"राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून भारताच्या प्रगतीचा वेग आणि व्याप्ती दिसून आली "
“घराणेशाहीचे राजकारण हे भारताच्या लोकशाहीसाठी चिंतेचे कारण आहे”
“तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल ही मोदींची हमी आहे.”
"पहिल्या कार्यकाळात आम्ही आधीच्या सरकारांनी केलेले खड्डे भरत राहिलो, दुसऱ्या कार्यकाळात आम्ही नवभारताची पायाभरणी केली , तिसऱ्या कार्यकाळात आम्ही विकसित भारताच्या निर्मितीला गती देऊ"
"उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत लोकांनी प्रलंबित प्रकल्प कालबद्ध रीतीने पूर्ण होताना पाहिले आहेत"
"अयोध्येतील राम मंदिर भारताच्या महान संस्कृती आणि परंपरेला ऊर्जा देत राहील"
"सरकारचा तिसरा कार्यकाळ पुढील 1000 वर्षांसाठी भारताचा पाया रचेल"
"आता भारतात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे देशातील मुलींसाठी दरवाजे बंद आहेत"
"भारतमाता आणि तिच्या 140 कोटी नागरिकांच्या विकासासाठी मी तुमचा पाठिंबा मागतो"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. अभिभाषणासाठी नवीन संसद भवनात राष्ट्रपती आणि  त्यांच्यापाठोपाठ उर्वरित संसद सदस्यांचे आगमन झाल्यावर त्यांना अभिमानाने आणि आदरपूर्वक सभागृहात घेऊन जाताना सेंगोल सर्वात पुढे होते असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ही  परंपरा सभागृहाची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढवते असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की 75 वा प्रजासत्ताक दिन, नवीन संसद भवन आणि सेंगोलचे नेतृत्व हे संपूर्ण दृश्य अतिशय प्रभावी होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेत आपले विचार आणि कल्पना मांडल्याबद्दल सभागृहातील सदस्यांचे  त्यांनी आभार मानले.

राष्ट्रपतींचे अभिभाषण हा वस्तुस्थितीच्या बाबतीत एक मोठा दस्तावेज आहे ज्यातून भारताच्या प्रगतीचा वेग आणि व्याप्ती दिसून येते असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  नारी शक्ती,युवा शक्ती, गरीब आणि अन्नदाता  हे चार स्तंभ विकसित केले, मजबूत केले तरच देश अधिक वेगाने विकसित होईल याकडे त्यांनी  लक्ष वेधले. या चार स्तंभांना बळकट करून  विकसित भारत होण्याचा देशाचा मार्ग या अभिभाषणाने प्रकाशमान केला आहे  असे ते म्हणाले.

प्रबळ विरोधी पक्षाच्या आवश्यकतेवर भर देत पंतप्रधान म्हणाले की, घराणेशाहीचे राजकारण भारताच्या लोकशाहीसाठी चिंतेचे कारण आहे. घराणेशाहीच्या राजकारणाचा अर्थ  सांगताना पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की जो राजकीय पक्ष एक कुटुंब चालवतो, कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य देतो आणि जिथे सर्व निर्णय कुटुंबातील सदस्य घेतात ते घराणेशाहीचे राजकारण मानले जाते.   कुटुंबातील अनेक सदस्य जनतेच्या पाठिंब्यावर स्वबळावर राजकारणात पुढे येतात ते  नव्हे. “राजकारणात आलेल्या सर्व युवा मंडळींचे मी स्वागत करतो जे देशाची सेवा करण्यासाठी येथे आले आहेत” असे सांगत  पंतप्रधान मोदी यांनी लोकशाहीला घराणेशाहीच्या राजकारणामुळे असलेल्या धोक्यांकडे लक्ष वेधले. राजकारणात अशा संस्कृतीचा उदय झाल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला .  देशात होत असलेली विकासकामे कोणा  एका व्यक्तीसाठी नसून प्रत्येक नागरिकासाठी आहेत असे ते म्हणाले.

जगभरात प्रशंसा होत असलेल्या भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना, पंतप्रधान म्हणाले, "सध्याच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल या, ही मोदींची हमी आहे". ते म्हणाले की, जी-20 शिखर परिषदेच्या यशाने भारताविषयीचा जगाचा दृष्टीकोन आणि मत सिद्ध केले आहे. देशाला समृद्धीकडे नेण्यामधील सरकारची भूमिका अधोरेखित करताना, पंतप्रधान मोदी यांनी मागील सरकारने 2014 मध्ये सभागृहात मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प आणि तत्कालीन अर्थमंत्र्यांच्या निवेदनाकडे लक्ष वेधले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, तत्कालीन अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान, जीडीपीच्या आकारमानानुसार भारत ही 11वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याची माहिती दिली होती, आणि आज आपला देश 5 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तत्कालीन अर्थमंत्र्यांचा हवाला देत पंतप्रधान म्हणाले की पुढील 3 दशकांत आपला देश यूएसए आणि चीननंतर जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. पंतप्रधान म्हणाले, “आज मी देशाला आश्वासन देतो की, सध्याच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.” सरकारच्या कामाचा वेग तसेच सरकारची मोठी उद्दिष्टे आणि धैर्य याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. सध्याच्या सरकारने ग्रामीण भागातील गरिबांसाठी 4 कोटी घरे आणि शहरी गरिबांसाठी 80 लाख पक्की घरे बांधल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. गेल्या 10 वर्षात 40,000 किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले, 17 कोटी अतिरिक्त गॅस कनेक्शन देण्यात आली आणि स्वच्छतेची व्याप्ती 40 टक्क्यांवरून 100 टक्क्यावर गेली.

पूर्वीच्या सरकारांमध्ये लोक-कल्याणाप्रति उदासीनता होती, आणि भारताच्या नागरिकांवर विश्वास नव्हता, असे अधोरेखित करून, भारतीय नागरिकांचे सामर्थ्य आणि क्षमतांवर सध्याच्या सरकारचा विश्वास असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, "पहिल्या कार्यकाळात  आम्ही आधीच्या सरकारांनी दुर्लक्षित ठेवलेली कामे केली, दुसऱ्या कार्यकाळात आम्ही नव्या भारताचा पाया घातला, तिसऱ्या कार्यकाळात आम्ही विकसित भारताच्या विकासाला गती देऊ." पंतप्रधानांनी पहिल्या कार्यकाळातील योजनांची यादी सांगताना, स्वच्छ भारत, उज्ज्वला, आयुष्मान भारत, बेटी बचाओ, बेटी पढाओ, सुगम्य भारत, डिजिटल इंडिया आणि जीएसटीचा  उल्लेख केला. त्याचप्रमाणे, सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात देशाने कलम 370 रद्द करणे, नारी शक्ती वंदन अधिनियम पारित करणे, भारतीय न्याय संहिता स्वीकारणे, 40,000 हून अधिक कालबाह्य कायदे रद्द करणे आणि वंदे भारत आणि नमो भारत रेल्वे गाड्या सुरू करणे ही कामे पाहिली. "उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, लोकांनी प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण होताना पाहिले आहेत", ते म्हणाले. विकसित भारत संकल्प यात्रेने प्रत्येकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचे सरकारचे समर्पण आणि दृढनिश्चय दर्शविल्याचे त्यांनी नमूद केले. राम मंदिरामधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्या विषयी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “अयोध्येतील राम मंदिर भारताची महान संस्कृती आणि परंपरेला अखंड ऊर्जा देत राहील”.

विद्यमान सरकारचा तिसरा कार्यकाळ महत्त्वाच्या निर्णयांवर केंद्रित असेल यावर पंतप्रधान मोदी  यांनी भर दिला. “सरकारचा तिसरा कार्यकाळ पुढील 1000 वर्षांसाठी देशाचा पाया रचेल”, असे पंतप्रधानांनी नमूद  केले.देशातील 140 कोटी नागरिकांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत.

गरिबांना योग्य संसाधने उपलब्ध करुन दिल्यास आणि त्यांच्यात स्वाभिमान निर्माण केला तर गरिब गरिबीवर मात करू शकतो, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 50 कोटी गरीबांची स्वतःची बँक खाती आहेत , 4 कोटी लोकांकडे स्वतःची घरे, 11 कोटी लोकांना नळ जोडणी, 55 कोटींकडे आयुष्मान कार्ड असून 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळाल्याचा  मोदी यांनी उल्लेख केला. “ज्यांची पूर्वी कोणालाही चिंता नव्हती त्यांची चिंता मोदींना आहे”, असे सांगत ,फेरीवाल्यांसाठी व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देणारी पीएम स्वनिधी योजना,कारागीर आणि हस्तकलाकारांसाठी असलेली विश्वकर्मा योजना, विशेषत: असुरक्षित आदिवासी गटांसाठी असलेली  पीएम जन मन योजना, सीमावर्ती भागाच्या विकासासाठी व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम, भरडधान्य उत्पादनावर लक्ष केंद्रित करणे, स्थानिकांकडून उत्पादने खरेदी करण्यासाठी व्होकल फॉर लोकल अभियान  आणि खादी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी कर्पूरी ठाकूर यांना  भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याकडे आणि मागील सरकारांकडून या महान व्यक्तिमत्त्वाचा कशाप्रकारे  अपमान केला गेला याकडे लक्ष वेधले. कर्पूरी ठाकूर 1970 च्या दशकात बिहारचे मुख्यमंत्री असताना त्यांचे सरकार उलथून टाकण्यासाठी झालेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी  आठवण त्यांनी करून दिली.

भारताच्या स्त्री शक्तीला सक्षम करण्यासाठी सरकारचे योगदान पंतप्रधानांनी अधोरेखित केले."आता भारतातील असे एकही क्षेत्र नाही जिथे देशातील मुलींसाठी दरवाजे बंद आहेत.त्या लढाऊ विमाने देखील उडवत आहेत आणि सीमा देखील सुरक्षित ठेवत आहेत”,असे पंतप्रधानांनी अभिमान व्यक्त करत सांगितले. 10 कोटींहून अधिक सदस्य असलेल्या आणि भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या महिला बचत गटांच्या क्षमतांवर त्यांनी विश्वास व्यक्त केला. येत्या काही वर्षांत देश 3 कोटी लखपती दिदींचा साक्षीदार होणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. मानसिकतेत  बदल होऊन आता मुलीचा जन्म साजरा केला जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि महिलांचे जीवन सुसह्य करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांबद्दल तपशीलवार माहिती दिली.

कृषी क्षेत्रासाठीची वार्षिक तरतूद मागील सरकारच्या काळातील 25,000 कोटी रुपयांवरून आता 1.25 लाख कोटी रुपये करण्यात आली आहे, असे शेतकरी कल्याणाबाबत बोलताना पंतप्रधानांनी सांगितले. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना 2,80,000 कोटी रुपये, पीएम पीक विमा योजनेअंतर्गत 30,000 रुपयांच्या हप्त्यापोटी 1,50,000 कोटी रुपये, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्रासाठी समर्पित मंत्रालय आणि मच्छीमार आणि पशुपालकांसाठी पीएम किसान क्रेडिट कार्डची निर्मिती केल्याचे ते म्हणाले. प्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी लाळ्या खुरकूत  आजाराच्या प्रतिबंधासाठी  50 कोटी लसीकरणाचाही त्यांनी उल्लेख केला.

भारतातील युवकांसाठी निर्माण करण्यात आलेल्या संधींवर अधिक प्रकाश टाकत पंतप्रधानांनी स्टार्ट अपचे युग, युनिकॉर्न्स, डिजिटल सर्जकांचा उदय तसेच जीआयएफटी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीबद्दल चर्चा केली. भारत देश आज जगातील आघाडीची डिजिटल अर्थव्यवस्था असलेला देश झाला आहे आणि त्यामुळे भारतातील तरुणांसाठी असंख्य नव्या संधी निर्माण होणार आहेत ही बाब पंतप्रधान मोदी यांनी यावेळी अधोरेखित केली. भारतात होत असलेले मोबाईल फोन्सचे उत्पादन तसेच देशातील स्वस्त दरात उपलब्ध डाटा यांचा देखील त्यांनी उल्लेख केला. देशातील पर्यटन क्षेत्र आणि हवाई वाहतूक क्षेत्र यांमध्ये घडून आलेल्या विकासाची देखील त्यांनी दखल घेतली. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना देशातील युवकांना रोजगाराच्या संधी आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या सरकारने स्वीकारलेल्या दृष्टिकोनावर अधिक भर दिला.

वर्ष 2014 पूर्वी देशाच्या पायाभूत सुविधांसाठी असलेल्या 12 लाख कोटी रुपयांच्या तरतुदीत गेल्या 10 वर्षात भरीव वाढ झाली असून आता ही तरतूद 44 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली. सुयोग्य यंत्रणा तसेच आर्थिक धोरणे विकसित करून भारताला जगाचे प्रमुख संशोधन आणि नवोन्मेष केंद्र म्हणून घडवण्यासाठी आपण देशातील युवकांना प्रोत्साहन देत आहोत याचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला. देशाला उर्जा निर्मिती क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी भारत हरित हायड्रोजन तसेच सेमीकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणुकीत आघाडीवर आहे हा मुद्दा देखील मांडला.

पंतप्रधानांनी वस्तूंच्या दरवाढीचा देखील उल्लेख केला आणि वर्ष 1974 मध्ये महागाईचा दर 30% होता याची आठवण करून दिली. दोन युद्धे आणि कोरोना महामारीच्या परिस्थितीत देखील देशातील वस्तूंच्या किंमती नियंत्रणात ठेवल्याबद्दल त्यांनी आज  सरकारचे कौतुक केले. एकेकाळी या सभागृहातील चर्चा देशात झालेल्या घोटाळ्यांच्या विषयाभोवती फिरत असे याची आठवण पंतप्रधान मोदी यांनी सभागृहातील उपस्थितांना करून दिली. आधीच्या सरकारच्या काळापासून आतापर्यंत पीएमएलए अंतर्गत नोंदल्या जाणाऱ्या प्रकरणांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे आणि सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या जप्तीची रक्कम 5000 कोटी रुपयांवरुन 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती त्यांनी दिली. थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून आतापर्यंत 30 लाख कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले अशी माहिती देऊन ते पुढे म्हणाले की, “ताब्यात घेण्यात आलेली सगळी रक्कम गरिबांच्या कल्याणासाठी वापरण्यात आली.”

भाषणात शेवटी, भ्रष्टाचाराशी लढण्याची शपथ घेऊन पंतप्रधान म्हणाले, “ज्यांनी देशाला लुबाडले आहे त्यांना त्याची किंमत चुकती करावी लागेल.” देशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करत पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद अजिबात खपवून न घेण्याचे भारताचे धोरण अनुसरणे जगासाठी अनिवार्य आहे या गोष्टीचा पुनरुच्चार केला. फुटीरतावादी विचारसरणीचा निषेध करत त्यांनी भारताच्या संरक्षण दलांमध्ये असलेल्या क्षमतांविषयी अभिमान तसेच विश्वास व्यक्त केला. जम्मू आणि काश्मीर भागात होता असलेल्या विकासाची देखील त्यांनी प्रशंसा केली.

देशाच्या विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या इराद्याने पुढे येण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी सभागृहातील सदस्यांना केले. “भारतमाता आणि तिचे 140 कोटी नागरिक यांच्या विकासासाठी मी तुमचा पाठींबा मागतो आहे,” असे बोलून पंतप्रधानांनी भाषण संपवले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi