मान्यवर महोदय,
एकमेकांचा स्वीकार करत परस्परांशी जुळवून घेण्याच्या महत्त्वपूर्ण विषयावर आपले विचार मांडण्याची संधी मला दिल्याबद्दल माझे मित्र,बोरिस यांना धन्यवाद! जागतिक हवामान बदलाविषयीच्या परिसंवादात अॅडाप्टेशनला म्हणजेच परिस्थितीशी जुळवून घेण्याला इतके महत्व देण्यात आले नव्हते जेवढे त्याचा सामना करण्याला दिले गेले. हवामान बदलाचा अधिक फटका ज्यांना बसला आहे, अशा विकसनशील देशांवर हा अन्याय आहे.
भारतासह, बहुतांश विकसनशील देशात शेतकऱ्यांसाठी हवामान बदल हे खूप मोठे आव्हान आहे. पिकांच्या पद्धतीत बदल होतो आहे. अवकाळी पाऊस आणि पूर किंवा सातत्याने येत असलेल्या चक्रीवादळामुळे पिके उध्वस्त होत आहेत. पेयजलच्या स्त्रोतांसह परवडणाऱ्या घरांपर्यंत सर्वांनाच आता हवामान बदलाच्या संकटाविरुद्ध लवचिक आणि काटक बनण्याची गरज आहे.
मान्यवर महोदय,
या संदर्भात मला तीन मुद्दे मांडायचे आहेत. पहिला मुद्दा, अॅडाप्टेशन म्हणजे जुळवून घेण्याची पद्धत. आपल्याला, अॅडाप्टेशन आपल्या विकास धोरणांचा आणि प्रकल्पांचा अविभाज्य घटक बनवायला हवे आहे. भारतात नळाने पाणीपुरवठा-सर्वांसाठी नळ योजना, स्वच्छ भारत-क्लीन इंडिया मिशन आणि उज्ज्वला, सर्वांसाठी स्वच्छ इंधन. अशा योजनांमुळे आपल्या गरजू नागरिकांना अॅडाप्टेशनचे लाभ मिळत आहेत, त्यांच्या जीवनमानातही सुधारणा होत आहेत. दुसरा मुद्दा, अनेक पारंपरिक समुदायांना निसर्गासोबत सामंजस्याने राहण्याचे ज्ञान आहे.
आपल्या अॅडाप्टेशनच्या धोरणांमध्ये पारंपरिक पद्धतींना योग्य महत्व द्यायला हवे. ज्ञानाचा हा प्रवाह नव्या पिढीपर्यंतही पोचावा,यासाठी शालेय अभ्यासक्रमात देखील त्याला स्थान द्यायला हवे. स्थानिक परिस्थितीशी अनुरूप जीवनशैलींचे संरक्षण देखील अॅडाप्टेशनचा एक महत्वाचा स्तंभ होऊ शकतो., तिसरा मुद्दा म्हणजे, या अॅडाप्टेशनच्या पद्धती भलेही स्थानिक असतील, मात्र मागासलेल्या देशांना त्यासाठी जागतिक पातळीवरुन समर्थन मिळायला हवे.
स्थानिक पातळीवर अॅडाप्टेशनसाठी जागतिक पाठिंब्याच्या विचारांसह भारताने आपत्तीमध्ये टिकून राहण्यासाठी योग्य अशा पायाभूत सुविधा -सीडीआरआय साठीही पुढाकार घेतला आहे. मी सर्वच देशांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करतो.
धन्यवाद।