
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज व्हिडिओ संदेशाद्वारे भाषण दिले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देश त्यांचे आदरपूर्वक स्मरण करत आहे, असे पंतप्रधानांनी या निमित्ताने जनतेला शुभेच्छा देताना सांगितले. यावर्षी पराक्रम दिनाचा भव्य सोहळा नेताजींच्या ओदिशामधील जन्मस्थळी आयोजित केला जात असल्याचे पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहताना सांगितले. त्यांनी या प्रसंगी ओदिशा सरकारचे आणि जनतेचे अभिनंदन केले. ओदिशातील कटक येथे नेताजींच्या जीवन वारशावर आधारित एक विशाल प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अनेक कलाकारांनी नेताजींच्या जीवनाशी संबंधित घटना कॅनव्हासवर चित्रित केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. नेताजींवर आधारित अनेक पुस्तके देखील या प्रदर्शनात मांडल्याचे त्यांनी सांगितले. नेताजींच्या जीवन प्रवासातील हा संपूर्ण वारसा माझा युवा भारत किंवा माझा भारत यांना नवीन ऊर्जा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“आज जेव्हा आपण विकसित भारताचा (विकसित भारत) संकल्प साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, तेव्हा नेताजी सुभाष यांच्या जीवनाचा वारसा आपल्याला सतत प्रेरणा देईल”, असे पंतप्रधान म्हणाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे ध्येय ‘आझाद हिंद’ होते, असे पंतप्रधान म्हणाले. हा संकल्प साध्य करण्यासाठी ते एकाच निकषावर म्हणजे - आझाद हिंदवर ठाम राहिले, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. नेताजींचा जन्म एका समृद्ध कुटुंबात झाला होता. ते नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ब्रिटिश सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी होऊ शकले असते आणि आरामदायी जीवन जगू शकले असते. मात्र, नेताजींनी स्वातंत्र्यप्राप्तीचा अडचणी आणि आव्हानांनी भरलेला मार्ग निवडला आणि ध्येयासक्त होऊन भारतात आणि इतर देशांमध्ये भटकंती केली, असेही त्यांनी सांगितले. “नेताजी सुभाष हे कम्फर्ट झोनमध्ये राहून त्यात मिळणाऱ्या सुखसोयींना बांधलेले नव्हते”, असे ते म्हणाले. “विकसित भारत निर्माण करण्यासाठी आज आपण सर्वांनी आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्याची गरज आहे”, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. जागतिक स्तरावर सर्वोत्तम बनण्याचे, उत्कृष्टतेची निवड करण्याचे आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
नेताजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौजेची स्थापना केली. आझाद हिंद सेनेत देशाच्या प्रत्येक प्रदेशातील आणि वर्गातील शूर पुरुष आणि महिलांचा समावेश होता, असे पंतप्रधान म्हणाले. या सर्वांच्या भाषा वेगवेगळ्या असूनही त्यांच्या हृदयात देशाचे स्वातंत्र्य ही एकसमान भावना होती, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आज ही एकतेची हीच भावना विकसित भारतासाठी एक महत्त्वाचा धडा आहे, असे ते म्हणाले. त्या काळात ज्याप्रमाणे स्वराज्यासाठी एकता आवश्यक होती, तशीच आता विकसित भारतासाठी देखील ती अत्यंत महत्त्वाचीच आहे ही बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अधोरेखित केली.
सध्या जागतिक स्तरावर भारताच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अधोरेखित केले. भारत २१ व्या शतकाला भारत कशारितीने स्वतःचे शतक बनवणार आहे, याकडे जग लक्ष ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितले. आपण नेताजी सुभाष यांच्याकडून प्रेरणा घेत देशाच्या एकतेवर भर देणे किती महत्वाचे आहे याचे महत्वही त्यांनी उपस्थितांसमोर विषद केले. देशाला कमकुवत करू पाहणाऱ्यांपासून तसेच देशाची एकता भंग करणाऱ्यांपासून सावध राहायला हवे असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.
नेताजी सुभाष यांना भारताच्या वारशाचा खूप अभिमान होता आणि ते कायमच भारताच्या समृद्ध लोकशाही इतिहासाबद्दल बोलत असत, आणि लोकांना त्यापासून प्रेरणा घेण्याकरता प्रोत्साहन देत असत असे त्यांनी सांगितले. आज भारत वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडत आहे आणि आपल्या वारशाचा अभिमान बाळगत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे ही बाबही त्यांनी नमूद केली. आझाद हिंद सरकारच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणे हा अविस्मरणीय ऐतिहासिक प्रसंग असून, आपल्यासाठी हा सन्मानाचा क्षण होता अशी भावना त्यांनी व्यक्त केली. नेताजींच्या वारशाने प्रेरित होऊन केंद्र सरकारने 2019 मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना समर्पित असलेले संग्रहालय उभारले, तसेच त्याच वर्षी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारांचाही प्रारंभ केल्याचे त्यांनी सांगितले. 2021 मध्ये सरकारने नेताजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला, इंडिया गेटजवळ नेताजींचा भव्य पुतळा उभारला, अंदमानमधील बेटाला नेताजींचे नाव दिले. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना अभिवादन केले, या सगळ्या घडामोडी म्हणजे नेताजींच्या वारशाचा सन्मान करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
वेगवान विकासामुळे सामान्य माणसाचे जीवन सुकर होते आणि लष्करी सामर्थ्यही वाढते, हे देशाने गेल्या दहा वर्षांत दाखवून दिले असल्याची बाब पंतप्रधानांनी ठळकपणे अधोरेखित केली. गेल्या दशकभरात देशातल्या 25 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले आहे, आणि ही मोठी यशोगाथा आहे ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. आज गाव असो वा शहर, सर्वत्र आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. आजच्या घडीला भारतीय सैन्याच्या सामर्थ्यात अभूतपूर्व वाढ झाली असल्याबाबत आणि जागतिक स्तरावर भारताची भूमिकाही विस्तारत असल्याविषयी त्यांनी उपस्थितांना सांगितले. आता भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल, आणि तो दिवस फारसा दूर नाही असा ठाम विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. आपण सगळ्यांनीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे, आणि एक लक्ष्य, एक ध्येय ठेवून विकसित भारतासाठी सातत्यपूर्णतेने काम करत राहिले पाहिजे, हीच नेताजींना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर सर्वांना शुभेच्छा देत पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाचा समारोप केला.