इजिप्त मधील कैरो येथे 24 जून 2023 रोजी आगमन झाल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इजिप्तच्या मंत्रिमंडळातील "इंडिया युनिट" समवेत एक बैठक झाली. प्रजासत्ताक दिन 2023 साठी भारताचे प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला भारताला भेट दिल्यानंतर या इंडिया युनिटची स्थापना करण्यात आली. इंडिया युनिटचे नेतृत्व इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबौली करत आहेत आणि त्यात अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे.
पंतप्रधान मदबौली आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी इंडिया युनिटच्या वतीने हाती घेण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली आणि नवीन क्षेत्रातील सहकार्याबाबत प्रस्ताव मांडला. तसेच त्यांनी त्यांच्या भारतीय समकक्षांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाची प्रशंसा केली आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये भारत-इजिप्त द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक असल्याचे नमूद केले.
पंतप्रधानांनी इंडिया युनिटच्या स्थापनेची प्रशंसा केली आणि भारतासोबत द्विपक्षीय संबंध पुढे नेण्याच्या या ‘संपूर्ण सरकारी दृष्टिकोनाचे’ स्वागत केले आणि परस्पर हिताच्या विविध क्षेत्रात इजिप्त बरोबर एकत्र काम करण्यासाठी भारत तयार असल्याचे सांगितले.
व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म, औषध निर्मिती आणि लोकांमधील संबंध यासारख्या क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्याच्या उपायांवर यावेळी चर्चा झाली.
पंतप्रधान मदबौली व्यतिरिक्त, इजिप्तचे सात कॅबिनेट मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते, त्यामध्ये पुढील मंत्र्यांचा समावेश होता :
डॉ. मोहम्मद शेकर अल-मरकाबी, वीज आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री
समेह शौकरी, परराष्ट्र व्यवहार मंत्री
डॉ. हाला अल-सैद, नियोजन आणि आर्थिक विकास मंत्री
डॉ. रानिया अल-मशात, आंतरराष्ट्रीय सहकार मंत्री
डॉ. मोहम्मद माईत, अर्थमंत्री
डॉ. अम्र तलत, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री
इंजि. अहमद समीर, उद्योग आणि व्यापार मंत्री