गायत्री परिवाराने आयोजित केलेल्या अश्वमेध यज्ञाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. पंतप्रधानांनी ‘अश्वमेध यज्ञा’शी जोडले जाण्याबाबत आपल्या संबोधनाची सुरुवात करताना द्विधा मनस्थितीचा उल्लेख केला कारण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो असे ते म्हणाले. मात्र "जेव्हा आपण आचार्य श्री राम शर्मा यांच्या भावना जपण्यासाठी अश्वमेध यज्ञ पाहिला आणि त्यातला अभिप्रेत अर्थ जाणून घेतला, तेव्हा आपल्या शंका दूर झाल्या."असे त्यांनी सांगितले.
"गायत्री परिवाराने आयोजित केलेला अश्वमेध यज्ञ एक भव्य सामाजिक मोहीम बनला आहे," अशी प्रशंसा करत लाखो तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर नेण्यात आणि राष्ट्र उभारणीसाठी राबवत असलेल्या उपक्रमांबाबत त्यांची भूमिका पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केली. "युवकांच्या हाती आपल्या राष्ट्राचे भवितव्य आहे," असे सांगत भारताचे भाग्य घडवण्यात आणि त्याच्या विकासात योगदान देण्यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. गायत्री परिवाराला त्यांच्या या उदात्त प्रयत्नासाठी वचनबद्ध असल्याबाबत त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आचार्य श्री राम शर्मा आणि माता भगवती यांच्या शिकवणीतून अनेकांना प्रेरणा देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना पंतप्रधानांनी गायत्री परिवारातील अनेक सदस्यांशी असलेल्या त्यांच्या व्यक्तिगत संबंधांचे स्मरण केले.
तरुणांना व्यसनाच्या विळख्यातून वाचवणे आणि आधीच व्यसनग्रस्त झालेल्यांना आधार देणे आवश्यक आहे यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. "व्यसनामुळे व्यक्ती आणि समाजाचा नायनाट होत, त्यामुळे भयंकर नुकसान होते," असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले आणि तीन ते चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या अंमली पदार्थमुक्त भारतासाठी सरकारच्या वचनबद्धतेच्या निग्रहाचा ज्यात 11 कोटींहून अधिक लोक सहभागी झाले होते याचा पुनरुल्लेख केला. पंतप्रधानांनी सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या सहकार्याने आयोजित बाईक रॅली, शपथविधी समारंभ आणि पथनाट्यांसह व्यापक स्तरावर पोहोचण्याच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. पंतप्रधान त्यांच्या मन की बात मध्येदेखील व्यसनमुक्तीच्या प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व अधोरेखित करत आहेत.
"आपण आपल्या युवकांना मोठ्या राष्ट्रीय आणि जागतिक उपक्रमांसह एकत्रित केल्याने, ते लहान चुकीच्या गोष्टींपासून दूर राहतील," अशी टिप्पणी करत पंतप्रधान मोदी यांनी विकसित आणि आत्मनिर्भर भारताची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तरुणांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. "भारताच्या अध्यक्षतेखालील G-20 शिखर परिषदेची संकल्पना , 'एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य' ही आपल्या सामायिक मानवी मूल्ये आणि आकांक्षा यांचे उदाहरण आहे असे सांगत ‘एक सूर्य, एक जग, एक उर्जासंचय’ आणि 'एक जग, एक आरोग्य' अशा जागतिक उपक्रमांमध्ये सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. "अशा राष्ट्रीय आणि जागतिक मोहिमांमध्ये आपण आपल्या युवकांना जितके सामील करू तितके ते चुकीच्या मार्गापासून दूर राहतील," असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
क्रीडा आणि विज्ञानावर सरकारचे लक्ष केंद्रित असल्याचे स्पष्ट करताना "चांद्रयानच्या यशामुळे तरुणांमध्ये तंत्रज्ञानाची नवीन आवड निर्माण झाली आहे” असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी युवकांमधील उर्जेचे योग्य दिशेने वहन होण्यासाठी अशा उपक्रमांच्या परिवर्तनात्मक प्रभावावर भर दिला. फिट इंडिया चळवळ आणि खेलो इंडिया सारखे उपक्रम तरुणांना प्रेरित करतील आणि "प्रेरित तरुण व्यसनाकडे वळू शकत नाही." असे ते म्हणाले.
‘मेरा युवा भारत (MY भारत)’ या नव्या संघटनेचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी माहिती दिली की, 1.5 कोटींहून अधिक युवकांनी पोर्टलवर याआधीच नोंदणी केली असून राष्ट्र उभारणीसाठी युवाशक्तीचा योग्य वापर होत असल्याचं दिसत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी व्यसनाधीनतेचे विनाशकारी परिणाम मान्य केले आणि तळागाळापर्यंत मादक पदार्थांच्या सेवनाचे निर्मूलन करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला. मादक द्रव्यांच्या सेवनाविरोधात प्रभावी लढा देण्यासाठी समर्थ कौटुंबिक पाठबळ व्यवस्थेची गरज पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केली. "त्यामुळेच, व्यसनमुक्त भारताची उभारणी करण्यासाठी, कुटुंबांनी संस्था म्हणून मजबूत असणे अत्यावश्यक आहे," यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला.
"राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभात, भारतासाठी हजारो वर्षांचा नवीन प्रवास सुरू होत आहे" असे आपण सांगितले याची आठवण करून देत पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या गौरवशाली भविष्याकडे वाटचाल करण्याचा विश्वास व्यक्त केला. "या अमृत काळात, आपण या नवीन युगाच्या पहाटेचे साक्षीदार आहोत," असे सांगत वैयक्तिक विकासाच्या प्रयत्नातून राष्ट्रीय विकास साधत जागतिक नेता बनण्याच्या भारताच्या प्रवासाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आशावाद व्यक्त केला.