I thank the countrymen for having reiterated their unwavering faith in our Constitution and the democratic systems of the country: PM Modi
The campaign to plant trees in the name of mother will not only honour our mother, but will also protect Mother Earth: PM Modi
Every Indian feels proud when such a spread of Indian heritage and culture is seen all over the world: PM Modi
I express my heartfelt gratitude to all the friends who participated on Yoga Day: PM Modi
We do not have to make Yoga just a one-day practice. You should do Yoga regularly: PM Modi

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार

आपण सगळे फेब्रुवारी पासून ज्या दिवसाची वाट पहात होतो तो दिवस आज आला. मी ‘मन की बात’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत, माझ्या कुटुंबियांसोबत संवाद साधत आहे. एक सुंदर म्हण आहे - ‘इति विदा पुनर्मिलनाय’ याचा अर्थ देखील तितकाच सुंदर आहे, मी रजा घेत आहे पुन्हा भेटण्यासाठी. याच भावनेने मी फेब्रुवारीमध्ये तुम्हाला सांगितले होते की, निवडणुकीच्या निकालानंतर मी तुम्हाला पुन्हा भेटेन; आणि आज ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी आज पुन्हा तुमच्या भेटीला आलो आहे. आशा आहे की तुम्ही सर्व ठीक असाल, घरातील सर्वांची तब्येत चांगली असेल; आता तर पावसाला देखील सुरुवात झाली आहे आणि एकदा का पाउस सुरु झाला की मन देखील प्रफुल्लीत होते. आजपासून पुन्हा एकदा 'मन की बात' मध्ये आपण अशा देशबांधवां विषयी चर्चा करणार आहोत जे आपल्या कार्यातून समाज आणि देशात बदल घडवून आणत आहेत. आपण आज आपली समृद्ध संस्कृती, गौरवशाली इतिहास आणि विकसित भारतासाठी केलेल्या प्रयत्नांवर चर्चा करणार आहोत.

 

मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.

    

मित्रांनो, देशवासीयांनी आपली राज्यघटना आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर दाखवलेल्या अढळ विश्वासासाठी मी त्यांचे आभार मानतो. 24 ची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. एवढी मोठी निवडणूक जगातील कोणत्याही देशात झाली नाही, ज्यात 65 कोटी लोकांनी मतदान केले. यासाठी मी निवडणूक आयोगाचे आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्वांचे अभिनंदन करतो.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 30 जून हा दिवस खूपच महत्वपूर्ण आहे. आपले आदिवासी बंधू-भगिनी आजचा हा दिवस ‘हूल दिवस’ म्हणून साजरा करतात. इंग्रजांच्या अत्याचाराला कडाडून विरोध करणाऱ्या शूर सिद्धो-कान्हूंच्या अदम्य धैर्याशी आजचा हा दिवस निगडीत आहे. शूर सिद्धो-कान्हूंनी हजारो संथाली सहकाऱ्यांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध प्राणपणाने लढा दिला आणि हे कधी घडले हे तुम्हाला माहीत आहे का? हे 1855 मध्ये घडले होते, म्हणजे 1857 च्या  स्वातंत्र्य संग्रामाच्या ही दोन वर्षे आधी. त्यावेळी झारखंडच्या संथाल परगणा मधील आपल्या आदिवासी बांधवांनी इंग्रजांविरुद्ध शस्त्रे उचलली होती. इंग्रजांनी आपल्या संथाली बंधू-भगिनींवर अनेक अत्याचार केले  आणि त्यांच्यावर अनेक बंधनेही लादली होती. या लढ्यात अपार पराक्रम गाजवत शूर सिद्धो आणि कान्हू शहीद झाले. झारखंड भूमीच्या या अमर सुपुत्रांचे बलिदान आजही देशवासीयांना प्रेरणा देते. संथाली भाषेतील त्यांना समर्पित गाण्याचे एक कडवे आपण ऐकूया -

#Audio Clip#

माझ्या प्रिय मित्रांनो, जर मी तुम्हाला विचारले की जगातील सर्वात मौल्यवान नाते कोणते , तर तुम्ही नक्कीच म्हणाल - "आई". आपल्या सर्वांच्या जीवनात ‘आई’ला सर्वोच्च स्थान आहे. प्रत्येक दुःख सहन करत आई आपल्या मुलाचे संगोपन करते. प्रत्येक आई आपल्या मुलावर प्रेम करते. आपल्या जन्मदात्या आईचे हे प्रेम म्हणजे आपण कधीही न फेडू शकणारे ऋण आहे. मी विचार करत होतो, आपण आईला काही देऊ शकत नाही, पण काहीतरी वेगळं करू शकतो का? याच विचारातून  यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेचे नाव आहे - 'एक पेड माँ के नाम'. मी देखील  माझ्या आईच्या नावाने वृक्षारोपण केले आहे. मी सर्व देशवासियांना, जगातील सर्व देशांतील लोकांना, आपल्या आईसोबत किंवा तिच्या नावाने एक झाड लावण्याचे आवाहन केले आहे. आईच्या स्मरणार्थ किंवा तिच्या सन्मानासाठी वृक्षारोपण करण्याची मोहीम वेगाने सुरू आहे हे पाहून मला खूप आनंद होत आहे. लोकं त्यांच्या आईसोबत किंवा तिच्या फोटोसोबत झाडे लावतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. प्रत्येकजण आपल्या आईसाठी झाडे लावत आहे - मग ती श्रीमंत असो वा गरीब, मग ती नोकरदार महिला असो वा गृहिणी. या मोहिमेमुळे प्रत्येकाला आपल्या आईबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याची समान संधी मिळाली आहे. हे सगळे #Plant4Mother आणि #एक_पेड़_मां_के_नाम वर  त्यांचे फोटो शेअर करून इतरांना प्रेरणा देत आहे.

 

मित्रांनो, या मोहिमेचा अजून एक फायदा होईल. पृथ्वी देखील आईसारखीच आपली काळजी घेत असते. धरणी माता ही आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा आधार आहे आणि म्हणूनच पृथ्वीची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. माँ के नाम पेड़ या मोहिमेमुळे आपल्या आईचा सन्मान तर होईलच त्यासोबतच धरणी मातेचे रक्षण देखील होईल. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे भारतात गेल्या एका दशकात वनक्षेत्रात अभूतपूर्व विस्तार झाला आहे. अमृत महोत्सवादरम्यान, देशभरात 60 हजाराहून अधिक अमृत सरोवरांची निर्मिती देखील झाली आहे. आता आपल्याला माँ के नाम पर पेड़ या मोहिमेला अशीच गती द्यायची आहे.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, देशाच्या विविध भागात मान्सून वेगाने दाखल होत आहे आणि  पावसाळ्यात प्रत्येकजण आपापल्या घरात एक गोष्ट नक्कीच शोधतात ती म्हणजे 'छत्री'. आज ‘मन की बात’ मध्ये मला तुम्हाला एका विशेष प्रकारच्या छत्र्यांबद्दल सांगायचे आहे. या छत्र्या आपल्या केरळमध्ये तयार केल्या जातात. वास्तविक, केरळच्या संस्कृतीत छत्र्यांचे विशेष महत्त्व आहे. छत्र्या हा तिथल्या अनेक परंपरा आणि धार्मिक विधींचा महत्वपूर्ण भाग आहे. पण मी ज्या छत्र्यांबद्दल बोलतोय त्या ‘कार्थुम्बी छत्र्या’ आहेत आणि त्या केरळमधील अट्टापडी येथे तयार केल्या जातात. या रंगीबेरंगी छत्र्या खूपच सुंदर दिसतात  आणि विशेष म्हणजे आपल्या केरळच्या आदिवासी भगिनी या छत्र्या तयार करतात. आज देशभरात या छत्र्यांची मागणी वाढत आहे. त्यांची ऑनलाइन विक्रीही केली जात आहे. या छत्र्या 'वट्टलक्की सहकारी कृषी संस्थे'च्या देखरेखीखाली बनवल्या जात आहेत. या सोसायटीचे कामकाज आपल्या देशाची नारीशक्ती पाहत आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली अट्टापडी येथील आदिवासी समाजाने उद्योजकतेचे अप्रतिम उदाहरण सर्वांसमोर प्रस्थापित केले आहे. या सोसायटीने बांबू-हस्तकला युनिटही स्थापन केला आहे. रिटेल आउटलेट आणि पारंपरिक कॅफे उघडण्याच्या दिशेने आता या लोकांची वाटचाल सुरु आहे. केवळ आपल्या छत्र्या आणि इतर उत्पादनांची विक्री करणे हा त्यांचा उद्देश नसून ते जगाला त्यांच्या परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देत आहेत. आज कार्थुम्बीच्या छत्र्यांनी केरळमधील एका छोट्या गावातून बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. लोकलसाठी वोकल होण्याचे यापेक्षा चांगले उदाहरण काय असू शकते?

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, पुढच्या महिन्यात यावेळेपर्यंत पॅरिस ऑलिम्पिक सुरू झाले असतील. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही सर्वजणही वाट पाहत असाल याची मला खात्री आहे की. मी भारतीय संघाला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. टोकियो ऑलिम्पिकच्या आठवणी आजही आपल्या सर्वांच्या मनात ताज्या आहेत. टोकियोमधील, आमच्या खेळाडूंच्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाची मने जिंकली होती. टोकियो ऑलिम्पिकपासून आमच्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीची जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्व खेळाडूंचा विचार केला तर या सर्वांनी जवळपास नऊशे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. हा आकडा खूप मोठा आहे.

 

मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच काही गोष्टी पाहायला मिळतील. नेमबाजीत आमच्या खेळाडूंची प्रतिभा समोर येत आहे. पुरुष आणि महिला दोन्ही संघ टेबल टेनिसमध्ये पात्र ठरले आहेत. भारतीय शॉटगन संघात आमच्या नेमबाज मुलींचाही समावेश झाला आहे. यावेळी आमच्या संघाचे खेळाडू कुस्ती आणि घोडेस्वारी या प्रकारांमध्ये त्यांनी यापूर्वी कधीही भाग न घेतलेल्या प्रकारांमध्ये देखील भाग घेणार आहेत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, यावेळी खेळात एक वेगळीच उत्कंठा पाहायला मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघांनी सर्वोत्तम कामगिरी केली होती हे तुम्हाला आठवत असेल. बुद्धिबळ आणि बॅडमिंटनमध्येही आपल्या खेळाडूंनी झेंडा फडकावला आहे. आता संपूर्ण देशाला आशा आहे की आपले खेळाडू ऑलिम्पिकमध्येही चांगली कामगिरी करतील. या खेळांमध्ये आम्ही पदके तर जिंकू आणि त्यासोबतच देशवासीयांची मनेही जिंकू. मला लवकरच भारतीय संघाला भेटण्याची संधी मिळणार आहे. मी त्यांना तुमच्या वतीने प्रोत्साहन देईन. आणि हो.. यावेळी आपला हॅशटॅग #Cheer4Bharat आहे. या हॅशटॅगद्वारे आपल्याला आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचे आहे... त्यांना प्रोत्साहन देत राहायचे आहे. तेव्हा हा उत्साह कायम ठेवा... तुमचा हा उत्साह... भारताची जादू जगाला दाखवण्यात मदत करेल.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हा सर्वांसाठी एक छोटीशी ऑडिओ क्लिप ऐकवत आहे.

#Audio Clip#

हा रेडिओ कार्यक्रम ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल, हो ना? तर चला, याच्या मागची संपूर्ण गोष्ट सांगतो. ही खरे  तर  कुवेत रेडिओच्या  प्रसारणाची क्लिप आहे/ प्रसारणाचा एक भाग आहे. आता तुम्हाला वाटेल की कुवेतची गोष्ट असेल तर तिथे हिंदी कशी आली असेल? सांगायची बाब म्हणजे,  कुवेत सरकारने त्यांच्या राष्ट्रीय रेडिओवर एक विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. आणि तोही हिंदी मध्ये!!  प्रत्येक रविवारी अर्धा तास  'कुवैत रेडिओ'वर त्याचे प्रसारण केले जाते. त्यात भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा समावेश असतो. आपल्या चित्रपट आणि कलाविश्वाशी संबंधित बातम्या आणि कार्यक्रम तेथील भारतीय समुदायामध्ये खूप लोकप्रिय आहेत. मला तर असेही सांगितले गेले आहे की कुवेतमधील स्थानिक लोकही यामध्ये खूप रस घेत आहेत. मी कुवेत सरकार आणि जनतेचे, ज्यांनी ही शानदार सुरुवात केली आहे / हा अप्रतिम पुढाकार घेतला आहे, उपक्रम सुरु केला आहे, त्यांचे मनापासून आभार मानतो.

 

मित्रांनो, आज जगभरात ज्या प्रकारे आपल्या संस्कृतीचा गौरव होतो आहे, ते पाहून कोणत्या भारतीयाला त्याचा आनंद होणार नाही? आता उदाहरणच सांगायचे तर, तुर्कमेनिस्तानमध्ये, या वर्षी मे महिन्यात, तेथील राष्ट्रीय कवीची 300 वी जयंती साजरी करण्यात आली.  या प्रसंगी  तुर्कमेनिस्तानच्या  राष्ट्रपतींनी जगभरातील 24 प्रसिद्ध कवींच्या पुतळ्यांचे अनावरण केले.  यामध्ये गुरुदेव रवींद्रनाथजी  टागोर यांचाही पुतळा आहे. हा गुरुदेवांचा सन्मान आहे, भारताचाही सन्मान आहे.

तसेच जून महिन्यात दोन कॅरिबियन देशांनी,  सुरीनाम आणि सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडाइन्स ह्यांनी आपल्या भारतीय वारसा  संपूर्ण उत्साहाने जोशात साजरा केला.

सुरीनाममध्ये दरवर्षी ५ जून हा दिवस  भारतीय समुदाय आगमन दिवस आणि प्रवासी  दिवस म्हणून साजरा केला जातो. इथे तर हिंदीसोबतच भोजपुरी देखील मोठ्या प्रमाणात बोलली जाते. सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडाइन्समध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या आपल्या बंधू भगिनींची  संख्या सुमारे सहा हजार आहे. या सर्वांना आपल्या  वारशाचा खूप अभिमान आहे. 1 जूनला ह्या सगळ्यांनी आपला भारतीय समुदाय आगमन  दिन  ज्या उत्साहाने साजरा केला त्यात त्यांची ही भावना स्पष्टपणे दिसत होती.  जगभरात झालेला भारतीय वारसा आणि संस्कृतीचा असा विस्तार पाहिल्यावर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो.

मित्रांनो, या महिन्यात जगभर  10 वा योग दिवस उत्साहाने  जल्लोषात साजरा झाला.

मी देखील जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगरला आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात सहभागी झालो  होते. काश्मीरमध्ये  तरुणांसोबतच भगिनी आणि मुलीही योग दिनात मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.

जसजसे योग दिनाचे आयोजन रुळत आहे, आणखी पुढे जात आहे तसतसे नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. जगभरात योग दिनाच्या निमित्ताने अनेक अद्भुत गोष्टी घडल्या आहेत. सऊदी अरेबियात प्रथमच एक महिला- अल हनोफ सादजी ह्यांनी  सामूहिक योग कार्यक्रमाचे नेतृत्व केले. एका सौदी महिलेने मुख्य योगासन सत्रांच संचालन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

यावेळी योग दिनानिमित्त इजिप्तमध्ये छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नाईल नदीकाठी, लाल समुद्राच्या किनाऱ्यावर आणि पिरॅमिड्सच्या पार्श्वभूमीवर  योग करत असलेल्या लोकांचे छायाचित्रे खूपच प्रसिद्ध झाली.

म्यानमारचा माराविजया पॅगोडा कॉम्प्लेक्स तेथील  संगमरवरी बुद्ध पुतळ्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. तेथे देखील 21जून रोजी एक शानदार योग सत्र आयोजित करण्यात आले होते.

बहरीन मध्ये दिव्यांग मुलांसाठी एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्रीलंकेतील सुप्रसिद्ध युनेस्को हेरिटेज साइट असलेल्या गॉल किल्ल्यामध्ये देखील एक संस्मरणीय योग कार्यक्रमाचे आयोजन झाले. 

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये ऑबझर्वेशन  डेकवर ही  लोकांनी योगासने केली. मार्शल बेटांवरही पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या गेलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात तिथल्या राष्ट्रपतींनीही भाग घेतला. भूतानमधील थिम्पू येथेही योग दिनाचा एक मोठा कार्यक्रम झाला, ज्यात माझे मित्र भूतानचे पंतप्रधान टोबगेदेखील सहभागी झाले होते. म्हणजेच  जगाच्या कानाकोपऱ्यात योगासने करणाऱ्या अनेक लोकांची विहंगम दृश्ये आपण सर्वांनी पाहिली. मी योग दिवसात सहभागी झालेल्या सर्व मित्रांचे मनःपूर्वक आभार मानतो.

माझी तुम्हाला नेहमीसाठीच एक  विनंती आहे. आपण  योगाचा फक्त एक दिवसच सराव करायचा नाही आहे तर  नियमितपणे योगासने  करायची आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या  आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल जाणवतील.

मित्रांनो, भारतातील अनेक उत्पादने अशी आहेत ज्यांना जगभरात खूप मागणी असते आणि जेव्हा आपण भारतातील कोणतेही स्थानिक उत्पादन विश्वपातळीवर लोकप्रिय झालेले बघतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटणे अगदी स्वाभाविक आहे. असेच एक उत्पादन  आहे अराकू कॉफी. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात अराकू कॉफीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. ही कॉफी तिच्या  अप्रतिम चवी साठी आणि सुगंधासाठी ओळखली जाते. अराकू कॉफीच्या लागवडीत  सुमारे दीड लाख आदिवासी कुटुंबे जोडली गेलेली आहेत. अराकू कॉफीच्या प्रसारामध्ये गिरीजन सहकारी संस्थेची महत्वाची भूमिका आहे. त्यांनी इथल्या शेतकरी बंधू-भगिनींना एकत्र आणले आणि अराकू कॉफीच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. यामुळे ह्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे. कोंडा डोरा आदिवासी समुदायाला देखील  याचा मोठा फायदा झाला आहे. आर्थिक कमाईसोबतच त्यांना आता एक सन्मानपूर्ण जीवन मिळाले आहे.  मला आठवते आहे की  एकदा विशाखापट्टणम मध्ये  आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू गारू यांच्यासोबत मला ह्या कॉफीचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली होती. ह्या कॉफीची चव तर काही  विचारूच  नका! कमालीची चविष्ट आहे ही कॉफी! अराकू कॉफीला अनेक जागतिक पुरस्कार मिळाले आहेत. दिल्लीत झालेल्या G-20 शिखर परिषदेतही ह्या कॉफीचा बोलबाला झाला होता. जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्हीही  अराकू कॉफीचा अवश्य आस्वाद घ्या.

 

मित्रांनो, स्थानिक उत्पादनांना जागतिक पातळीवर नेण्यामध्ये आपले  जम्मू-काश्मीरमधील लोकही मागे नाहीत. गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरने जे करून दाखवले ते देशभरातील लोकांसाठी एक उदाहरण आहे. येथील पुलवामाहून लंडनला मटारची/ स्नोपीजची  पहिली खेप पाठवण्यात आली. काही लोकांच्या मनात कल्पना आली की काश्मीरमध्ये वाढणाऱ्या विदेशी भाज्यांना जगाच्या नकाशावर आणता येईल.. आणि मग काय .. चाकुरा गावच्या अब्दुल रशीद मीरजी ह्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आपल्यासोबतच गावातील इतर शेतकऱ्यांच्या जमिनी  एकत्र करून त्यावर स्नोपीज / मटार ची लागवड करायला सुरुवात केली आणि लवकरच काश्मीरमधून स्नोपीज लंडनला पोहोचू लागले. या यशाने जम्मू-काश्मीरच्या जनतेसाठी  समृद्धीचे नवीन दरवाजे उघडले आहेत. आपल्या देशात अश्या  अद्वितीय उत्पादनांची कमतरता नाही. आपण अशी उत्पादने कृपया #myproductsmypride ह्या हॅशटॅगसह शेअर करा.  मी आगामी ‘मन की बात’मध्येही या विषयावर चर्चा करणार आहे.

 

मम प्रिया: देशवासिन:

अद्य अहं किञ्चित् चर्चा संस्कृत भाषायां आरभे |

 

तुम्ही विचार करत असाल की 'मन की बात'मध्ये मी अचानक संस्कृतमध्ये का बोलायला लागलो? याचे कारण म्हणजे आज संस्कृतशी संबंधित एक विशेष निमित्त !

आज, ३० जूनला आकाशवाणीच्या  संस्कृत वार्तापत्राचे प्रसारण सुरू झाल्याला 50 वर्षे पूर्ण झाली. ह्या वार्तापत्राने 50 वर्षांपासून कितीतरी  लोकांना  संस्कृतशी जोडून ठेवले आहे. मी आकाशवाणी परिवाराचे अभिनंदन करतो.

 

मित्रांनो, प्राचीन भारतीय ज्ञानाच्या  आणि विज्ञानाच्या  प्रगतीमध्ये संस्कृतची मोठी भूमिका आहे.  आजच्या काळाची मागणी आहे की आपण संस्कृतला सन्मान देऊ या आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी देखील जोडू या. आजकाल बंगळुरूमध्ये बरेच लोक असेच प्रयत्न करत आहेत. बेंगळुरू मध्ये एक मोठी बाग आहे- कब्बन पार्क! या उद्यानात येथील लोकांनी एक नवीन परंपरा सुरू केली आहे. येथे आठवड्यातून एकदा, दर रविवारी मुले, तरुण आणि मोठी माणसे एकमेकांशी संस्कृतमध्ये बोलतात. एवढेच नाही तर इथे संस्कृतमध्ये अनेक वादविवाद सत्रे आयोजित केली जातात. त्यांच्या या उपक्रमाचे नाव आहे – संस्कृत वीकेंड! याची सुरुवात एका वेबसाईटद्वारे ए समष्टी गुब्बी जी यांनी केली होती. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेला हा उपक्रम पाहता पाहता बेंगळुरूच्या लोकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. जर आपण सर्वांनी अशा प्रकारच्या प्रयत्नांना हातभार लावला तर जगातील प्राचीन आणि वैज्ञानिक अशा संस्कृत भाषेतून बरेच  काही शिकता येईल.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, 'मन की बात' च्या या भागाद्वारे आपल्याशी संवाद साधताना खूप बरे वाटले. आता हा कार्यक्रम पूर्वीसारखाच सुरू राहील.

आजपासुन एक आठवड्याने  पवित्र रथयात्रेला सुरुवात होणार आहे. महाप्रभू जगन्नाथांचा आशीर्वाद सर्व देशवासियांना निरंतर लाभो हीच सदिच्छा.अमरनाथ यात्राही सुरू झाली असून, येत्या काही दिवसांत पंढरपूरची वारीही सुरू होणार आहे. मी या यात्रांमध्ये  सामील होणाऱ्या सर्व भाविकांना शुभेच्छा देतो.

नंतर  कच्छी नवीन वर्ष- आषाढी बीज हा देखील सण येतो आहे. या सर्व सण उत्सवांसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मला विश्वास वाटतो की सकारात्मकतेशी जोडलेल्या अशा  लोकसहभागाच्या प्रयत्नांविषयी तुम्ही मला कळवत राहाल.

पुढच्या महिन्यात पुन्हा तुमच्याशी संवाद साधता येण्याची मी वाट पाहत आहे, तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद, नमस्कार!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi