जर्मनीच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी, जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्या निमंत्रणावरून मी जर्मनीत श्लोस एल्माऊ, इथे भेट देणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या भारत - जर्मनी आंतर सरकारी बैठकीनंतर (IGC) चॅन्सलर ओलाफ स्कोल्झ यांची पुन्हा भेट ही आनंदाची बाब आहे.
मानवतेवर प्रभाव टाकणाऱ्या महत्वाच्या जागतिक घडामोडींवर विचारविनिमय करून आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने जर्मनीने G7 परिषदेला भारतासह अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका या देशांनाही निमंत्रित केले आहे. मी या परिषदेत पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्न सुरक्षा, आरोग्य, दहशतवादाचा विरोध , लैंगिक समानता आणि लोकशाही यासारख्या विषयांवर G7 देश, G7 भागीदार देश आणि अतिथी आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत विचारांची देवाणघेवाण करेन. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर परिषदेत सहभागी होणाऱ्या काही G7 देशांच्या आणि अतिथी देशांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यासाठी मी उत्सुक आहे.
जर्मनीत वास्तव्य असताना मी यूरोपातील भारतीय समुदायाशी संवाद साधायला देखील उत्सुक आहे, हे भारतीय त्यांच्या स्थानिक अर्थव्यवस्थेत भरीव योगदान देण्यासह भारताचे युरोपियन राष्ट्रांसमवेतचे संबंध वृद्धींगत करत आहेत.
भारतात परत येताना, मी 28 जून 2022 रोजी अबुधाबी इथं अल्पावधीकरता थांबणार आहे. संयुक्त अरब अमिरातीचे माजी अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या निधनाबद्दल, माझ्याकडून वैयक्तिक शोकभावना व्यक्त करण्यासाठी मी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबु धाबीचे शासक, महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेणार आहे.