मान्यवर,
नमस्कार !
दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेच्या अंतिम सत्रात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.
मला आनंद आहे, की आज संपूर्ण दिवसभर चाललेल्या या परिषदेत, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांपासून आफ्रिका, आशिया आणि पॅसिफिक बेटांमधील सुमारे 130 देशांनी सहभाग घेतला आहे.
एका वर्षाच्या आत ग्लोबल साऊथच्या दोन परिषदा होणे, आणि त्यात मोठ्या संख्येने आपल्या सर्वांनी सहभागी होणे, हाच संपूर्ण जगासाठी एक खूप मोठा संदेश आहे.
हा संदेश आहे, की ग्लोबल साऊथ ला आता आपली स्वायत्तता हवी आहे.
हा संदेश आहे की ग्लोबल साऊथला जागतिक प्रशासन व्यवस्थेत आपला आवाजही समाविष्ट व्हायला हवा आहे.
हा संदेश आहे, की ग्लोबल साऊथ, जागतिक स्तरावरील मोठी जबाबदारी घेण्यास सक्षम आणि सज्ज आहे.
मान्यवर,
आज या शिखर परिषदेने, पुन्हा एकदा आपल्याला, आपल्या सामाईक अपेक्षा आणि आकांक्षांवर चर्चा करण्याची संधी दिली आहे.
भारताला अभिमान आहे, की जी 20 सारख्या महत्वाच्या मंचाच्या अजेंडयावर, ग्लोबल साऊथचा आवाज मांडण्याची संधी भारताला मिळाली.
आणि याचे श्रेय, आपल्या सर्वांच्या मजबूत पाठिंब्याला आणि भारताप्रती आपल्या दृढ विश्वासाला आहे आणि यासाठी मी आपले मनापासून आभार मानतो.
आणि मला विश्वास वाटतो, की जी 20 शिखर परिषदेत जो आवाज बुलंद झाला आहे, त्याचा प्रतिध्वनी येत्या काळात, इतर जागतिक मंचावर देखील ऐकू येत राहणार आहे.
मान्यवर,
पहिल्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेत, मी काही कटिबद्धतांविषयी चर्चा केली होती.
मला हे सांगतांना आनंद होत आहे, की त्या सर्व बाबतीत प्रगती झाली आहे.
आज सकाळीच ‘दक्षिण’ नावाने, ग्लोबल साऊथ सेंटर ऑफ एक्सलन्स ची सुरवात केली गेली. हे केंद्र विकसनशील देशांच्या विकासाशी संबंधित मुद्यांवर अध्ययन करण्यावर भर देईल.
या उपक्रमामुळे ग्लोबल साऊथ मध्येच समस्यांवर काही व्यावहारिक उपाययोजना शोधल्या जातील.
आरोग्य मैत्री या उपक्रमाअंतर्गत, भारत मानवी मदतीसाठी आवश्यक औषधे आणि इतर गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध आहे.
गेल्या महिन्यात, आम्ही पॅलेस्टाईनला सात टन औषधे आणि वैद्यकीय सामग्री पाठवली होती.
तीन नोव्हेंबरला नेपाळ ला आलेल्या भूकंपानंतर भारताने नेपाळला देखील तीन टनांपेक्षा अधिक औषधांची मदत पाठवली होती.
ग्लोबल साउथसोबत डिजिटल आरोग्य सेवा वितरणातील आपली क्षमता सामायिक करण्याचा भारताला आनंद होईल.
ग्लोबल-साउथ विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रमाद्वारे, ग्लोबल साउथमधील आपल्या भागीदारांना क्षमताबांधणी आणि संशोधनासाठी मदत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.
"पर्यावरण आणि हवामान निरीक्षणासाठी जी 20 उपग्रह अभियान" यावरून मिळालेले हवामान आणि हवामान माहिती विशेषतः ग्लोबल साउथ देशांसोबत सामायिक केली जाईल.
मला आनंद आहे की , ग्लोबल साउथ शिष्यवृत्ती देखील सुरू झाली आहे. आता ग्लोबल साउथ देशांतील विद्यार्थ्यांना भारतात उच्च शिक्षणाच्या अधिक संधी मिळणार आहेत.
यावर्षी टांझानियामध्ये भारताचे पहिले भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे विद्यापीठ क्षेत्र देखील सुरु करण्यात आले आहे. ग्लोबल साउथमध्ये क्षमता बांधणीसाठी हा आमचा नवा उपक्रम आहे याचा इतर क्षेत्रांध्येही विस्तार केला जाईल.
आमच्या तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी , मी जानेवारीमध्ये ग्लोबल-साउथ युवा राजनैतिक अधिकारी मंचाचा प्रस्ताव ठेवला होता. आपल्या देशांतील तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश करून त्याची प्रारंभिक आवृत्ती लवकरच आयोजित केली जाईल
मान्यवर,
पुढील वर्षापासून भारतात वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद सुरू करण्याचा आमचा प्रस्ताव आहे. जो ग्लोबल साउथच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांवर लक्ष केंद्रित करेल.
ही परिषद "दक्षिण" केंद्राद्वारे ग्लोबल साउथची भागीदार संशोधन केंद्रे आणि तज्ज्ञगटाच्या सहकार्याने आयोजित केली जाईल.
ग्लोबल साउथच्या विकासा संबंधी समस्यांवर व्यावहारिक उपाय निश्चित करणे हे या परिषदेचा मुख्य उद्देश असेल, यामुळे आपले भविष्य बळकट होईल.
मान्यवर,
जागतिक शांतता आणि स्थैर्यामध्ये आपले समान हित आहे.
पश्चिम आशियातील गंभीर परिस्थितीवर मी आज सकाळी माझे विचार मांडले.
या सर्व संकटांचा ग्लोबल साउथवरही मोठा परिणाम होतो.
म्हणूनच, या सर्व परिस्थितींवर आपण एकजुटीने, एका सुरात आणि सामायिक प्रयत्नांनी उपाय शोधणे महत्त्वाचे आहे.
मान्यवर,
आपल्यासोबत जी -20 चे पुढील अध्यक्ष, ब्राझीलचे राष्ट्रपती आणि माझे मित्र महामहिम राष्ट्राध्यक्ष लुला उपस्थित आहेत.
मला विश्वास आहे की, ब्राझीलच्या जी -20 अध्यक्षतेखाली देखील ग्लोबल साउथच्या प्राधान्यक्रम आणि हितसंबंधांना अधिक बळकट केले जाईल आणि पुढे नेण्यात येईल.
ट्रोइकाचा सदस्य म्हणून भारत ब्राझीलला पूर्ण पाठिंबा देईल. मी माझे मित्र राष्ट्राध्यक्ष लुला यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी आमंत्रित करतो आणि त्यानंतर तुमच्या सर्वांचे विचार ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे.
खूप खूप धन्यवाद !