पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 शी संबंधित मुद्दे आणि लसीकरणाच्या प्रगतीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील डॉक्टरांसोबत आज चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळात अमूल्य सेवा दिल्याबद्दल डॉक्टर्स, चिकित्सा कर्मचारी आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की गेल्या वर्षी याच दरम्यान आपल्या डॉक्टरांचे अथक परिश्रम आणि देशाच्या धोरणामुळे आपण कोरोना विषाणूची लाट थोपवण्यात सक्षम राहिलो.
देश आज जेव्हा कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे, सर्व डॉक्टर्स आणि आपले कार्यकर्ते महामारीचा सामना करत आहेत आणि लाखो लोकांचं जीवन वाचवत आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की सध्याच केंद्र सरकारने आवश्यक औषधांचा पुरवठा, इंजेक्शन आणि ऑक्सीजनची पुरेशी उपलब्धता या संबंधित अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारांना याबाबबत अनेक आवश्यक दिशा-निर्देश देण्यात आले आहेत.
कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत लसीकरण हे सर्वात मोठं शस्त्र आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अधिकाधिक व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन त्यांनी डॉक्टरांना केले. कोविड महामारी रोखण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि उपचाराबाबत पसरत असलेल्या अफवा निष्फळ करण्यासाठी डॉक्टरांनी नागरिकांना शिक्षित करावे असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. या कठीण काळात नागरिकांवर भीतीचे सावट पसरू नये हे अत्यंत महत्वपूर्ण आहे असे मोदी म्हणाले .
यासाठी योग्य उपचाराबरोबरच रुग्णालयात रुग्णांच्या समुपदेशनावरही त्यांनी भर दिला. आपत्कालीन स्थिती नसेल तिथे डॉक्टरांनी टेली मेडीसिनचा उपयोग करावा असे ते म्हणाले.
यावेळी महामारी देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्येही वेगाने पसरत आहे. अशा शहरांमधे पायाभूत सुविधा वाढवण्याच्या प्रयत्नांमधे गती आणण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. मोठ्या शहरांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतल्या शहरांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना ऑनलाईन मार्गदर्शन करावे. यामुळे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे याची खातरजमा होईल.
डॉक्टरांनी यावेळी कोविड महामारीचा सामना करतानाचे आपले अनुभव मांडले. महामारी रोखण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या प्रयत्नांसाठी त्यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या.
आरोग्यसेवेच्या पायाभूत संरचनेत आपण कशा प्रकारे वाढ करत आहोत याची माहितीही डॉक्टरांनी यावेळी दिली. मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर राखावे याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
कोविड रुग्ण नसलेल्यांसाठी आरोग्य व्यवस्था उत्तम राखण्यावरही त्यांनी भर दिला. औषधांच्या गैरवापराबाबत रुग्णांना कशाप्रकारे ते जागृत करत आहेत याची माहितीही त्यांनी दिली.
बैठकीला केन्द्रीय आरोग्य मंत्री श्री हर्षवर्धन, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री श्री अश्विनी कुमार चौबे, केन्द्रीय रसायन और खते मंत्री श्री डी.वी. सदानंद गौड़ा आणि राज्य मंत्री मनसुख मांडविय, पंतप्रधानाचे प्रधान सचिव, डॉ. वी.के. पॉल सदस्य (आरोग्य ) नीति आयोग, कॅबिनेट सचिव, केंद्रीय आरोग्य सचिव, केंद्रीय औषध सचिव, केन्द्र सरकारच्या मंत्रालय / विभागांचे अन्य अधिकारी यासोबतच आईसीएमआरचे महासंचालक, डॉ. बलराम भार्गव ही उपस्थित हाेते.