पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कडवा पाटीदार समाजाच्या 100 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी सनातनी शताब्दी महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.जगद्गुरू शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत प्रथमच कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
कडवा पाटीदार समाजाकडून समाजसेवेची 100 वर्षे, युवा शाखेचे 50 वे वर्ष आणि महिला शाखेचे 25 वे वर्ष यांच्या सुखद योगायोगाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आणि युवा व महिला जेव्हा समाजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात तेव्हा यश आणि समृद्धी निश्चित असते, असे सांगितले. श्री अखिल भारतीय कच्छ कडवा पाटीदार समाजाच्या युवा आणि महिला शाखेच्या निष्ठेची दखल घेऊन पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आपल्याला सनातनी शताब्दी महोत्सवात सहभागी करून घेतल्याबद्दल कडवा पाटीदार समाजाचे आभार मानले. “सनातन हा केवळ एक शब्द नाही, त्यात नित्य नूतन, परिवर्तनशीलता आहे. भूतकाळापेक्षा स्वतःला चांगले बनवण्याची अंतर्भूत इच्छा आहे आणि म्हणूनच शाश्वत, अमर आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
“कोणत्याही राष्ट्राचा प्रवास हा त्याच्या समाजाच्या वाटचालीचे प्रतिबिंब असते ”, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पाटीदार समाजाचा शेकडो वर्षांचा इतिहास आणि श्री अखिल भारतीय कच्छ कडवा समाजाची शंभर वर्षांची वाटचाल आणि भविष्यकाळाबद्दलचा दृष्टिकोन, हे एक प्रकारे भारत आणि गुजरात समजून घेण्याचे एक माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले. परकीय आक्रमकांनी या समाजावर शेकडो वर्षे अत्याचार केले मात्र या समाजाच्या पूर्वजांनी आपले अस्तित्व मिटू दिले नाही आणि आपली आस्था तुटू दिली नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
कच्छ कडवा पाटीदार समुदाय लाकूड, प्लायवूड, हार्डवेअर, संगमरवर तसेच बांधकाम साहित्य यांसारख्या क्षेत्रात त्यांच्या श्रम आणि क्षमतेने वाटचाल करत असल्याचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले कि या यशस्वी समाजाच्या आजच्या पिढीवर आपण शतकानुशतकांच्या त्यागाचा प्रभाव पाहत आहोत. परंपरांबद्दलचा आदर आणि सन्मान वर्षानुवर्षे वृद्धिंगत होत गेल्याबद्दल त्यांनी संतोष व्यक्त केला आणि समाजाने त्यांचे वर्तमान घडवले आणि भविष्याचा पाया घातला असे सांगितले.
राजकीय जीवन आणि समाजाशी असलेल्या बांधिलकी विषयी प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कडवा पाटीदार समाजासोबत अनेक विषयांवर काम केल्याची आठवण सांगितली. त्यांनी कच्छच्या भूकंपाचा उल्लेख केला आणि मदत आणि पुनर्बांधणीच्या प्रयत्नांमध्ये गुंतलेल्या समुदायाच्या सामर्थ्याची प्रशंसा केली आणि सांगितले की यामुळे त्यांना नेहमीच आत्मविश्वास मिळाला.
पाणीटंचाई, उपासमार, प्राण्यांचे मृत्यू, स्थलांतर आणि दुःख या समस्यांमुळे कच्छ हा देशातील सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून कसा ओळखला जात होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “परंतु गेल्या काही वर्षांत आम्ही एकत्र येऊन कच्छचे पुनरुज्जीवन केले आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. कच्छचे जलसंकट सोडवण्यासाठी आणि त्याचे जगातील एका मोठ्या पर्यटन स्थळात रूपांतर करण्यासाठी केलेल्या कामाचाहि त्यांनी उल्लेख केला आणि 'सबका प्रयास' चे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. कच्छ हा आज देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि या प्रदेशातील सुधारित कनेक्टिव्हिटी, मोठे उद्योग आणि कृषी निर्यातीची उदाहरणे दिली.
श्री अखिल भारतीय कच्छ कडवा पाटीदार समाज आणि नारायण रामजी लिंबानी यांच्याकडून प्रेरणा घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या लोकांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांवर प्रकाश टाकून पंतप्रधान म्हणाले की, या समाजाच्या कार्यांबद्दल आणि अभियानांबद्दल अद्ययावत माहिती ते नेहमी घेत असतात आणि कोरोना काळात या समाजाने केलेल्या कार्याविषयी त्यांनी समाजाची प्रशंसा केली. समाजाने पुढील 25 वर्षांचा दृष्टिकोन आणि संकल्प मांडले आहेत, जे देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल तेव्हा साकार होतील, याबद्दल मोदींनी आनंद व्यक्त केला. सामाजिक समरसता, पर्यावरण आणि नैसर्गिक शेती हे सर्व संकल्प देशाच्या अमृत संकल्पाशी निगडीत आहेत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. संबोधनाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की, श्री अखिल भारतीय कच्छ कडवा समाजाचे प्रयत्न अशाप्रकारे देशाच्या संकल्पांना बळ देतील आणि त्यांना यशस्वी बनवतील.