मान्यवर महोदय,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
माध्यमकर्मी मित्र,
आज भारत-सौदी अरेबिया यांच्यातील राजनैतिक भागीदारी परिषदेच्या पहिल्या नेतृत्व बैठकीत सहभागी होत असतांना मला अतिशय आनंद होत आहे.
2019 च्या माझ्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यादरम्यान आम्ही या परिषदेची घोषणा केली होती.
या चार वर्षात ही परिषद आमच्या राजनैतिक भागीदारीला अधिक दृढ करण्यासाठीचे एक प्रभावी माध्यम म्हणून विकसित झाली आहे.
मला आनंद आहे, या परिषदेच्या अंतर्गत, दोन्ही समित्यांच्या अनेक बैठका झाल्या, ज्यातून प्रत्येक क्षेत्रात आमचे परस्पर सहकार्य सातत्याने वाढत आहे.
बदलत्या काळाच्या गरजांच्या अनुरूप आम्ही आमच्या संबंधात नवे आणि आधुनिक आयाम जोडले आहेत.
भारतासाठी सौदी अरेबिया आमच्या सर्वात महत्वाच्या राजनैतिक भागीदारांपैकी एक आहे.
जगातील दोन मोठ्या आणि जलद गतीने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या रूपाने आमचे परस्पर सहकार्य संपूर्ण प्रदेशाची शांतता आणि स्थैर्य यासाठी महत्वाचे आहे.
मान्यवर महोदयांच्या सोबत झालेल्या बैठकीत आम्ही आमच्यातील ही घनिष्ट भागीदारी आणखी वरच्या पातळीवर घेऊन जाण्यासाठी अनेक उपक्रमांवर चर्चा केली.
आजच्या आमच्या बैठकीतून आमच्या संबंधाना एक नवी ऊर्जा, एक नवी दिशा मिळेल आणि आम्हाला एकत्रितपणे मानवतेच्या कल्याणासाठी काम करत राहण्याची प्रेरणा मिळेल.
काल आम्ही एकत्रितपणे भारत-पश्चिम आशिया आणि युरोप यांच्या दरम्यान आर्थिक मार्गिका निर्माण करण्यासाठी एक ऐतिहासिक सुरुवात केली.
ही मार्गिका केवळ दोन देशांनाच आपापसात जोडणार नाही, तर आशिया, पश्चिम आशिया आणि युरोप यांच्यातील आर्थिक सहकार्य, उर्जेचा विकास आणि डिजिटल जोडणीला बळ देईल.
मान्यवर महोदय, आपले नेतृत्व आणि आपल्या ‘व्हीजन 2030’ च्या माध्यमातून सौदी अरेबिया ज्या जलद गतीने आर्थिक आणि सामाजिक प्रगती करतो आहे, त्यासाठी मी मनापासून आपले खूप खूप अभिनंदन करतो.
सौदी अरबमध्ये मध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या हिताची सुरक्षा आणि त्यांच्या कल्याणासाठी आपण व्यक्त केलेल्या वचनबद्धतेसाठी आम्ही आपले खूप खूप आभार मानतो.
भारत आणि सौदी अरब यांच्यातील मैत्री, प्रादेशिक आणि वैश्विक स्थैर्य, समृद्धी आणि एकूणच मानवकल्याणासाठी अत्यंत महत्वाची आहे.
मी पुन्हा एकदा मान्यवर रॉयल हायनेस आणि आपल्या सर्वांचे जी-20 शिखर परिषदेच्या यशस्वितेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानतो. खूप खूप धन्यवाद !
आता मी आपल्याला आपले प्रारंभिक निवेदन करण्यासाठी आमंत्रित करतो.