पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंगडमचे राजे चार्ल्स तृतीय यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
यूकेच्या सार्वभौम पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राजे चार्ल्स यांच्याबरोबरचे पंतप्रधानांचे हे पहिलेच संभाषण असल्याने, पंतप्रधानांनी राजे चार्ल्स तृतीय यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
या संभाषणादरम्यान, हवामान बदलाबाबत कृती, जैवविविधतेचे संवर्धन, ऊर्जा-संक्रमणाला अर्थपुरवठा करण्यासाठी नवोन्मेषी उपाय इत्यादींसह परस्पर हिताच्या अनेक विषयांवर चर्चा झाली. या मुद्द्यांवर राजे चार्ल्स तृतीय यांचे कायम स्वारस्य आणि समर्थनाबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली.
डिजिटल सार्वजनिक वस्तूंच्या प्रचारासह जी20 अध्यक्षपदासाठी भारताच्या प्राधान्यक्रमांबद्दल पंतप्रधानांनी राजे चार्ल्स तृतीय यांना माहिती दिली. त्यांनी मिशन लाईफ (LiFE)- पर्यावरणासाठी जीवनशैली, याची प्रासंगिकता देखील स्पष्ट केली, ज्याद्वारे भारत पर्यावरण दृष्ट्या शाश्वत जीवनशैलींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो.
राष्ट्रकुल देश आणि त्यांचे कार्य आणखी मजबूत कसे करता येईल यावर नेत्यांनी विचारांचे आदान-प्रदान केले. दोन्ही देशांमधील "जिवंत सेतू" म्हणून काम करणाऱ्या आणि द्विपक्षीय संबंध समृद्ध करणाऱ्या यूकेमधील भारतीय समुदायाच्या भूमिकेचीही दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली.