पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका व्हिडिओ संदेशाद्वारे आसाम रोजगार मेळाव्याला संबोधित केले.
मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी आसाम सरकारमध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी भर्ती झालेल्या युवकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. त्यांनी गेल्या महिन्यात बिहूच्या निमित्ताने केलेल्या आसाम दौऱ्याची आठवण काढताना सांगितले की, आसामी संस्कृतीच्या गौरवाचे प्रतीक असलेल्या त्या भव्य कार्यक्रमाची आठवण आजही त्यांच्या मनात ताजी आहे. आजचा रोजगार मेळावा आसाममधील युवकांच्या भविष्याप्रति असलेल्या गांभीर्याचे प्रतिबिंब आहे असे त्यांनी नमूद केले.याआधीही आसाममध्ये रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 40 हजाराहून अधिक युवकांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. आज सुमारे 45 हजार युवकांना नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आणि युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
"आसाममध्ये शांतता आणि विकासाच्या एका नवीन पर्वाला प्रारंभ झाला असून विकासाच्या या गतीमुळे आसाममध्ये प्रेरणा आणि सकारात्मकता पसरली आहे " असे पंतप्रधान म्हणाले. सरकारी भरती अधिक पारदर्शक करण्यासाठी आसाम सरकारने सुरू केलेल्या प्रक्रियेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्थापन केलेल्या ‘आसाम थेट भरती आयोगा’चा उल्लेख केला. त्यांनी नमूद केले की, पूर्वीच्या प्रक्रियेत प्रत्येक विभागाचे नियम वेगळे होते आणि उमेदवारांना वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागत होत्या , त्यामुळे अनेक पदांवर भरती वेळेवर पूर्ण होऊ शकली नाही. या सर्व प्रक्रिया आता अतिशय सुलभ करण्यात आल्या आहेत असे सांगून यासाठी त्यांनी आसाम सरकारचे अभिनंदन केले.
“स्वातंत्र्याच्या काळात आपण सर्वांनी आपल्या देशाला विकसित राष्ट्र बनवण्याची प्रतिज्ञा घेतली आहे”, अमृत काळातील पुढील 25 वर्षे आपल्या सेवाकाळातही महत्त्वाची असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. नियुक्त झालेल्यांचे वर्तन, विचारसरणी, काम करण्याप्रति दृष्टीकोन आणि जनतेवर होणार्या प्रभावाचे महत्त्व अधोरेखित करताना नवीन नियुक्ती प्रत्येक सामान्य नागरिकासाठी आसाम सरकारचा चेहरा असेल यावर पंतप्रधानांनी भर दिला. समाज हा आकांक्षी बनत असून कोणत्याही नागरिकाला विकासाची प्रतीक्षा करायची नाही, असे त्यांनी नमूद केले.““ट्वेंटी-20 क्रिकेटच्या या युगात, देशातील जनतेला त्वरित परिणाम हवे आहेत”,असे सांगत मोदी यांनी सरकारी यंत्रणांनी त्यानुसार स्वतःमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. देशातील नागरिकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधानांनी नवनियुक्त उमेदवारांना त्याच समर्पण भावनेने पुढे वाटचाल करण्याचे आवाहन केले ज्या भावनेने त्यांना इथवर आणले. नवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम तयार राहून समाज आणि यंत्रणा सुधारण्यात ते योगदान देऊ शकतात यावर त्यांनी भर दिला.
भारतातील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण अतिशय वेगाने करण्यासाठी लाखो कोटी रुपये खर्च केले जात असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देशभरामध्ये नवीन महामार्ग आणि द्रुतगती मार्ग, लोह मार्ग, बंदरे, विमानतळ आणि जलमार्ग, असे अनेक प्रकल्प पूर्ण झाल्याची त्यांनी उदाहरणे दिली. प्रत्येक नवीन पायाभूत सुविधा प्रकल्पामुळे प्रत्येक क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींना चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. विमानतळाच्या विकासासाठी अभियंते, तंत्रज्ञ, हिशेब तपासनीस, श्रमिक आणि विविध प्रकारची उपकरणे,साधने, स्टील, सिमेंट अशा अनेक गोष्टींची आवश्यकता असल्याचे त्यांनी उदाहरण दिले. रेल्वे मार्गांचे विस्तारीकरण आणि त्यांचे विद्युतीकरण यामुळे असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सरकारने राहणीमान सुलभतेवर भर दिला असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, 2014 पासून सरकारने शौचालये, गॅस जोडण्या , नळाने पाणी पुरवठा आणि वीज यांसारख्या सुविधासह सुमारे 4 कोटी पक्की घरकुले बांधून ती गरिबांना दिली आहेत. उत्पादन क्षेत्र, लॉजिस्टिक, कुशल कामगार आणि श्रमिक वर्ग, ज्यांनी ही घरकुले बांधण्यात आणि या सुविधांची व्यवस्था करण्यासाठी परिश्रम घेतले, त्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक पंतप्रधानांनी केले. रोजगार निर्मितीमध्ये आयुष्मान भारत योजनेची भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली आणि देशात अनेक नवीन रुग्णालये आणि दवाखाने स्थापन झाल्याचा उल्लेख केला. काही आठवड्यांपूर्वी एम्स गुवाहाटी आणि 3 वैद्यकीय महाविद्यालये समर्पित करण्याचा कार्यक्रम झाला, त्याचीही मोदी यांनी आठवण केली. गेल्या काही वर्षांत आसाममध्ये दंत चिकित्सा महाविद्यालयांचाही विस्तार झाला असल्याचे ते म्हणाले. यामुळे वैद्यकीय व्यवसायाशी निगडित तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
“ज्यांची दहा वर्षांपूर्वी कोणीही कल्पना केली नसेल अशा अनेक क्षेत्रात आज युवावर्ग पुढे जात आहे”, असे सांगून, पंतप्रधानांनी देशात तयार झालेल्या स्टार्टअप परिसंस्थेवर प्रकाश टाकला. यामुळे देशात लाखो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्यात मदत झाली आहे. कृषी, सामाजिक कार्यक्रम, सर्वेक्षण आणि संरक्षण क्षेत्रातील ड्रोनच्या वाढत्या मागणीचाही त्यांनी उल्लेख केला आणि त्यामुळे तरुणांसाठी नवीन संधी निर्माण झाल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत मोहिमेचाही उल्लेख केला. आता भारतात करोडो मोबाईल फोन्सचे उत्पादन होत असून त्यामुळे भारताच्या विकासात योगदान मिळत आहे. प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेल्या विस्तारित ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीचा संदर्भ देवून पंतप्रधान म्हणाले की, यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळाले आहे. फक्त एक योजना किंवा एक निर्णय लोकांच्या जीवनावर परिणाम करू शकतो, हे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले.
ईशान्येतील तरुण मोठ्या संख्येने विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे, हे अधोरेखित करून, त्याचे श्रेय सध्याच्या सरकारच्या धोरणांना असल्याने पंतप्रधानांनी नमूद केले. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून युवकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. नवीन भारताच्या उभारणीच्या दिशेनेही आम्ही वेगाने पावले उचलत आहोत”,असे सांगून पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.