा मी स्वातंत्र्य लढ्याविषयी वाचायाला लागले तेव्हा मी अनुभवले की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किती संघर्ष करावा लागला आहे, किती बलिदान द्यावे लागले, किती स्वातंत्र्य सैनिकांनी तुरुंगात वर्षं कंठली आहेत. भगत सिंग, ज्यांनी कमी वयात खूप काही मिळवले त्यांच्यापासून मी खूप प्रेरित झाले. म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे की याविषयी तुम्ही नव्या पिढीला काही संदेश द्या."
मला आनंद वाटतो की तरुण पिढीला आपल्या इतिहासाविषयी, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांविषयी, या देशासाठी बलिदान देणाऱ्या लोकांविषयी जाणून घेण्यात रस आहे. अगणित महापुरुषांनी स्वातंत्र्यासाठी आपले तारुण्य तुरुंगात घालवले, अनेक तरुण फाशीच्या तख्तावर चढले. काय नाही झेलले त्यांनी आणि म्हणूनच तर आज आपण स्वतंत्र भारतामध्ये श्वास घेतोय. आपण एक गोष्ट पाहिली असेल की स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी तुरुंगात काळ कंठला त्यांनी लिखाणाचे, अध्ययनाचे मोठे काम केले आणि त्यांच्या लिखाणानेसुद्धा भारताच्या स्वातंत्र्याला बळ दिले.
बऱ्याच वर्षांपूर्वी मी अंदमान निकोबारला गेलो होतो. तिथले सेल्युलर जेल बघायलाही गेलो होतो. आज वीर सावरकर यांची जयंती आहे. वीर सावरकरांनी तुरुंगामध्ये 'माझी जन्मठेप' हे पुस्तक लिहिले. ते कविता लिहायचे, भिंतींवर लिहायचे. छोट्याशा कोठडीत त्यांना बंद करण्यात आले होते. स्वातंत्र्याचे वेड घेतलेल्यांनी कशा यातना सोसल्या असतील. जेव्हा मी सावरकरांचे 'माझी जन्मठेप' हे पुस्तक वाचले तेव्हा त्यातूनच मला सेल्युलर जेल पाहण्याची प्रेरणा मिळाली. तिथे एक ध्वनीप्रकाश कार्यक्रमही सादर केला जातो जो खूपच प्रेरणादायी आहे. हिंदुस्थानातले असे एकही राज्य नसेल, हिंदुस्तानातील एकही भाषासमूह असा नसेल ज्यातील कुणी न कुणी स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगत अंदमानच्या तुरुंगात, त्या सेल्युलर तुरुंगात आपले तारुण्य घालवले नसेल. प्रत्येक भाषा बोलणाऱ्या, प्रत्येक प्रांताच्या, प्रत्येक पिढीच्या लोकांनी या यातना सहन केल्या आहेत.
आज वीर सावरकर यांची जयंती आहे. मी देशाच्या तरुण पिढीला नक्की सांगेन की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्यासाठी लोकांनी कितीतरी यातना सोसल्या, कितीतरी कष्ट झेलले. आपण जाऊन सेल्युलर जेल पाहिलेत तर त्याला काळं पाणी का म्हणायचे हे समजते. तिथे जाऊनच ते समजते. तुम्हालाही संधी मिळाली तर जरूर तिथे जा. एकप्रकारे आपल्या स्वातंत्र्याच्या लढाईचे तीर्थक्षेत्र आहे ते. तिथे जरूर जायला हवे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 5 जून हा महिन्याचा पहिला सोमवार आहे. बाकी तर काही विशेष नाही, पण 5 जून हा एक विशेष दिवस आहे कारण हा दिवस 'विश्व पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो आणि या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने या दिनासाठी निश्चित केलेला विषय आहे – connecting people to nature, लोकांना निसर्गाशी जोडणे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर back to basics किंवा मूळाकडे परतणे आणि निसर्गाशी जोडून घेणे म्हणजे काय? तर माझ्या दृष्टीने याचा अर्थ आहे, स्वत:शी जोडले जाणे, आपले आपल्याशीच नाते जोडणे. निसर्गाशी जोडले जाण्याचा अर्थ आहे आपल्या ग्रहाचे अधिक चांगले संवर्धन करणे. आणि ही गोष्ट महात्मा गांधींपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने कोण सांगू शकेल? महात्मा गांधी अनेकदा म्हणायचे – one must care about a world one will not see.' आपण जे जग पहायला असणार नाही त्याचीही चिंता करणे, त्याचीही काळजी वाहणे हे आपले कर्तव्य आहे. आणि निसर्गाची एक ताकद असते, तुम्हीच कधीतरी हे अनुभवले असेल की खूप थकून घरी आला असाल आणि एक ग्लासभर पाणी तोंडावर मारले की कसे ताजेतवाने वाटते. खूप दमून आला असाल तर खोलीच्या खिडक्या उघडून टाका, दरवाजा उघडा, ताज्या हवेत श्वास घ्या. एक नवे चैतन्य मिळते. ज्या पंचमहाभूतांपासून आपले शरीर बनलेय त्या पंचमहाभूतांशी जेव्हा संपर्क येतो तेव्हा आपल्या शरीरात एक नवे चैतन्य जागे होते, एक नवी ऊर्जा प्रकट होते. हे आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहे, पण आपण कधी त्याची दखल घेत नाही, आपण त्याला एका धाग्यामध्ये, एका सूत्रामध्ये बांधत नाही. यापुढे तुम्ही जरूर पहा की जेव्हा जेव्हा आपला नैसर्गिक अवस्थेशी संपर्क येईल, आपल्या आत एक नवे चैतन्य निर्माण होईल. आणि म्हणून 5 जूनची निसर्गाशी जोडून घेण्याची वैश्विक मोहीम आपली स्वत:ची मोहीम बनायला हवी. आपल्या पूर्वजांनी पर्यावरणाचे रक्षण केले त्याचा काही लाभ आपल्याला मिळत आहे. आता आपण पर्यावरणाचे रक्षण केले तर येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा मिळेल. वेदांमध्ये पृथ्वी आणि पर्यावरण यांना शक्तीचे मूळ मानले गेलेय. आपल्या वेदांमध्ये याचे वर्णन सापडते. आणि अथर्ववेद तर एकाअर्थी पाहिले तर पूर्णपणे पर्यावरणाचा सगळ्यात मोठा दिशादर्शक ग्रंथ आहे आणि तो हजारो वर्ष आधी लिहिला गेलाय. 'माता भूमि: पुत्रो अहम् पृथिव्या:' असे आपल्याकडे म्हटले गेलेय. वेदांमध्ये असे म्हटलेय की आपल्यामध्ये जी शुद्धता आहे ती पृथ्वीमुळे आहे. धरती आपली माता आहे आणि आपण तिचे पुत्र आहोत. आपण भगवान बुद्धांची आठवण काढली तर एक गोष्ट नक्कीच ठळकपणे दिसून येते की महात्मा बुद्ध यांचा जन्म, त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण या तिन्ही घटना झाडाखाली घडल्या. आपल्या देशातही अनेक असे सण, अनेक अशा पूजापद्धती आहेत. सुशिक्षित लोक असोत, अशिक्षित असोत, शहरी असोत, ग्रामीण असोत, आदिवासी समाज असो, निसर्गाची पूजा, निसर्गाबद्दलचे प्रेम हे सहजपणे समाजजीवनाचा एक भाग बनलेले दिसते. पण त्याला आधुनिक शब्दांमध्ये, आधुनिक तर्कांच्या साथीने जोपासण्याची गरज आहे.
अलीकडे राज्यांमधून माझ्यापर्यंत बातम्या पोहोचत असतात. जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये वृक्षारोपणाची एक खूप मोठी मोहीम चालू आहे. करोडोंच्या संख्येने वृक्ष लावले जात आहेत. यात शाळेच्या मुलांनाही सहभागी करून घेतले जातेय, सामाजिक संघटना यात सहभागी होत आहेत, स्वयंसेवी संघटना सहभागी होत आहेत, सरकार स्वत: पुढाकार घेत आहे. आपणही या वेळी, या पावसाळ्यात वृक्षारोपणाच्या या कामाला प्रोत्साहन द्यावे, आपले योगदान द्यावे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 21 जून, आता जगासाठी 21 जून हा ओळखीचा दिवस बनला आहे. विश्वभरात हा दिवस 'जागतिक योग दिन' म्हणून ओळखला जातो. खूप कमी काळामध्ये 21 जूनचा हा 'जागतिक योग दिवस' जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पसरला आहे, लोकांना एकत्र आणत आहे. एका बाजूला विश्वभरात दुही फैलवणाऱ्या अनेक शक्ती आपला विकृत चेहरा दाखवित आहेत. अशा काळात जगाला भारताकडून मिळालेली ही एक खूप मोठी देणगी आहे. योगाच्या माध्यमातून आपण विश्वाला एका सूत्रामध्ये जोडले आहे. ज्याप्रमाणे योग हा शरीर, मन, बुद्धि आणि आत्मा यांना जोडतो, त्याचप्रकारे तो आज एकत्र आणत आहे. आजच्या जीवनशैलीमुळे, धावपळीमुळे, वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे तणावरहीत आयुष्य जगणे कठीण होत चालले आहे. अगदी लहान वयापासूनही या तणावपूर्ण मन:स्थितीची लागण झाल्याचे आढळून येत आहे. वाटेल ती औषधे घेत जायची आणि दिवस ढकलत रहायचे अशा या काळात तणाव-मुक्त आयुष्य जगण्यात योगाची भूमिका महत्त्वाची आहे. योग म्हणजे स्वास्थ्य आणि सुदृढता मिळवण्याचा खात्रीचा मार्ग आहे. योग हा फक्त व्यायाम नाही. शरीर-मन, विचार-आचारांतील स्वास्थ्यासह एक अंतरयात्रा चालणे, त्या अंतरर्यात्रेचा अनुभव घ्यायचा असेल तर तो योगाच्या माध्यमातून शक्य आहे. आता दोनच दिवसांपूर्वी मी जगभरातील सरकारांना, सर्व नेत्यांना पत्र लिहिले आहे.
गेल्यावर्षी मी योगाशी संबंधित काही स्पर्धांची घोषणा केली आहे, काही बक्षिसांची घोषणा केली आहे. हळुहळू त्या दिशेने काम पुढे जाईल. मला एक सूचना आली आहे आणि ही मौल्यवान कल्पना सुचिवणाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. मोठीच मनोवेधक सूचना आहे. त्यांनी असे म्हटलेय की यंदाचा हा तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि त्यानिमित्त तुम्ही असे आवाहन करा की या दिवशी कुटुंबातील तीन पिढ्यांनी एकत्र योगासने करावीत. आजी-आजोबा, आई-बाबा, मुलगा-मुलगी- तिन्ही पिढ्यांनी एकत्र योगासने करावीत व त्याचे छायाचित्र अपलोड करावे. काल, आज आणि उद्या यांचा एक असा सुंदर मिलाफ होईल की ज्यातून योगाला एक नवा पैलू मिळेल. ही कल्पना सुचवल्याबद्दल मी आभारी आहे आणि मलाही असे वाटते की ज्याप्रकारे आपण selfie with daughter ची मोहीम चालवली होती आणि एक मोठाच रोचक अनुभव मिळाला होता त्याचप्रमाणे ही तीन पिढ्या एकत्र योगासने करतानाची छायाचित्रे देशात व जगभरात कौतुक जागवेल. जिथे जिथे तीन पिढ्या योगसाधना करीत आहेत, तिथल्या त्या तिन्ही पिढीच्या लोकांचे एकत्रित छायाचित्र तुम्ही NarendraModiApp, MyGov वर नक्की पाठवा. काल, आज आणि उद्याचे ते छायाचित्र असेल, जे सोनेरी भविष्यकाळाची खात्री देईल. मी तुम्हाला आमंत्रण देत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला अजूनही तीन आठवड्यांचा अवकाश आहे. आजच सरावाला लागा. मी 01 जूनपासून 21 जूनपर्यंत दररोज twitter वर योगासंबंधी काही ना काही पोस्ट टाकत जाईन, तुमच्याशी शेअर करेन. तुम्ही या तीन आठवड्यामध्ये सतत योग या विषयाचा प्राचार करा, प्रसार करा, यात लोकांना सहभागी करून घ्या. एका प्रकारे हे रोगप्रतिकारक आरोग्य संवर्धनासाठीचे आंदोलनच आहे. मी तुम्हा सर्वांना यात सहभागी होण्याचे आमंत्रण देत आहे.
जेव्हा तुम्ही लोकांनी मला आपल्या प्रमुख सेवकाची जबाबदारी सोपवलीत, जेव्हा माझ्या कार्यकाळातल्या पहिल्या 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून प्रथमच बोलण्याची संधी मला मिळाली, त्यावेळी मी स्वच्छतेबद्दल बोललो होतो. तेव्हापासून आजपर्यंत भारताच्या वेगवेगळ्या भागांतून माझा प्रवास चालू आहे आणि मोदी काय करत आहेत, मोदी कुठे जात आहेत, मोदींनी काय काय केले यावर बारीक नजर ठेवून आहेत असे माझ्या लक्षात आले आहे. याचे कारण मला एक खूपच लक्षवेधी दूरध्वनी आला आणि त्यांनी जे सांगितले त्याप्रकारे मी क्वचितच कधी विचार केला असेल. पण ही गोष्ट ध्यानात आणल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हा दूरध्वनी तुम्हीही ऐका.
"नमस्कार मोदी जी, मी मुंबईहून नैना बोलत आहे. मोदी जी टीव्हीवर आणि सोशल मीडियावर मी नेहमी बघते की तुम्ही जिथे जिथे जाता तिथे साफ-सफाईवर खूपच भर दिला जातो. मुंबई असो की सूरत, तुमच्या आवाहनानुसार लोकांनी सामूहिक स्वरूपात स्वच्छतेला एक मिशन म्हणून हाती घेतलेय. मोठे तर यात सहभागी आहेतच पण मुलांमध्येही स्वच्छतेबाबत जागरुकता आली आहे. लहान मुले मोठ्या माणसांना रस्ते घाण करण्यापासून रोखताना अनेकदा दिसतात. काशीच्या घाटांवरून तुम्ही जी स्वच्छता मोहीम सुरू केली होती तिने तुमच्या प्रेरणेने एका आंदोलनाचे रूप घेतलेय."
तुमचे म्हणणे खरे आहे की मी जिथे जिथे जातो, तिथे सरकारी यंत्रणा तर स्वच्छतेचे काम करतेच पण अलीकडे समाजातही स्वच्छतेचा उत्सव साजरा होताना दिसतो. मी तिथे पोहोचण्याच्या पाच दिवस आधी, सात दिवस आधी, दहा दिवस आधी खूप मोठ्या प्रमाणात स्वच्छता कार्यक्रम हाती घेतले जातात. प्रसारमाध्यमांतूनही या प्रयत्नांना प्राधान्याने प्रसिद्धी दिली जाते. आता काही दिवसांपूर्वीच मी गुजरातमधल्या कच्छ येथे गेलो होतो. तिथे खूप मोठी स्वच्छता मोहीम चालू आहे. पण या दोन गोष्टींचा परस्परसंबंध मला जाणवला नव्हता. पण हा दूरध्वनी आल्यानंतर मी विचार केला की हो, ही गोष्ट खरी आहे. ही गोष्ट लक्षात आल्याने मला किती आनंद झाला असेल याची कल्पना आपण करू शकता आणि देशही या गोष्टींची किती छान प्रकारे दखल घेत आहे. स्वच्छतेचा संबंध माझ्या दौऱ्यांशीही जोडला जातोय याहून आनंदाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी कोणती असेल? पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बाकीची तयारी करण्याची सवय असतेच, पण स्वच्छता ही त्यातली प्रमुख गोष्ट बनली आहे. स्वच्छतेवर प्रेम करणाऱ्या कुणासाठीही ही गोष्ट आनंददायक आहे, प्रेरणादायी आहे. या स्वच्छतेच्या कामाला बळ पुरविणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. कुणीतरी आणखी एक सूचना केली आहे. तशी तर ती खूपच थट्टेच्या सुरात केलेली सूचना आहे. मी हे करू शकेन की नाही, मला माहीत नाही, पण त्यांनी म्हटलेय की, मोदी जी तुम्ही आपले दौरे ठरवताना, ज्या लोकांनी तुम्हाला आमंत्रण दिलेय त्यांना स्वच्छतेसंबंधी काही प्रश्न विचारा. मला बोलवायचे असेल तर तुमच्याकडे स्वच्छतेची स्थिती कशी असेल? तुम्ही किती टन कचरा मला भेट करणार? हे विचारा आणि या आधारावरच तुम्ही आपला दौरा नक्की करा. कल्पना खूप चांगली आहे, पण मला यावर विचार करावा लागेल. मात्र हे आंदोलन उभे रहायला हवे हे तर खरे आहे आणि काहीतरी वस्तू, स्मृतीचिन्ह भेटीदाखल देण्याऐवजी स्वच्छता मोहीमेतून निघालेला अमुक टन कचरा भेटी दाखल दिला जावा ही चांगलीच गोष्ट आहे. केवढे मोठे मानवतेचे काम होईल ते. एक गोष्ट मी नक्की सांगेन, की या कचऱ्याला टाकाऊ मानू नये, ती संपत्ती आहे, एक स्त्रोत आहे. एकदा का आपण या कचऱ्याला संपत्ती मानणे सुरू केले की कचरा व्यवस्थापनाच्या कित्येक नवनव्या पद्धती आपल्यासमोर येतील. 'स्टार्ट अप' शी जोडले गेलेले युवकही नवनव्या योजना घेऊन येतील. नवनवी साधने घेऊन येतील. भारत सरकारने राज्यांतील सरकारांच्या मदतीने, शहरांच्या लोकप्रतिनिधींच्या मदतीने कचरा व्यवस्थापनाची एक मोठी मोहीम उघडण्याचे निश्चित केले आहे. 5 जून, जागतिक पर्यावरण दिनी सुमारे चार हजार शहरांमध्ये घन कचरा, द्रवरूप कचरा गोळा करण्यासाठी तशा प्रकारची साधने उपलब्ध होणार आहेत. दोन प्रकारच्या कचरापेट्या उपलब्ध करून दिल्या जातील. त्यापैकी एक हिरव्या रंगाची व दुसरी निळ्या रंगाची असेल. दोन प्रकारचा कचरा तयार होत असतो - एक ओला कचरा आणि दुसरा सुका कचरा. चार हजार शहरांमध्ये या कचरापेट्या ठेवल्या जाणार आहेत. आपण शिस्तीचे पालन करीत सुका कचरा निळ्या कचराकुंडीत आणि ओला कचरा हिरव्या कचराकुंडीत टाकावा. उदाहरणार्थ स्वयंपाकघरातून जो कचरा निघतो, मग त्यात भाज्यांची साले असतील, उरलेले अन्न असेल, अंड्याचे कवच असेल, पालापाचोळा असेल, हा सगळा ओला कचरा आहे आणि तो हिरव्या रंगाच्या कचरापेटीत टाकावा. या सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्यांचा शेतामध्ये उपयोग होतो. आणि शेताचा रंग हिरवा असतो इतके जरी लक्षात ठेवलेत तरीही ओला कचरा हिरव्या कचराकुंडीत टाकायचा आहे हे लक्षात राहील. दुसऱ्या प्रकारच्या कचऱ्यामध्ये रद्दी कागद, पुठे, लोखंड, काच, कापड, प्लास्टिक, पॉलिथिन, तुटलेले डबे, रबर, धातू अशा खूप गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टी म्हणजे सुका कचरा आहे. जो यंत्रामध्ये टाकून रिसायकल करावा लागतो. म्हणजे त्याची पुननिर्मिती करावी लागते. एरवी तो कधी उपयोगात आणला जाऊ शकत नाही. असा कचरा निळ्या कचराकुंडीत टाकायचा आहे. मला खात्री आहे की आपण अशी एक संस्कृती विकसित करू. स्वच्छतेच्या दिशेने आपल्याला प्रत्येक वेळी नवे पाऊल टाकतच जायचे आहे तेव्हा कुठे गांधीजींनी पाहिलेले स्वच्छतेबद्दलचे स्वप्न आपण पूर्ण करू शकू. आज मला एका गोष्टीचा उल्लेख गर्वाने करायचा आहे की केवळ एका व्यक्तीने जरी मनाशी ठाम निर्धार केला तरीही तो मोठे जनआंदोलन उभारू शकतो. स्वच्छता हे असेच एक काम आहे. काही दिवसांपूर्वी तुमच्या कानावर एक गोष्ट आली असेल. मुंबईतला सर्वात घाण समजला जाणाला वर्सोवा किनारा आज स्वच्छ, सुंदर वर्सोवा किनारा बनला आहे. हे अचानक घडलेले नाही. नागरिकांनी जवळजवळ 80-90 आठवडे सतत कष्ट करून वर्सोवा समुद्रकिनाऱ्याचा कायापालट करून टाकला. हजारो टन कचरा वेचला गेला आणि तेव्हा कुठे आज वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर बनला. या कामाची संपूर्ण जबाबदारी Versova Residence Volunteer ( VRV) ने उचलली होती. श्री. अफरोज शाह नावाच्या सद्गृहस्थांनी 2015 पासून प्राणपणाने या कामाला जुंपून घेतले होते. हळुहळू काम विस्तारत गेले. त्याचे जन-आंदोलन बनले. आणि याच कामासाठी श्री. अफरोज शाह यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमांतर्गत खूप मोठा पुरस्कार दिला गेला. Champions Of the Earth नावाचा हा पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय बनले. श्री. अफरोज शाह यांचे मी अभिनंदन करतो, या आंदोलनाचे अभिनंदन करतो. ज्या प्रकारे लोक-संग्रह केल्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण परिसरातील लोकांना या कामाशी जोडून घेतलं आणि त्याला जनआंदोलनाचे रूप दिले ते एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
बंधू भगिनिंनो आज तुम्हाला आणखी एक गोष्ट मोठ्या आनंदाने सांगायची आहे. मला असे सांगण्यात आलेय की स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जम्मू-काश्मीरमधील 'रियासी ब्लॉक' हा भाग हगणदरीमुक्त झाला आहे. मी रियासी ब्लॉकच्या सर्व नागरिकांचे, तिथल्या प्रशासकांचे, जम्मू-काश्मीरने एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे, यासाठी त्यांचे अभिनंदन करतो. आणि मला असेही सांगण्यात आले आहे की या संपूर्ण चळवळीच्या अग्रभागी जम्मू-काश्मीरमधील त्या परिसरात राहणाऱ्या महिला होत्या. त्यांनी जाणीवजागृतीसाठी तिथे मशाल मोर्चे काढले. घराघरांत, गल्ल्यागल्ल्यांतून जाऊन त्यांनी लोकांना प्रेरित केले. त्या माता-भगिनींचे मी मनापासून अभिनंदन करतो, तिथल्या प्रशासकांचे अभिनंदन करतो, ज्यांनी जम्मू-काश्मीरच्या भूमीवरील एक ब्लॉक हगणदरीमुक्त बनवून उत्तम सुरुवात केली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या महीना-पंधरा दिवसांपासून वर्तमानपत्रांतून, टीव्ही चॅनल्सवरून, सोशल मीडियावरून, विद्यमान सरकारच्या 3 वर्षांचा कामगिरीचा लेखाजोखा घेतला जातोय. 3 वर्षांपूर्वी तुम्ही मला आपल्या प्रमुख सेवकाची जबाबदारी दिली होती. खूप सारी सर्वेक्षणे केली गेली आहेत, खूप साऱ्या जनमत चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. या सर्व प्रक्रियेला मी खूपच सकारात्मक चिन्ह म्हणून पाहतो. या तीन वर्षांच्या कार्यकाळाला प्रत्येक कसोटीवर पारखले गेले आहे. समाजाच्या प्रत्येक गटातील लोकांनी त्याचे विश्लेषण केले आहे. लोकशाहीमधील ही एक उत्तम प्रक्रिया आहे आणि माझे असे स्पष्ट मत आहे की लोकशाहीमध्ये सरकारांनी उत्तरदायी असायला हवे, जनता-जनार्दनाला आपल्या कामाचा हिशेब द्यायला हवा. ज्यांनी वेळ काढून आमच्या कामाची सखोल चिकित्सा केली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्यात कुठे कौतुक केलं गेलंय, कुणी पाठिंबा दिला आहे, कुठे काही त्रुटी नोंदवल्या आहेत. मी या सर्वच गोष्टी महत्वाच्या मानतो. ज्यांनी टीकात्मक आणि महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिल्या आहेत अशा लोकांचेही मी आभार मानतो. त्रुटींवर, कमतरतांवर प्रकाश टाकला गेला तर त्यात सुधारणा करण्याची संधी मिळते. गोष्ट चांगली असू दे, बरी असू दे, वाईट असू दे, जे काही आहे त्यातूनच शिकायचे आणि त्याच्याच आधारे पुढे जायचे आहे. विधायक टीका लोकशाहीला बळ पुरवते. एका जागरुक राष्ट्रासाठी, एका चैतन्यपूर्ण राष्ट्रासाठी ही घुसळण खूप आवश्यक असते.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी सुद्धा तुमच्यासारखाच एक सामान्य नागरिक आहे आणि एक चांगल्या-वाईट प्रत्येक गोष्टीचा प्रभाव माझ्यावरही अगदी तसाच होतो जसा तो कोणत्याही सामान्य नागरिकाच्या मनावर होईल. 'मन की बात' ला कुणी एकतर्फी संवाद म्हणून पाहते, काही लोक यावर राजकीय दृष्टिकोनातूनही टिपण्णी करतात. पण इतक्या प्रदीर्घ अनुभवानंतर मला एक गोष्ट जाणवतेय. मी जेव्हा 'मन की बात' सुरू केली तेव्हा या गोष्टीचा मी विचार केला नव्हता. ती गोष्ट म्हणजे, 'मन की बात' या कार्यक्रमामुळे मी हिंदुस्तानातील प्रत्येक परिवाराचा सदस्य बनलो आहे. असे वाटते जणू काही मी घरीच, कुटुंबामध्ये बसून घरच्याच गोष्टींबद्दल हितगूज करत आहे. आणि अशी शेकडो कुटुंबे आहेत ज्यांनी मला ही गोष्ट लिहून कळवली आहे. आणि मी मगाशीच म्हणालो त्याप्रमाणे एक सामान्य माणूस म्हणून माझ्या मनावर या गोष्टीचा प्रभाव पडतो. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपती भवनात, माननीय राष्ट्रपती, माननीय उपराष्ट्रपती, माननीय लोकसभा अध्यक्ष महोदया या साऱ्यांनी 'मन की बात' वरील एका विश्लेषणात्मक पुस्तकाचे प्रकाशन केले. एक व्यक्ती म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून ही घटना माझ्या उत्साहात भर टाकणारी आहे. मी राष्ट्रपतीजी, उपराष्ट्रपतीजी आणि अध्यक्ष महोदया यांचे आभार मानतो की त्यांच्यासारख्या उच्च पदावरील व्यक्तींनी वेळात वेळ काढून 'मन की बात' ला हे महत्व दिले. एका तऱ्हेने 'मन की बात' ला एक नवा पैलू दिला. आमचे काही मित्र जेव्हा या 'मन की बात' पुस्तकावर काम करत होते तेव्हा त्यांनी कधीतरी माझ्याशीही चर्चा केली होती आणि नवलाची बाब म्हणजे काही काळापूर्वी जेव्हा या पुस्तकाबद्दल चर्चा सुरू झाली तेव्हा अबुधाबीस्थित अकबर साहेब नावाच्या एका कलाकाराने स्वत:हून असा प्रस्ताव ठेवला की 'मन की बात' मध्ये ज्या विषयांवर चर्चा आहे, त्याबद्दलची रेखाचित्रे ते आपल्या कलेच्या माध्यमातून बनवून देतील. या कामासाठी एक पैसाही न घेता, केवळ आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी अकबर साहेब यांनी 'मन की बात'ला कलेचे रूप दिले. मी अकबर साहेब यांचा आभारी आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण पुन्हा भेटू तोवर देशाच्या प्रत्येक कोनाकोपऱ्या पाऊस पोहोचला असेल, ऋतू बदललेला असेल, परीक्षांचे निकाल आलेले असतील, नव्याने विद्यार्थी जीवनाची सुरुवात होणार असेल आणि पावसाच्या आगमनाबरोबरच येईल एक नवा आनंद, नवा सुगंध. चला, आपण सगळ्यांनी अशा वातावरणात निसर्गावर प्रेम करीत पुढे जाऊ या. माझ्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद!
On the start of Ramzan, I convey my greetings to people across the world: PM @narendramodi #MannKiBaat
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
India's diversity is our strength. #MannKiBaat pic.twitter.com/9S8CqkILic
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
We are proud that people from all faiths live in India in a harmonious manner. #MannKiBaat pic.twitter.com/pDFZ293wDs
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
I said that during the holidays get out of your comfort zone, do something new. I am glad lot of people shared their experiences with me: PM
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
I am happy to see youngsters are taking interest in lives of our freedom fighters, who spent their lives in jail. #MannKiBaat pic.twitter.com/BeOK8diQ1a
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
Today we remember Veer Savarkar on his Jayanti. He spent time at the 'Kaala Pani' and there he wrote a lot: PM @narendramodi #MannKiBaat
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
People from all over India were imprisoned in the cellular jail. #MannKiBaat pic.twitter.com/ITtXMD1Zp7
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
PM @narendramodi pays tributes to Veer Savarkar. #MannKiBaat pic.twitter.com/EYVJ6Keai4
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
Connecting with nature to nurture a better planet. #MannKiBaat pic.twitter.com/6PvKDxsNdZ
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
Connecting with nature to nurture a better planet. #MannKiBaat pic.twitter.com/6PvKDxsNdZ
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
Connecting with nature is nothing but connecting with ourselves. #MannKiBaat pic.twitter.com/rrjvOdMxp2
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
Nature always refreshes us. #MannKiBaat pic.twitter.com/XxhRqrCiiT
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
Our ancestors conserved nature, we must show the same compassion towards future generations. #MannKiBaat pic.twitter.com/mjAeNFJajo
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
Yoga is integrating the world today. #MannKiBaat pic.twitter.com/1vTqq1CKGa
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
Yoga guarantees both wellness and fitness. #MannKiBaat pic.twitter.com/ddwAggiJtT
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
I got a very interesting suggestion- since its 3rd Yoga Day, why not 3 generations of a family come together & practice Yoga: PM #MannKiBaat
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
Focus on waste management. #MannKiBaat pic.twitter.com/zyBXSiyWdd
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
PM lauds @AfrozShah1 and the entire team for their efforts towards cleanliness in Mumbai. #MannKiBaat
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
Making cleanliness a mass movement. #MannKiBaat pic.twitter.com/fWQ2slLcGs
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
I am very happy people are evaluating our work in great detail. I welcome this: PM @narendramodi #MannKiBaat
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
Constructive criticism strengthens our democracy. #MannKiBaat pic.twitter.com/TEOYwdMI1u
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
#MannKiBaat has connected me with every Indian, in a very special way: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
Two days ago, there was a book on #MannKiBaat that was launched at Rashtrapati Bhavan: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
Those working on the #MannKiBaat book released day before yesterday interacted with me: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017
The art work was done by a UAE based artist, Akbar Saheb. He did not charge any money for his artwork. This was a great gesture: PM
— PMO India (@PMOIndia) May 28, 2017