पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यात आज द्विपक्षीय बैठक झाली. पंतप्रधान किशिदा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी भोजन समारंभ देखील आयोजित केला होता. विविध मुद्यांवर तसेच काही प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर द्विपक्षीय संबंध वाढविण्यासाठी दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
संरक्षण उत्पादनासह द्विपक्षीय सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य वाढविण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. पुढची 2+2 परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण मंत्र्यांची बैठक जपानमध्ये लवकरात लवकर आयोजित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
दोन्ही देशांदरम्यान वृद्धिंगत होत असलेल्या आर्थिक संबंधाची दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली. पुढील पाच वर्षांत जपानकडून भारताला होणारे अर्थसहाय्य तसेच सरकारी आणि खाजगी क्षेत्रात होणारी गुंतवणूक 5 ट्रीलीयन येन पर्यंत नेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकत्रित प्रयत्न करावेत यावर त्यांचे एकमत झाले. व्यापारातील सुलभता आणि गतिशक्ती पुढाकाराच्या माध्यमातून लॉजीस्टीक सुविधा सुधारण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांवर पंतप्रधानांनी भर दिला तसेच जपानी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक वाढवावी असा पंतप्रधान किशिदा यांना आग्रह केला. अशा प्रकारच्या गुंतवणुकीमुळे मजबूत पुरवठा साखळी तयार करण्यात मदत होईल आणि हे दोन्ही देशांसाठी फायद्याचे असेल. या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी जपानी कंपन्या भारतात गुंतवणूक वाढवत असल्याची आणि 24 जपानी कंपन्यांनी विविध पीएलआय योजनेअंतर्गत यशस्वीपणे अर्ज दाखल केल्याची प्रशंसा केली.
दोन्ही नेत्यांनी मुंबई -अहमदाबाद जलदगती रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावा घेतला आणि या प्रकल्पासाठी अर्थसहाय्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्याच्या घटनेचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी माहिती आणि संचार तंत्रज्ञानाचे वाढते महत्व अधोरेखित केले आणि या संदर्भात प्रगत दूरसंचार तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी दोन्ही देशांतील खाजगी क्षेत्रात भागीदारी वाढविण्यास उत्तेजन देण्यावर सहमती दर्शवली. सेमीकंडक्टर, 5G आणि 5G पुढील नेटवर्क यासारख्या महत्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानात सहकार्याच्या शक्यतांविषयी त्यांनी चर्चा केली. हरित हायड्रोजनसह स्वच्छ उर्जा क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर तसेच या संदर्भात अधिक व्यावसायिक सहकार्याला प्रोत्साहन यावर दोन्ही पंतप्रधानांनी सहमती दर्शविली.
दोन्ही देशांतील लोकांचे व्यक्तिगत संबंध वाढविण्यावर भर देण्यावर दोन्ही नेत्यांची सहमती झाली. पंतप्रधान किशिदा म्हणाले की असे संबंध द्विपक्षीय नात्यासाठी पाठीचा कणा बनतात. या संदर्भात त्यांनी विशेष कुशल कामगार कार्यक्रमाच्या अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावा घेतला आणि या कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यावर सहमती दर्शविली. पंतप्रधान मोदी यांनी प्रवासावरील बंधने आणखी शिथिल करण्याचा मुद्दा मांडला जेणेकरून भारतातून येणाऱ्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीकरण प्रमाणपत्र असलेल्या प्रवाशांना जपानमध्ये विलगीकरणमुक्त प्रवेश मिळू शकेल. भारताच्या ईशान्य प्रदेशाच्या विकासाला प्राधान्य देण्यात भारत-जपान ॲक्ट इस्ट फोरमची मोलाची मदत झाली यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली आणि वार्षिक शिखर परिषदेत ठरविल्याप्रमाणे विविध प्रकल्पांची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल असा विश्वास व्यक्त केला.
दोन्ही नेत्यांनी अलीकडच्या काळात घडलेल्या क्षेत्रीय आणि जागतिक घटनांवर चर्चा केली. हिंद-प्रशांत क्षेत्राबद्दलच्या दोन्ही देशांचा दृष्टीकोन समजून घेतला आणि मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद-प्रशांत क्षेत्रासाठीच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. या संदर्भात, क्वाडच्या सध्याच्या प्रगतीचे आणि लसी, शिष्यवृत्ती, महत्वाचे तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधेविषयीच्या विधायक कार्यक्रमात झालेल्या प्रगतीचे त्यांनी स्वागत केले.
या भेटीत आपल्याला आणि आपल्या शिष्टमंडळाला पंतप्रधान किशिदा यांनी दाखविलेल्या सौहार्द आणि आदरातिथ्याकरिता पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले. पंतप्रधान किशिदा यांनी पंतप्रधान मोदी यांना पुढच्या वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेचे आमंत्रण दिले, त्याचा सकारात्मकतेने स्वीकार करण्यात आला आहे.