नमस्कार,
माननीय अध्यक्ष महोदय,
संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या 74व्या सत्राला, 130 कोटी भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून, संबोधित करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
संपूर्ण जग हे वर्ष, महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी करत आहे यासाठी देखील ही संधी माझ्यासाठी विशेष आहे. सत्य आणि अहिंसेचा त्यांचा संदेश, विश्वशांती, प्रगती आणि विकासासाठी आज देखील प्रासंगिक आहे.
अध्यक्ष महोदय,
यावर्षी जगातील सर्वात मोठी निवडणूक झाली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये, जगात सर्वाधिक लोकांनी मतदान करून, मला आणि माझ्या सरकारला पहिल्यापेक्षा मजबूत जनादेश दिला आहे. आणि या जनादेशामुळेच आज मी परत येथे उपस्थित आहे. परंतु या जनादेशातून जो संदेश समोर आला आहे तो याहूनही खूप मोठा आहे, व्यापक आहे, प्रेरणादायी आहे.
अध्यक्ष महोदय,
जेव्हा एक विकसनशील देश, जगातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान यशस्वीपणे पूर्ण करत, केवळ 5 वर्षात देशवासीयांसाठी 11 कोटींहून अधिक शौचालये बांधतो तेव्हा त्याच्या सोबतच्या सर्व व्यवस्था संपुर्ण जगासाठी एक प्रेरणादायी संदेश देतात. जेव्हा एक विकसनशील देश जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना यशस्वीपणे राबवत, 50 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा प्रदान करत आहे, तेव्हा त्यासोबत असलेली संवेदनशील व्यवस्था संपूर्ण जगाला एक नवीन मार्ग दाखवते.
जेव्हा एक विकसनशील देश, जगातील सर्वात मोठा आर्थिक समावेशन कार्यक्रम यशस्वीपणे राबवत, केवळ 5 वर्षांमध्ये 37 कोटींहून अधिक गरिबांचे बँकेत खाते उघडले जाते, तेव्हा त्याच्याशी निगडित व्यवस्था संपूर्ण जगातील गरिबांमध्ये एक विश्वास निर्माण करते.
जेव्हा एक विकसनशील देश, आपल्या नागरिकांसाठी जगातील सर्वात मोठा डिजिटल आयडेंटिफिकेशन कार्यक्रम राबवतो, त्यांना बायोमेट्रिक ओळख देतो, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करतो, भ्रष्टाचाराला आळा घालून अंदाजे 20 बिलियन हुन अधिक निधी वाचवतो, तेव्हा त्यासोबतच्या व्यवस्था संपूर्ण जगासाठी एक नवीन आशा घेऊन येते.
अध्यक्ष महोदय,
येथे येताना मी संयुक्त राष्ट्राच्या इमारतीवर लिहिलेले एक वाक्य वाचले- नो मोर सिंगल युज प्लास्टिक. मला येथे हे सांगताना खूप आनंद होत आहे की, याक्षणी मी येथे तुम्हाला संबोधित करत असताना, तेथे संपूर्ण भारतात प्लास्टिक मुक्त भारत अभियान सुरू आहे.
आगामी 5 वर्षात आम्ही जल संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासोबतच 15 कोटी घरांना पाण्याचे कनेक्शन देणार आहोत.
येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आम्ही आमच्या अतिदुर्गम भागातील गावांना जोडण्यासाठी सव्वा लाख किलोमीटर हुन अधिक लांबीचे नवीन रस्ते बांधणार आहोत.
वर्ष 2022 मध्ये भारत आपल्या स्वातंत्र्यची 75 वर्षे साजरी करणार आहे, तोवर आम्ही गरिबांसाठी आणखी 2 कोटी घरे बांधणार आहोत. संपूर्ण जगाने वर्ष 2030 पर्यंत संपूर्ण जग क्षयमुक्त करण्याचे उद्दिष्ट जरी समोर ठेवले असले तरी आम्ही भारताला 2025 पर्यंत क्षयमुक्त करण्याचे निश्चित केले आहे. खरं तर प्रश्न हा आहे की आम्ही हे सगळं कसं करत आहोत, नव भारतात इतक्या वेगाने परिवर्तन कसे घडत आहे?
अध्यक्ष महोदय,
भारत हा हजारो वर्षांची जुनी महान संस्कृती लाभलेला एक देश आहे, ज्याची स्वतःची एक परंपरा आहे, ज्याने जागतिक स्वप्नांना स्वतःमध्ये सामावून घेतले आहे. आमचे संस्कार, आमची संस्कृती एखाद्या जीवात, शिवाला बघतात. म्हणूनच लोक सहभागातून लोक कल्याण हे आमचे प्राण तत्व आहे. आणि हे लोक कल्याण देखील केवळ भारतासाठी नाहीतर विश्व कल्याणासाठी आहे.
आणि म्हणूनच आमची प्रेरणा आहे-
सबका साथ,सबका विकास, सबका विश्वास
आणि हे सर्व भारताच्या सीमेपर्यंत मर्यादित नाही. आमची ही मेहनत म्हणजे कोणतीही दया किंवा दिखाऊपणा नाही. आम्ही 130 कोटी भारतीयांना केंद्र स्थानी ठेऊन आमचे प्रयत्न करत आहोत परंतु ज्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी हे प्रयत्न सुरू आहेत, ती स्वप्ने संपूर्ण जगाची आहेत, प्रत्येक देशाची आहेत, प्रत्येक समाजाची आहेत. प्रयत्न आमचे आहेत पण त्याची फळं सगळ्यांसाठी आहेत, संपूर्ण जगासाठी आहेत.जेव्हा मी भारताप्रमाणेच इतर देशांना त्यांच्यापरीने विकासासाठी प्रयत्न करताना बघतो तेव्हा दिवसेंदिवस माझा हा विश्वास अधिकच दृढ होतो आहे.
जेव्हा मी त्या देशांची सुख दुःख ऐकतो, त्यांची स्वप्ने जाणून घेतो, तेव्हा माझा हा संकल्प अधिक दृढ होतो, जेणेकरून मी माझ्या देशाचा विकास अधिक वेगाने करून भारताचे हे अनुभव त्या देशांना उपयोगी येतील.
अध्यक्ष महोदय,
तीन हजार वर्षांपूर्वी भारताचे महान कवी कणियन पूंगुन्ड्रनार यांनी जगातील प्राचीन तामिळ भाषेत म्हंटले होते-
“यादुम् ऊरे, यावरुम् केड़िर”।
याचा अर्थ,
“आमच्या मनात संपूर्ण जगासाठी आपलेपणाची भावना आहे आणि सर्व लोकं आमचेच आहेत”.
देशाच्या सीमेपार, आपलेपणाची हीच भावना भारत भूमीची विशेषतः आहे. भारताने मागील पाच वर्षात शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या विश्व बंधुत्व आणि विश्व कल्याणाच्या महान परंपरेला मजबूत करण्याचे काम केले आहे. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेमागील ध्येय सुद्धा हेच आहे. भारत ज्या विषयांवर आवाज उठवत आहे, भारत पुढाकार घेऊन ज्या जागतिक मंचांची स्थापना करत आहे, त्या सर्वांचा आधार जागतिक आव्हाने, जागतिक विषय आणि जटील समस्यांच्या निराकरणासाठी सामुहिक प्रयत्न आहेत.
अध्यक्ष महोदय,
आपण जर इतिहास आणि दरडोई उत्सर्जन पहिले तर, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भारताचे योगदान खूपच कमी आहे. परंतु असे असले तरी याचे निराकरण शोधण्याऱ्या देशांमध्ये भारत आघाडीवर आहे. एकीकडे आम्ही भारतात 450 गीगावॉट नवीकरणीय उर्जेचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहोत तर दुसरीकडे आम्ही आंतरराष्ट्रीय सौर युती स्थापन करण्यासाठी पुढाकार देखील घेतला आहे.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण आणि त्यांची तीव्रता वाढतच आहे, तसेच त्यांची व्याप्ती आणि नवनवीन स्वरूप देखील समोर येत आहे. ही परिस्थिती बघतच भारताने “आपत्ती निवारक पायाभूत सुविधांसाठी युती” ( सीडीआरआय) स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तींचा कमी प्रभाव होणाऱ्या पायाभूत सुविधांची निर्मिती करायला मदत होईल.
अध्यक्ष महोदय,
संयुक्त राष्ट्र शांतता मिशन मध्ये सर्वाधिक बलिदान कोणत्या देशाने दिले असेल तर तो भारत आहे. आम्ही त्या देशाचे नागरिक आहोत ज्याने जगाला युद्ध नाही बुद्ध दिला आहे, शांततेचा संदेश दिला आहे. आणि म्हणूच आमच्या आवाजात दहशतवादा विरुद्ध जगाला सतर्क करण्याची गंभीरता पण आहे आणि तो आक्रोश देखील आहे. आम्हाला माहित आहे, हे कोणत्या एका देशाचे नाहीतर, संपूर्ण जग आणि मानवते समोरील आव्हान आहे. दहशतवादाच्या नावाखाली तुकड्यांमध्ये विभागलेले जग, हे संयुक्त राष्ट्राचा जन्म ज्या तत्वांच्या आधारावर झाला त्यांनाच धुळीत मिळवतात. आणि म्हणूनच मानवतेसाठी, दहशतवादा विरुद्ध संपूर्ण जगाचे एकमत होऊन, एकजूट होणे बंधनकारक आहे असे मला वाटते.
आज जगाचे स्वरूप बदलत आहे. 21 व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञान, खासगी आयुष्य, अर्थव्यवस्था, सुरक्षा, कनेक्टीव्हिटी आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सामुहिक परिवर्तन घडवून आणत आहे. अशा परिस्थितीत एक विखुरलेले जग कोणाच्याच हिताचे नाही. आपल्या सर्वांकडे केवळ आपापल्या सीमारेषेत जगण्याचा पर्याय उपलब्ध नाही. या नव्या युगात आपल्याला बहुपक्षीय आणि संयुक्त राष्ट्राला नवीन शक्ती, नवीन दिशा द्यायलाच हवी.
अध्यक्ष महोदय,
सव्वाशे वर्षांपूर्वी भारताचे महान अध्यात्मिक गुरु, स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेत जगाला एक संदेश दिला होता.
तो संदेश होता-
“Harmony and Peace and not Dissension .
“सुसंवाद आणि शांती – मतभेद नको”
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा आज देखील आंतरराष्ट्रीय समुदायासाठी हाच संदेश आहे –
Harmony and Peace.
सुसंवाद आणि शांती
खूप खूप धन्यवाद !!!