पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची आज भेट घेतली. पंतप्रधान वोंग यांनी संसद भवनात पंतप्रधान मोदी यांचे समारंभपूर्वक स्वागत केले.
यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही नेत्यांनी भारत-सिंगापूर द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतला. द्विपक्षीय संबंधांची व्यापकता आणि सखोलता तसेच अफाट क्षमता लक्षात घेत, त्यांनी हे संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला.यामुळे भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणालाही मोठी चालना मिळेल. आर्थिक संबंधांमधील मजबूत प्रगतीचा आढावा घेतल्यावर उभय नेत्यांनी दोन्ही देशांदरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीचा ओघ आणखी वाढवण्याचे आवाहन केले. भारतीय अर्थव्यवस्थेत सुमारे 160 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणुकीसह सिंगापूर हा भारतासाठी एक प्रमुख आर्थिक भागीदार असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की, भारतातील वेगवान आणि शाश्वत विकासामुळे सिंगापूरच्या कंपन्यांसाठी गुंतवणुकीच्या अफाट संधी खुल्या झाल्या आहेत. त्यांनी संरक्षण आणि सुरक्षा, सागरी क्षेत्रातील सजगता , शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता , फिनटेक, नवीन तंत्रज्ञान क्षेत्र , विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि ज्ञान भागीदारी या क्षेत्रातील विद्यमान सहकार्याचा देखील आढावा घेतला. उभय नेत्यांनी आर्थिक तसेच दोन्ही देशांमधील जनतेमधील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हीटी अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. ग्रीन कॉरिडॉर प्रकल्पांना गती देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
ऑगस्ट 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या दुसऱ्या भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेच्या निष्कर्षांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. मंत्रीस्तरीय गोलमेज ही एक वैशिष्ट्यपूर्ण यंत्रणा असल्याचे नमूद करत उभय नेत्यांनी दोन्ही देशांच्या वरिष्ठ मंत्र्यांनी द्विपक्षीय सहकार्यासाठी चर्चा करून नवीन अजेंडा तयार करण्यासाठी केलेल्या कामाची प्रशंसा केली. मंत्रिस्तरीय गोलमेज बैठकीदरम्यान चिन्हांकित केलेल्या प्रगत उत्पादन, कनेक्टिव्हिटी, डिजिटलायझेशन, आरोग्यसेवा आणि औषध, कौशल्य विकास आणि शाश्वतता या सहकार्याच्या आधारस्तंभांतर्गत वेगाने कृती करण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले. या स्तंभांअंतर्गत विशेषत: सेमीकंडक्टर्स आणि महत्वपूर्ण तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सहकार्य द्विपक्षीय संबंधांचा एक नवीन अध्याय सुरु करेल ज्यामुळे आपले संबंध भविष्यकेंद्रित होतील असे उभय नेत्यांनी अधोरेखित केले.
2025 मध्ये द्विपक्षीय संबंधांची 60 वर्षे साजरी करण्याचा देखील त्यांच्या चर्चेत समावेश होता. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध हा या संबंधांचा एक महत्त्वाचा घटक असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली की सिंगापूरमध्ये भारताचे पहिले थिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्र उघडले जाईल. भारत-आसियान संबंध आणि हिंद-प्रशांत क्षेत्र प्रति भारताचा दृष्टिकोन यासह परस्पर हिताच्या महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही उभय नेत्यांनी आपली मते मांडली .
दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत सेमीकंडक्टर, डिजिटल तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि आरोग्य सेवा या क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करारांचे आदानप्रदान झाले. आतापर्यंत झालेल्या भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज बैठकीच्या दोन फेऱ्यांदरम्यान झालेल्या चर्चेचे हे फलित आहे. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान वाँग यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले , जे त्यांनी स्वीकारले.