तुगलक या तमिळ मासिकाच्या चेन्नई येथे झालेल्या 50 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.
या मासिकाने गेल्या 50 वर्षात केलेल्या प्रगतीची पंतप्रधानांनी यावेळी प्रशंसा केली. मासिकाचे संस्थापक चो रामास्वामी यांच्या निधनाबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. तथ्य, तर्कसंगत वादविवाद आणि उपहास यावर हे मासिक आधारित आहे, असे ते म्हणाले.
तामिळनाडूचा उत्साह
तामिळनाडूच्या उत्साहाचा उल्लेख करत शतकांपासून हे राज्य, देशासाठी मार्गदर्शक ठरल्याचे पंतप्रधान म्हणाले. तामिळनाडूचा आणि तमिळ जनतेचा उत्साह मला अचंबित करतो. शतकांपासून तामिळनाडू देशासाठी मार्गदर्शक राज्य आहे. आर्थिक यश आणि सामाजिक सुधारणा यांची सुरेख सांगड येथे आहे. जगातल्या सर्वात प्राचीन भाषेचे हे माहेरघर आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघासमोरच्या भाषणात तमिळ भाषेतल्या काही ओळी नमूद केल्या होत्या असे पंतप्रधानांनी सांगितले.
तामिळनाडूसाठी डिफेन्स कॉरीडॉर
तामिळनाडूच्या प्रगतीचा उल्लेख करत राज्याच्या प्रगतीसाठी तामिळनाडूमध्ये एक संरक्षण कॉरीडॉर उभारण्यासारखी अनेक पावले केंद्र सरकार उचलत आहे. गेल्या काही वर्षात तामिळनाडूच्या प्रगतीसाठी अभूतपूर्व प्रयत्न सुरू असल्याचे पंतप्रधान म्हणाले. दोन संरक्षण कॉरिडॉर उभारण्याचा महत्वाकांक्षी निर्णय आम्ही घेतला तेव्हा त्यापैकी एकासाठी तामिळनाडूला निश्चितच पसंती होती. या कॉरिडॉरमुळे राज्यात अधिक उद्योग येऊन तमिळ युवकांसाठी रोजगाराच्या संधीत वाढ होईल.
वस्त्रोद्योग आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना
राज्यातल्या वस्त्रोद्योग क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
तामिळनाडूच्या प्रगतीत वस्त्रोद्योग क्षेत्राची महत्वाची भूमिका आहे. या क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रमाअंतर्गत वित्तीय सहाय्य पुरविण्यात येत आहे. दोन मोठी हातमाग संकुले उभारण्यात येत आहेत. यंत्रांच्या आधुनिकीकरणासाठी संसाधनांचे वाटप करण्यात आले आहे.
मत्स्योत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हे क्षेत्र झपाट्याने पुढे येत असून त्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत.
तंत्रज्ञान, वित्तीय सहाय्य आणि मनुष्यबळ विकास यावर आमचा भर आहे. काही दिवसांपूर्वीच खोल समुद्रासाठीच्या मच्छिमार बोटी आणि ट्रान्सपॉन्डरचे तामिळनाडूच्या मच्छिमारांना वाटप करण्यात आले. किसान क्रेडीट कार्डशी शेतकरी जोडले गेले आहेत. मच्छिमारांसाठी नवी मच्छिमार बंदरे उभारण्यात येत आहेत. मच्छिमार नौका आधुनिकीकरणासाठीही सहाय्य देण्यात येत आहे.
पर्यटनाला चालना
येत्या दोन वर्षात भारतातल्या किमान 15 ठिकाणांना भेट देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी प्रत्येकाला केले आहे. केंद्र सरकार पर्यटन क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करत असून जागतिक आर्थिक मंचाच्या पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत 34 व्या स्थानावर आहे. 2014 मध्ये रालोआ सरकार सत्तेवर आले त्यावेळी 65 व्या स्थानावर होता.
गेल्या पाच वर्षात भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे हे सांगताना मला आनंद होत आहे. या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने पर्यटनातून होणाऱ्या परकीय चलनातही वृद्धी झाली. केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनेतून तामिळनाडूला मोठा लाभ होत आहे. हे ऐकून आपल्याला आनंद होईल. चेन्नई ते कन्याकुमार, कांचीपूरम, वेल्लनकली परिक्रमा अधिक पर्यटक स्नेही करण्यात येत आहे.
नव भारत-नवे दशक
भारत नव्या दशकात प्रवेश करत असून जनताच भारताच्या यशोगाथेसाठी मार्गदर्शक ठरेल आणि देशाला नव्या उंचीवर नेईल. आपली थोर संस्कृती दोन कारणांमुळे समृद्ध झाली असे मला वाटते एक म्हणजे भारतातल्या सलोखा, विविधता आणि बंधुत्वाचा उत्सव आणि दुसरे म्हणजे भारतीय जनतेची इच्छा. भारतातली जनता जेव्हा एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करते तेव्हा ती साध्य करण्यासाठी त्यांना कोणीही रोखू शकत नाही. माध्यमांनी या भावनेचा आदर करावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
सरकार किंवा माध्यम समूहांनी या भावनेचा आदर करायला हवा. माध्यमांच्या भूमिकेची मी प्रशंसा करू इच्छितो. स्वच्छता, एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर टाळणे, पर्यावरण रक्षण यासारख्या राष्ट्रउभारणीतल्या महत्वाचे उपक्रम पुढे नेण्यात माध्यमांनी हातभार लावला आहे. आगामी काळातही हीच भावना अधिक दृढ होईल अशी आशा बाळगत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
Here is my message at the programme marking 50 years of Thuglak. Paid tributes to the versatile and indomitable Cho, highlighted how the spirit of 130 crore Indians is powering transformations and some of the Centre’s efforts for Tamil Nadu’s progress. https://t.co/6mnUz0wZsO
— Narendra Modi (@narendramodi) January 14, 2020