पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 16 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. पूर्व आशिया शिखर परिषद आणि आसियानचा अध्यक्ष म्हणून ब्रुनेईने 16 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेचे (ईएएस )आयोजन केले होते. यात आसियान देश आणि ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, दक्षिण कोरिया, रशिया, अमेरिका आणि भारत यासह इतर पूर्व आशिया शिखर परिषदेतील सहभागी देशांचे प्रमुख उपस्थित होते. भारताचा ईएएस मध्ये सक्रिय सहभाग असतो. पंतप्रधानांची उपस्थिती असलेली ही सातवी पूर्व आशिया शिखर परिषद होती.
शिखर परिषदेतील आपल्या भाषणात, पंतप्रधानांनी हिंद-प्रशांत क्षेत्रातील देशांना महत्त्वाच्या धोरणात्मक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आणण्याच्या दृष्टीने प्रमुख नेत्यांचा मंच म्हणून पूर्व आशिया शिखर परिषदेचे महत्व अधोरेखित केले. लस आणि वैद्यकीय सामुग्रीच्या पुरवठ्याद्वारे कोविड-19 महामारीविरोधात लढण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी माहिती दिली. महामारीनंतर अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी आणि लवचिक जागतिक मूल्य साखळी सुनिश्चित करण्यासाठी "आत्मनिर्भर भारत" अभियानाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. अर्थव्यवस्था आणि पर्यावरण तसेच हवामान संबंधी शाश्वत जीवनशैली यांच्यात अधिक चांगला समतोल साधण्यावर त्यांनी भर दिला.
16 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत हिंद-प्रशांत, दक्षिण चीन समुद्र, यूएनसीएलओएस (UNCLOS),दहशतवाद आणि कोरियन बेट आणि म्यानमारमधील परिस्थिती यासह महत्त्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली. पंतप्रधानांनी हिंद-प्रशांतमधील "आसियानच्या मध्यवर्ती स्थानाचा " पुनरुच्चार केला आणि आसियान आऊटलूक इंडो-पॅसिफिक (AOIP) आणि भारताच्या इंडो-पॅसिफिक ओशन्स इनिशिएटीव्ह (IPOI) वरील समन्वयाचा उल्लेख केला.
पूर्व आशिया शिखर परिषद देशाच्या नेत्यांनी मानसिक आरोग्य, पर्यटनाद्वारे आर्थिक पुनर्विकास आणि शाश्वत सुधारणा यावरील तीन निवेदने स्वीकारली, जी भारताने सहप्रायोजित केली आहेत. एकूणच, या शिखर परिषदेत पंतप्रधान आणि इतर पूर्व आशिया शिखर परिषद देशाच्या नेत्यांमध्ये विचारांची यशस्वी देवाणघेवाण झाली.