पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे एस एन गोएंका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर चाललेल्या सोहळ्याच्या समारोप समारंभाला संबोधित केले.
विपश्यना ध्यानसाधनेचे गुरु, आचार्य एस एन गोयंका यांच्या वर्षभरापूर्वी जन्मशताब्दी सोहळ्याच्या प्रारंभाचे स्मरण करून, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की राष्ट्राने ‘अमृत महोत्सव’ साजरा केला आणि त्याच वेळी कल्याण मित्र गोयंका यांच्या आदर्शांचेही स्मरण केले. आज जेव्हा या उत्सवांची सांगता होत आहे, तेव्हा देश विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. गोयंका गुरुजी अनेकदा उद्धृत करत असलेल्या भगवान बुद्धांच्या मंत्राचा उल्लेख करत पंतप्रधानांनी त्याचा अर्थ स्पष्ट केला आणि ते म्हणाले, “एकत्र ध्यान केल्याने त्याचे प्रभावकारक परिणाम मिळतात. ही एकात्मतेची भावना आणि एकतेची शक्ती हाच विकसित भारताचा मुख्य आधार आहे. वर्षभर याच मंत्राचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी गोयंका यांच्याशी असलेल्या स्नेहबंधाची आठवण करत संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक धर्म परिषदेतील पहिल्या बैठकीनंतर गोयंका गुरुजींची गुजरातमध्ये अनेक वेळा भेट झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आचार्यांना त्यांच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यात पाहता आल्याबद्दल आणि त्या काळात आचार्यांना जवळून जाणून आणि समजून घ्यायला मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी स्वतःला भाग्यवान म्हणवले. गोयंका यांनी त्यांच्या शांत आणि गंभीर व्यक्तिमत्त्वात विपश्यना खोलवर आत्मसात केल्याबद्दल पंतप्रधानांनी भाष्य केले. यामुळेच गोयंका जिथेही गेले तिथे सात्विक वातावरण निर्माण झाले, असे पंतप्रधानांनी सांगितले. “‘एक जीवन, एक उद्देश’ चे उत्तम उदाहरण म्हणजे गोयंका यांचे जीवन. गोयंका यांचे एकच मिशन होते – विपश्यना! त्यांनी प्रत्येकाला विपश्यनेचे ज्ञान दिले”,असे पंतप्रधान म्हणाले. गोयंका यांनी मानवता आणि जगासाठी दिलेल्या प्रचंड योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
‘विपश्यना’ ही प्राचीन भारतीय जीवनशैलीकडून संपूर्ण जगाला मिळालेली अद्भूत देणगी असूनही, हा वारसा देशात दीर्घकाळ लोप पावला होता आणि विपश्यना शिकविण्याची आणि शिकण्याच्या कलेचाही शेवट झाल्याचे भासत होते, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. मात्र, म्यानमारमध्ये 14 वर्षांच्या तपश्चर्येनंतर गोएंका यांनी ज्ञान संपादन केले आणि भारताच्या विपश्यनेचे प्राचीन वैभव घेऊन ते मायदेशी परतले, असे पंतप्रधानांनी सांगितले. विपश्यनेचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की विपश्यना म्हणजे "स्व-निरीक्षणाद्वारे आत्म-परिवर्तनाचा मार्ग आहे." हजारो वर्षांपूर्वी जेव्हा विपश्यनेच्या साधनेची सुरुवात झाली तेव्हाही ती महत्वाची होती आणि विपश्यनेमध्ये वर्तमान आव्हानांचे निराकरण करण्याची शक्ती असून आजच्या आधुनिक काळात विपश्यना अधिक प्रासंगिक ठरत असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, गुरुजींच्या प्रयत्नांमुळे जगातील 80 हून अधिक देशांनी ध्यान साधनेचे महत्त्व समजून घेतले आहे आणि ते आत्मसात केले आहे. “आचार्य श्री गोयंका यांनी पुन्हा एकदा विपश्यनेला जागतिक ओळख प्राप्त करून दिली. आज भारत त्या संकल्पना पूर्ण ताकदीनिशी नव्याने विस्तारत चालला आहे”, असे नमूद करत पंतप्रधानांनी, संयुक्त राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला 190 हून अधिक देशांनी दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली, ज्यामुळे योग आज जागतिक स्तरावर जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.
विपश्यना योगाच्या विविध प्रक्रियांबाबत भारताच्या पूर्वजांनी संशोधन केले असले तरी, पुढील पिढ्या त्याचे महत्त्व विसरल्याबाबत पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. "विपश्यना, ध्यान, धारणा, यासारख्या साधनांकडे लोकांनी केवळ परित्यागाच्या भूमिकेतून पाहिले परंतु जीवनातील त्याचे महत्व लोक विसरले", असे त्यांनी नमूद केले आणि आचार्य श्री एस एन गोयंका यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या नेतृत्व गुणांबद्दल त्यांचे कौतुक केले. गुरुजींना उद्धृत करून पंतप्रधानांनी टिप्पणी केली, “आरोग्यसंपन्न जीवन ही आपल्या सर्वांची स्वतःसाठी सर्वात मोठी जबाबदारी आहे”. विपश्यनेचे फायदे अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, आजच्या आव्हानात्मक काळात विपश्यनेचा अवलंब करणे अधिक महत्त्वाचे झाले आहे कारण आजचे तरुण काम आणि जीवनशैलीतले संतुलन , असंतुलित जीवनशैली आणि इतर समस्यांमुळे विविध ताण तणावाचे बळी पडत आहेत. केवळ या तरुणांसाठीच नव्हे तर लहान आणि संयुक्त कुटुंबातील सदस्यांसाठी सुद्धा विपश्यना हा खूप मोठा उपाय आहे, जिथे वडीलधारी मंडळी खूप तणावाखाली जगत असतात असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. आपल्या प्रत्येकाने वडीलधारी मंडळींना अशा उपक्रमांशी जोडावे असे आवाहनही त्यांनी केले.
आपल्या विविध मोहिमांचा माध्यमातून आचार्य गोयंका यांनी प्रत्येकाचे जीवन शांत, आनंदी आणि सुसंवादी बनवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. भावी पिढ्यांनाही या मोहिमांचा लाभ मिळावा अशी आचार्य गोयंका यांची इच्छा होती आणि म्हणूनच त्यांनी आपल्या ज्ञानाचा विस्तार केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कुशल शिक्षकही घडवले. पंतप्रधानांनी पुन्हा एकदा विपश्यनेचे महत्व स्पष्ट करत सांगितले की हा एक आत्मिक प्रवास आहे आणि आत्मचिंतनाचा मार्ग आहे. तथापि, ही केवळ एक शैली नसून एक विज्ञान आहे. ते म्हणाले की, या विज्ञानाच्या परिणामांची आपल्याला माहिती असल्याने आता आधुनिक विज्ञानाच्या मानकांनुसार त्याचे पुरावे जगासमोर मांडण्याची गरज आहे. “जगभर या दिशेने आधीच बरेच काही केले जात असताना, जगाचे कल्याण करण्यासाठी नवीन संशोधनाचा वापर करून ते अधिक स्वीकारार्ह बनवण्यासाठी भारताने पुढाकार घेणे आवश्यक आहे”, ते पुढे म्हणाले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी आचार्य एसएन गोयंका यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे हे वर्ष सर्वांसाठी एक प्रेरणादायी काळ असल्याचे म्हटले आणि मानवसेवेसाठी त्यांचे प्रयत्न असेच पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त केला.