पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून थ्रिसुर येथील श्री सीताराम स्वामी मंदिरातील कार्यक्रमाला संबोधित केले. थ्रिसुर पूरम उत्सवाच्या पवित्र पर्वावर त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.
थ्रिसुर हे केरळच्या सांस्कृतिक राजधानीचे शहर आहे याची दखल घेत संदेशाची सुरुवात करून येथे अध्यात्मिकता, तत्वज्ञान आणि उत्सवांच्या सोबत संस्कृती, परंपरा आणि कला यांची भरभराट होते असे पंतप्रधानांनी सांगितले. थ्रिसुर हे शहर त्याचा वारसा आणि ओळख जिवंत ठेवत आहे आणि श्री सीताराम स्वामी मंदिर हे या दिशेने चैतन्याचे केंद्र म्हणून कार्यरत आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
या मंदिराच्या विस्तार कार्याबद्दल आनंद व्यक्त करत पंतप्रधानांनी सांगितले की या मंदिराचे सुवर्णलेपित गर्भगृह श्री सीताराम आणि अय्यप्पा या देवांना समर्पित आहे. या ठिकाणी हनुमानाची 55 फुटी मूर्ती उभारल्याबद्दल देखील त्यांनी प्रशंसा केली आणि तेथे उपस्थित सर्वांना कुंभाभिषेकम झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
या मंदिराच्या संदर्भात कल्याण कुटुंबीय तसेच टी.एस.कल्याणराम यांच्या योगदानाचे कौतुक करत पंतप्रधानांनी यापूर्वी त्यांच्याशी झालेल्या भेटीची आणि मंदिराविषयीच्या चर्चेची आठवण काढली आणि या प्रसंगी होत असलेल्या त्यांना अनुभवास आलेल्या अध्यात्मिक आनंदाची भावना व्यक्त केली.
थ्रिसुर आणि श्री सीताराम स्वामी मंदिर म्हणजे केवळ श्रद्धास्थाने नाहीत तर ती भारताची सजगता आणि आत्मा यांचे प्रतिबिंब आहे अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. मध्ययुगीन कालखंडातील आक्रमण काळाचे स्मरण त्यांनी सर्वांना करून दिले.पंतप्रधान म्हणाले की त्या काळात आक्रमक मंदिरांवर हल्ले चढवत असल्यामुळे त्यांना वाटत होते की भारत म्हणजे केवळ प्रतीकांचा देश आहे, पण भारत ज्ञान आणि विचारांमध्ये जिवंत आहे याबद्दल ते अनभिज्ञ होते. भारत अनंताच्या शोधत जगतो असे ते पुढे म्हणाले. “भारताचा आत्मा श्री सीताराम स्वामी आणि भगवान अय्यप्पा यांच्या रुपात जिवंत आहे. त्या काळातील ही मंदिरे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही हजारो वर्षांपूर्वीपासूनची अमर संकल्पना आहे याचा घोष करतात.आज, स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात, आपण आपल्या वारशाबद्दल अभिमान बाळगण्याची शपथ घेऊन ही संकल्पना पुढे नेतो आहोत,” ते म्हणाले.
“आपली मंदिरे तसेच तीर्थस्थाने म्हणजे अनेक शतकांपासून मूल्ये आणि समृद्धीची प्रतिके आहेत,” पंतप्रधान मोदी म्हणाले.श्री सीताराम स्वामी मंदिराने प्राचीन भारताचे भव्यपण आणि वैभव जतन अक्रून ठेवले आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या मंदिराच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध समाजकल्याणाच्या कार्यक्रमांवर अधिक भर देत पंतप्रधान म्हणाले की समाजाकडून मिळालेल्या साधनसंपत्तीची सेवेच्या रुपात परतफेड केली जाण्यासाठी या ठिकाणी एक निश्चित व्यवस्था निर्माण केलेली आहे. या प्रयत्नांमध्ये श्रीअन्न अभियान असो, स्वच्छता अभियान असो किंवा नैसर्गिक शेतीविषयी जनजागृती मोहीम असो, अशा देशाच्या विविध संकल्पांपैकी काहींची जोड देण्याची सूचना त्यांनी मंदिर समितीला केली. देशाची उद्दिष्ट्ये आणि संकल्प प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेने कार्य सुरु असताना, श्री सीताराम स्वामी यांचे आशीर्वाद सर्वांना मिळतील असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे भाषण संपविले.