The Olympics give our players a chance to hoist the Tricolour on the world stage; give them a chance to do something for the country: PM
Charaideo Moidam of Assam is being included in the UNESCO World Heritage Sites: PM Modi
Project PARI is becoming a great medium to bring emerging artists on one platform to popularise public art: PM Modi
The turnover of Khadi Village Industry has crossed Rs 1.5 lakh crore for the first time, with a 400% increase in sales: PM Modi
The government has opened a special centre named 'Manas' to help in the fight against drug abuse: PM Modi
70 percent of the tigers in the world are in our country, thanks to community efforts in tiger conservation: PM Modi
The 'Har Ghar Tiranga Abhiyan' has become a unique festival in upholding the glory of the Tricolour: PM Modi

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ या कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. तुमचे अभिनंदन करतो आहे. सध्या संपूर्ण जगावर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांची मोहिनी पसरलेली आहे. ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा आपल्या खेळाडूंना जागतिक पातळीवर तिरंगा फडकवण्याची संधी देतात, देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी देतात. तुम्ही सर्वांनी सुद्धा आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवा, भारताला पाठींबा द्या!!

मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाड मध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी फार उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत आपल्या भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत जगातील 100 हून अधिक देशांचे संघ सहभागी होतात आणि एकंदर पदकतालिकेचा विचार करता आपला संघ पहिल्या पाच सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत- पुण्याचा आदित्य वेंकट गणेश, पुण्याचाच सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोईडाचा कणव तलवार, मुंबईचा ऋषील माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी.

मित्रांनो, आजच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी या युवा विजेत्यांना विशेष आमंत्रण दिले आहे. हे सर्वजण दूरध्वनीवरून आपल्याशी जोडले गेले आहेत.

प्रधानमंत्री जी :- नमस्ते मित्रांनो, ‘मन की बात’ या कार्यक्रमात तुम्हा सर्व मित्रांचे खूप खूप स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण?

विद्यार्थी :- आम्ही ठीक आहोत सर

प्रधानमंत्री जी :- बरं मित्रांनो, ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासीय तुम्हा सर्वांचे अनुभव जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मी आदित्य आणि सिद्धार्थ यांच्यापासून चर्चेची सुरुवात करतो. तुम्ही सध्या पुण्यात आहात, आधी मी तुमच्यापासूनच संवाद सुरु करतो. ऑलिम्पियाड स्पर्धेदरम्यान तुम्हांला जे अनुभव आले त्याविषयी आम्हां सर्वांना सांगा.

आदित्य :- मला गणित विषयाची लहानपणापासूनच खूप आवड होती.माझे शिक्षक, ओमप्रकाश सर यांनी 6वीत असताना स्टँडर्ड मॅथ्स हा विषय शिकवला होता आणि त्यांनी माझी गणितातील रुची देखील वाढवली होती. त्यांच्याकडून मला शिकायला मिळाले आणि ही संधी देखील मिळाली.

प्रधानमंत्री जी :- तुझ्या मित्राचे काय म्हणणे आहे?

सिद्धार्थ :- सर, माझे नाव सिद्धार्थ आहे, मी पुण्याला राहतो.मी नुकतीच 12वी ची परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. जागतिक गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भाग घेण्याची ही माझी दुसरी वेळ होती. जेव्हा मी 6 वीत होतो तेव्हा आदित्य सोबतच मला देखील ओमप्रकाश सरांनी प्रशिक्षित केले होते. आम्हांला त्या शिकवण्याची खूप मदत झाली. आता मी सीएमआय महाविद्यालयात गणित आणि संगणकशास्त्र या विषयांचा अभ्यास करतो आहे.

प्रधानमंत्री जी :- बरं, मला असं सांगण्यात आलं आहे की अर्जुन आत्ता गांधीनगरमध्ये आहे आणि कणव तर ग्रेटर नोईडाचाच रहिवासी आहे. अर्जुन आणि कणव, आपण ऑलिम्पियाड स्पर्धेविषयी चर्चा केली पण तुम्ही दोघांनी तुमच्या स्पर्धेच्या तयारीशी संबंधित एखादा विषय किंवा विशेष अनुभव आला असेल त्याविषयी सांगितलंत तर आपल्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल.

अर्जुन :- नमस्ते सर, जय हिंद. माझे नाव अर्जुन.

प्रधानमंत्री जी :-  जय हिन्द अर्जुन |

अर्जुन :- सर, मी दिल्लीत राहतो. माझी आई श्रीमती आशा गुप्ता दिल्ली विद्यापीठात भौतिकशास्त्राची प्राध्यापक आहे तर माझे वडील श्री अमित गुप्ता चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. मी आत्ता माझ्या देशाच्या प्रधानमंत्र्यांशी प्रत्यक्ष बोलत आहे हा मला स्वतःचा सन्मान वाटतो आहे आणि सर्वप्रथम मी माझ्या यशाचे श्रेय माझ्या आई-वडिलांना देऊ इच्छितो.  मला असं वाटतं की जेव्हा एका कुटुंबातील एखादा सदस्य अशा स्पर्धेसाठी तयारी करत असतो तेव्हा हा संघर्ष केवळ त्या एकट्या सदस्याचा नसतो तर तो संपूर्ण कुटुंबाचा संघर्ष असतो.या स्पर्धेमध्ये आमची जी प्रश्नपत्रिका असते त्यामध्ये तीन प्रश्न सोडवण्यासाठी आम्हांला साडेचार तासांचा अवधी दिला जातो. म्हणजेच एका प्रश्नासाठी दीड तासाचा वेळ असतो. म्हणजे आपण समजू शकतो की एक प्रश्न सोडवायला आमच्याकडे किती वेळ असतो. या स्पर्धेच्या तयारीसाठी आम्हाला घरी खूप अभ्यास करावा लागतो. प्रश्न सोडवण्यासाठी तासनतास प्रयत्न करावे लागतात. कधी कधी तर एक प्रश्न सोडवण्यासाठी एक संपूर्ण दिवस तर कधी तीन तीन दिवस देखील झगडावं लागतं. स्पर्धेच्या सरावासाठी आम्ही ऑनलाईन प्रश्न शोधतो. गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न सोडवण्याचा सराव करतो. आणि अशाच पद्धतीने आम्ही हळूहळू अभ्यासावर मेहनत घेत राहतो, त्यातून आम्हाला चांगला अनुभव मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची प्रश्न सोडवण्याची क्षमता वाढत जाते. आणि ही गोष्ट केवळ गणितातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त ठरते.     

प्रधानमंत्री: कणव, तू मला सांग ह्या स्पर्धेची तयारी करताना आलेला तुझा एखादा वेगळा अनुभव असेल, जो आमच्या तरुण मित्रांना ऐकायला फार छान वाटेल विशेष असा काही अनुभव सांगू शकतोस?

कणव तलवार : माझं नाव कणव तलवार आहे, मी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोईडा येथे राहतो. मी 11 व्या इयत्तेत शिकतो आणि गणित हा माझा सर्वात आवडता विषय आहे. गणित विषय मला लहानपणापासूनच खूप आवडतो. लहानपणी माझे वडील माझ्याकडून कोडी सोडवून घेत असत त्यामुळे माझी या विषयाची आवड वाढतच गेली. मी 7 वीत असल्यापासून ऑलिम्पियाड स्पर्धेची तयारी सुरु केली होती. माझ्या बहिणीने यात मला खूप मदत केली आहे. माझे आईवडील मला अभ्यासासाठी कायम प्रोत्साहित करत असत. ही ऑलिम्पियाड स्पर्धा एचबीसीएसईतर्फे आयोजित केली जाते. यासाठी पाच स्तरीय प्रक्रिया असते. गेल्या वर्षीच्या संघात माझी निवड होऊ शकली नाही. मी निवडीच्या निकषाच्या अगदी जवळ होतो आणि निवड न झाल्याने अत्यंत दुःखी झालो होतो. तेव्हा माझ्या पालकांनी मला सांगितलं की अशा वेळी आपण जिंकतो तरी किंवा काहीतरी शिकतो तरी. आणि या प्रक्रियेचा प्रवास महत्त्वाचा असतो, यश नव्हे. तेव्हा मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की- तुम्ही जे करत आहात ते आवडीनं करा आणि जे तुम्हाला आवडतं ते करत रहा. यशापेक्षा तिथे पोहोचण्याचा प्रवास महात्ग्वाचा आहे, आणि आपल्याला यश मिळेलच. आपण स्वतःच्या विषयाबाबत आवड निर्माण केली पाहिजे आणि या प्रवासाचा आनंद घेतला पाहिजे.

प्रधानमंत्री : तर कणव, तुला तर गणितात देखील रुची आहे आणि साहित्याची आवड असल्यासारखं तुझं बोलणं आहे.

कणव तलवार :  हो सर. मी लहानपणापासून वादविवाद स्पर्धा आणि वक्तृत्वस्पर्धा यांच्या भाग घेत असे.

प्रधानमंत्री: चला, आता आपण आनंदोशी बातचीत करूया. आनंदो, तू आत्ता गुवाहाटीमध्ये आहेत आणि तुझा मित्र ऋषील मुंबईत आहे. मला तुम्हां दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे. बघा, मी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम करत असतो आणि परीक्षा पे चर्चा या कार्याक्रमाशिवाय इतर कार्यक्रमांमध्ये सुद्धा मी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित विषयाची इतकी भीती वाटते की नाव घेतला तरी घाबरून जातात. तुम्ही मला सांगा, गणिताशी मैत्री कशी करावी?

ऋषील माथुर : सर, माझं नाव ऋषील माथुर आहे. आपण जेव्हा लहान असतो आणि आपण पहिल्यांदाच बेरीज शिकतो, तेव्हा आपल्याला हातचा धरायला सांगितलं जातं. पण कधीकधी आपल्याला हे कुणी सांगतच नाही की हातचा हा काय प्रकार असतो? जेव्हा आपण चक्रवाढ व्याज शिकतो तेव्हा हे कधीच विचारत नाही की चक्रवाढ व्याज काढण्याचं सूत्र आलं कुठून? मला असं वाटतं की गणित ही खरंतर विचार करण्याची आणि प्रश्न सोडवण्याची कला आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की गणितात आपण आणखी एका प्रश्नाची भर घातली पाहिजे की आपण हे का करत आहोत? हे असं का असतं? मला वाटतं की यामुळे विद्यार्थ्यांची गणितातली रुची वाढू शकेल. कारण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट समजत नसते तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटायला लागते. याशिवाय मला असंही वाटतं की गणित हा एक तर्काचा विषय आहे असं सगळ्याचं मत आहे. पण खरंतर गणितात सर्जनशीलता देखील महत्त्वाची आहे, कारण सर्जनशीलतेमुळेच आपण चौकटीच्या बाहेरची उत्तरं शोधू शकतो. आणि म्हणूनच, गणित ऑलिम्पियाड स्पर्धेचं आयोजन ही देखील गणितातील रुची वाढवण्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची समयोचितता आहे.

प्रधानमंत्री :  आनंदो, तुला काही सांगायचंय?

आनंदो भादुरी : प्रधानमंत्रीजी नमस्ते! मी गुवाहाटी येथून आनंदो भादुरी बोलत आहे. मी नुकतीच 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. मी 6 वी आणि 7वीत असताना स्थानिक ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भाग घेत असे. तिथूनच मला या विषयाची आवड निर्माण झाली. यावर्षी मी दुसऱ्यांदा आयएमओ मध्ये सहभागी झालो. दोन्ही आयएमओ मला छान वाटल्या. ऋषीलनं आत्ता जे सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे. आणि मला असं सांगावसं वाटतं की ज्यांना गणित विषयाची भीती वाटते त्यांनी खूप धैर्याने अभ्यास केला पाहिजे,कारण आपल्याला ज्या प्रकारे गणित शिकवलं जातं, होतं काय की एक ठराविक सूत्र दिलं जातं, ते पाठ करुन घेतात आणि मग याच सूत्राच्या आधारावर शंभर प्रश्न विचारले जातात. पण आधी ते सूत्र समजलं की नाही ते कोणीच बघत नाही. फक्त प्रश्न सोडवून घेण्याच्या मागे लागतात. सूत्र देखील पथ करायचं आणि परीक्षेत समजा ते आठवलं नाही तर काय करायचं? म्हणून मी सांगेन की सूत्र समजून घ्या, जे आत्ता ऋषील म्हणत होता. धिटाईने त्याला भिडा. जर सूत्र नीट लक्षात आला तर 100 प्रश्न विचारावेच लागणार नाहीत. एक दोन प्रश्नांमध्ये मुलांना समजेल आणि त्यांना गणित विषयाला घाबरावे देखील लागणार नाही.

प्रधानमंत्री जी :-  आदित्य आणि सिद्धार्थ, आपण जेव्हा सुरुवातीला बोलत होतो तेव्हा नीट बोलणं झालं नाही. आता या सर्व मित्रांचं बोलणं ऐकून तुम्हांला नक्कीच वाटत असेल की तुम्हालाही काही सांगायचं आहे. तुम्ही तुमचे अनुभव अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकता का?

सिद्धार्थ :-  या स्पर्धेत अनेक देशांशी संवाद साधायला मिळाला, खूप वेगवेगळ्या संस्कृती होत्या, परदेशांतील विद्यार्थी होते त्यांच्याशी चर्चा करता आली. खूप प्रसिद्ध गणितज्ञ उपस्थित होते, त्यांना भेटायला मिळालं.

प्रधानमंत्री जी :-  आदित्य, तू बोल.

आदित्य :-  स्पर्धेचा अनुभव फार छान होता. आम्हाला बाथ शहर फिरवून दाखवण्यात आलं. तिथे खूप छान छान देखावे होते, आम्हांला बगीच्यांमध्ये घेऊन गेले. आणि आम्हांला ऑक्सफर्ड विद्यापीठात देखील घेऊन गेले होते. तो एक अत्यंत सुंदर अनुभव होता.

प्रधानमंत्री जी :- चला मित्रांनो, तुमच्याशी बोलून मला फार आनंद झाला. मी तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, कारण मला माहित आहे की अशा प्रकारच्या स्पर्धांसाठी खूप मेहनत घ्यावी लागते, मन एकाग्र करून अभ्यास करावा लागतो, बुद्धीचा कस लागतो. कधीकधी कुटुंबातले लोक देखील वैतागतात- हा काय सतत गुणाकार-भागाकार करत असतो म्हणतात. पण माझ्याकडून तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही देशाचा मान वाढवला आहे, देशाचं  नाव उज्ज्वल केलं आहे. मित्रांनो धन्यवाद.

विद्यार्थी :-  तुमचे आभार! धन्यवाद!

प्रधानमंत्री जी :-  धन्यवाद.

विद्यार्थी:- धन्यवाद सर, जय हिंद.

प्रधानमंत्री जी :- जय हिंद.. जय हिंद

तुम्हां सर्व विद्यार्थ्यांशी बोलून आनंद वाटला. ‘मन की बात’ कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुम्हां सर्वांचे खूप खूप आभार. गणित विषयातील या युवा महारथींचे विचार ऐकल्यानंतर इतर युवकांना सुद्धा गणित विषयातून आनंद घेण्याची प्रेरणा मिळेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आता मी ‘मन की बात’ कार्यक्रमात अशा विषयावर बोलू इच्छितो जे ऐकून प्रत्येक भारतवासीयाची मान अभिमानाने ताठ होईल.मात्र, ही गोष्ट सांगण्यापूर्वी मी तुम्हांला एक प्रश्न विचारु इच्छितो. तुम्ही कधी चराईदेऊ मैदाम हे नाव ऐकलं आहे? जर नसेल ऐकलं तर आता हे नाव वारंवार तुमच्या कानावर पडणार आहे, आणि तुम्ही देखील हे नाव इतरांना सांगणार आहात.आसाम राज्यातील चराईदेऊ मैदामचा आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. या यादीत समावेश होणारं भारतातलं हे 43 वं स्थळ असला तरी ईशान्य भारतातलं हे पहिलंच स्थळ असेल.

मित्रांनो हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येत असेल की चरैदेउ मैदाम म्हणजे काय आणि ते इतकं विशेष का आहे.  चरैदेउ म्हणजे शायनिंग सिटी ऑन द हील्स म्हणजेच टेकड्यांवर चमकणारं शहर.  ही अहोम वंशाची पहिली राजधानी होती.  अहोम घराण्यातील लोक परंपरेने त्यांच्या पूर्वजांचे मृतदेह आणि त्यांच्या मौल्यवान वस्तू मैदाममध्ये ठेवतात.  मैदाम ही एक ढिगासारखी रचना आहे, जी वर मातीने झाकलेली आहे आणि खाली एक किंवा अधिक खोल्या आहेत.  ही मैदाम, अहोम राज्याच्या दिवंगत राजे आणि प्रतिष्ठित लोकांसाठी आदराचे प्रतीक आहे.  आपल्या पूर्वजांना आदर दाखवण्याची ही पद्धत अतिशय अनोखी आहे.  या ठिकाणी सामुदायिक पूजाही होत असे.

मित्रांनो, अहोम साम्राज्याबद्दल इतर माहिती तुम्हाला आणखी आश्चर्यचकित करेल.  13व्या शतकापासून सुरू झालेले हे साम्राज्य 19व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत टिकले.  एवढ्या मोठ्या कालावधीसाठी साम्राज्य टिकून राहणे ही मोठी गोष्ट आहे.  कदाचित अहोम साम्राज्याची तत्त्वे आणि श्रद्धा इतकी मजबूत होती की त्यांनी ही राजवट इतके दिवस टिकवली.  मला आठवते की, या वर्षी 9 मार्च रोजी, मला महान अहोम योद्धा लसिथ बोरफुकन यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करण्याचा बहुमान मिळाला, जो अदम्य धैर्य आणि शौर्याचा प्रतीक आहे.  या कार्यक्रमादरम्यान अहोम समाजाच्या अध्यात्मिक परंपरेचे पालन करताना मला एक वेगळा अनुभव आला.  लसिथ मैदाम इथे अहोम समाजाच्या पूर्वजांना आदरांजली वाहण्याचा बहुमान मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.  आता चरैदेऊ मैदाम हे जागतिक वारसा स्थळ बनले म्हणजे इथे अधिक पर्यटक येतील.  तुम्ही तुमच्या भविष्यातील प्रवासाच्या योजनांमध्ये या स्थळाचा समावेश नक्कीच करा.  

मित्रांनो, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगूनच देश पुढे जाऊ शकतो.  भारतातही असे अनेक प्रयत्न सुरू आहेत.  असाच एक प्रयत्न आहे – प्रोजेक्ट परी… आता परी हा शब्द ऐकून तुम्ही गोंधळून जाऊ नका.. ही परी स्वर्गीय कल्पनेशी जोडलेली नसून पृथ्वीला स्वर्ग बनवत आहे.  PARI म्हणजे पब्लिक आर्ट ऑफ इंडिया.   सार्वजनिक कला लोकप्रिय करण्यासाठी उदयोन्मुख कलाकारांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी, प्रकल्प PARI हे एक प्रमुख माध्यम बनत आहे.  तुम्ही बघितलेच असेल.. रस्त्याच्या कडेला, भिंतींवर आणि भुयारी मार्गांमध्ये खूप सुंदर चित्रे दिसतात.  ही चित्रे आणि या कलाकृती त्याच कलाकारांनी बनवल्या आहेत जे PARI शी संबंधित आहेत. यामुळे आपल्या सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्य तर वाढतेच, शिवाय आपली संस्कृती अधिक लोकप्रिय होण्यास मदत होते.  दिल्लीतील भारत मंडपमचेच उदाहरण घ्या.  येथे तुम्हाला देशभरातील अप्रतिम कलाकृती पाहायला मिळतील.  दिल्लीतील काही अंडरपास-भुयारी मार्ग आणि उड्डाणपूलांवरही तुम्ही अशी सुंदर लोक कला पाहू शकता.  मी कला आणि संस्कृती प्रेमींना आवाहन करेन की त्यांनी पब्लिक आर्टवर लोककलेला अधिक काम करावे.  यामुळे आपल्याला आपल्या मुळांचा अभिमान असल्याची सुखद अनुभूती मिळेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, 'मन की बात' मध्ये, आता 'रंगा' बद्दल बोलूया -  असे रंग ज्यांनी हरयाणाच्या रोहतक जिल्ह्यातील 250 हून अधिक महिलांच्या जीवनात समृद्धीचे रंग भरले आहेत.  हातमाग उद्योगाशी निगडित या महिला पूर्वी छोटी दुकाने चालवून आणि छोट्या मोठ्या नोकऱ्या करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. मात्र पुढे जाण्याची इच्छा प्रत्येकाला असते.  म्हणून त्यांनी ‘उन्नती बचत गटा’ मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि या गटात सहभागी होऊन त्यांनी ब्लॉक प्रिंटिंग आणि डाईंगचे प्रशिक्षण घेतले.  कपड्यांवर रंगांची जादू पसरवणाऱ्या या महिला आज लाखो रुपये कमवत आहेत.  त्यांनी बनवलेल्या बेड कव्हर-चादरी, साड्या आणि दुपट्ट्यांना बाजारात मोठी मागणी आहे.

मित्रांनो, रोहतकमधील या महिलांप्रमाणेच देशाच्या विविध भागांतील कारागीर हातमाग लोकप्रिय करण्यात व्यग्र आहेत.  ओदिशाची 'संबलपुरी साडी' असो, मध्यप्रदेशची 'माहेश्वरी साडी' असो, महाराष्ट्राची 'पैठणी' असो किंवा विदर्भाची 'हँड ब्लॉक प्रिंट' असो, हिमाचलच्या 'भुट्टीको'ची शाल आणि लोकरीचे कपडे असोत किंवा जम्मू-काश्मिरच्या कानी शाल असोत, देशाच्या कानाकोपऱ्यात हातमाग कारागिरांचे काम दिसून येते.  आणि तुम्हाला हे माहीत असेलच की, काही दिवसांनी ७ ऑगस्टला आपण 'राष्ट्रीय हातमाग दिन' साजरा करणार आहोत.हल्ली हातमागाच्या उत्पादनांनी ज्या प्रकारे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे, ते खरोखरच खूप यशस्वी आणि जबरदस्त आहे.  आता अनेक खाजगी कंपन्या AI च्या माध्यमातून हातमाग उत्पादने आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या फॅशनचा प्रचार करत आहेत.  कोशा AI, हॅंडलूम इंडिया, डी-जंक, नोव्हाटॅक्स, ब्रम्हपुत्रा फेबल्स, असे अनेक स्टार्टअप्स देखील हातमाग उत्पादनांना लोकप्रिय करण्यात गुंतले आहेत.  अनेक लोक अशा स्थानिक उत्पादनांना लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करत आहेत हे पाहून मलाही आनंद झाला.  तुम्ही तुमची स्थानिक उत्पादने ‘हॅशटॅग माय प्रॉडक्ट माय प्राइड’ या नावाने समाज माध्यमावर टाकू शकता.  तुमचा हा छोटासा प्रयत्न अनेकांचे आयुष्य बदलेल.   

मित्रांनो, हातमागा बरोबरच मला खादीबद्दलही बोलायला आवडेल.  तुमच्यामध्ये असे बरेच लोक असतील ज्यांनी खादीची उत्पादने यापूर्वी कधीही वापरली नाहीत, परंतु आज मोठ्या अभिमानाने खादी परिधान करतात.  मला हे सांगायलाही आनंद होत आहे की खादी ग्रामोद्योगाची उलाढाल प्रथमच 1.5 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.  कल्पना करा, दीड लाख कोटी रुपये!!  आणि खादीची विक्री किती वाढली आहे माहीत आहे का?  400  टक्के. खादी आणि हातमागाच्या या वाढत्या विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत.  बहुसंख्य महिला या उद्योगाशी निगडित आहेत आणि त्यामुळे त्यांनाच त्याचा सर्वाधिक फायदा होत आहे.  माझी तुम्हाला पुन्हा एक विनंती आहे, तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असलेच पाहिजेत, आणि जर तुम्ही आत्तापर्यंत खादीचे कपडे घेतले नसतील तर या वर्षापासून सुरुवात करा.  ऑगस्ट महिना आला आहे, स्वातंत्र्याचा महिना आहे, क्रांतीचा महिना आहे.  यापेक्षा चांगली संधी कोणती असू शकते खादी खरेदी करण्याची!

माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुमच्याशी 'मन की बात'मध्ये अनेकदा अंमली पदार्थांच्या आव्हानावर चर्चा केली आहे.  प्रत्येक कुटुंबाला काळजी असते की आपलं मूल अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडू नये.  आता अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने ‘मानस’ नावाचे विशेष केंद्र उघडले आहे.  अंमली पदार्थांविरुद्धच्या लढाईतील हे एक मोठे पाऊल आहे.  ‘मानस’ ही हेल्पलाइन आणि पोर्टल काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.  सरकारने '1933' हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे.  यावर फोन करून कोणीही आवश्यक सल्ला घेऊ शकतो किंवा पुनर्वसनाशी संबंधित माहिती मिळवू शकतो.  जर कोणाकडे अंमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती असेल तर ते या नंबरवर कॉल करून 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो' सोबत शेअर करू शकतात. मानसला पुरवलेली माहिती गोपनीय राखली जाते. भारताला अंमली पदार्थ मुक्त बनवण्यासाठी झटणाऱ्या सर्व लोकांना, सर्व कुटुंबांना, सर्व संस्थांना माझी विनंती आहे की मानस हेल्पलाइनचा पुरेपूर वापर करा.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, उद्या जगभरात व्याघ्र दिन साजरा होणार आहे. भारतामध्ये वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आपण सर्वजण वाघाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकतच लहानाचे मोठे झालो आहोत. जंगलासभोवतीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना वाघासोबत सहजीवन कसे जगायचे हे पक्के माहीत असते.अशी अनेक गावे आहेत, जिथे माणूस आणि वाघ यांच्यात कधीच संघर्ष होत नाही. मात्र जिथे असा संघर्ष उद्भवतो तिथे सुद्धा वाघांच्या संरक्षणासाठी मोठे प्रयत्न होत आहेत. लोकसहभागाचा असाच एक प्रयत्न म्हणजे "कुल्हाडी बँड पंचायत". राजस्थानातील रणथंबोरपासून सुरू झालेली ही मोहीम रंजक आहे.  कुऱ्हाड घेऊन जंगलात जाणार नाही आणि झाडे तोडणार नाही, अशी शपथ स्थानिक समाजानेच घेतली आहे.  या एका निर्णयामुळे येथील जंगले पुन्हा हिरवीगार होत असून वाघांसाठी चांगले वातावरण निर्माण होत आहे.

मित्रांनो, महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघांच्या प्रमुख अधिवासांपैकी एक आहे.  इथल्या स्थानिक समुदायांनी, विशेषत: गोंड आणि माना जमातींच्या आमच्या बंधू-भगिनींनी इको-टूरिझमच्या दिशेने वेगाने पावले टाकली आहेत.  त्यांनी जंगलावरील आपले अवलंबित्व कमी केले आहे जेणेकरून येथे वाघांच्या हालचाली वाढू शकतील.  आंध्र प्रदेशातील नल्लामलाईच्या टेकड्यांवर राहणाऱ्या 'चेंचू' जमातीचे प्रयत्न पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.  टायगर ट्रॅकर्स म्हणून त्यांनी जंगलातील वन्य प्राण्यांच्या हालचालींची प्रत्येक माहिती गोळा केली.  यासोबतच त्यांनी परिसरातील अवैध कामांवरही लक्ष ठेवले आहे.  त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे सुरू असलेला ‘बाग मित्र कार्यक्रम’ही खूप चर्चेत आहे.  या अंतर्गत स्थानिक लोकांना 'बाग मित्र' म्हणजे व्याघ्रमित्र म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.  वाघ आणि मानव यांच्यात संघर्ष होणार नाही याची हे 'वाघमित्र' पूर्ण काळजी घेतात.  असे अनेक प्रयत्न देशाच्या विविध भागात सुरू आहेत.  मी येथे फक्त काही प्रयत्नांची चर्चा केली आहे परंतु मला आनंद आहे की लोकसहभागामुळे वाघांच्या संवर्धनात खूप मदत होत आहे.  अशा प्रयत्नांमुळे भारतातील वाघांची संख्या दरवर्षी वाढत आहे.  जगातील 70 टक्के वाघ आपल्या देशात आहेत हे जाणून तुम्हाला आनंद आणि अभिमान वाटेल.  विचार करा!  ७० टक्के वाघ!!  - त्यामुळेच आपल्या देशाच्या विविध भागात अनेक व्याघ्र अभयारण्य आहेत.

मित्रांनो, वाघांच्या वाढीसोबतच आपल्या देशातील वनक्षेत्रही झपाट्याने वाढत आहे.  यामध्येही सामुदायिक प्रयत्नांमुळे मोठे यश मिळत आहे.  मागच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मी तुमच्याशी ‘एक पेड माँ के नाम’ या कार्यक्रमाबाबत चर्चा केली होती.  देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने लोक या मोहिमेत सामील होत आहेत याचा मला आनंद आहे.  काही दिवसांपूर्वीच स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेल्या इंदूरमध्ये एक अप्रतिम कार्यक्रम झाला.  येथे ‘एक पेड माँ के नाम’ या कार्यक्रमात एकाच दिवसात २ लाखांहून अधिक रोपे लावण्यात आली.  तुम्हीही तुमच्या आईच्या नावाने झाडे लावण्याच्या या मोहिमेत सहभागी व्हा आणि सेल्फी घ्या आणि सोशल मीडियावर पोस्ट करा.  या मोहिमेत सामील होऊन तुम्हाला तुमची आई आणि पृथ्वी माता या दोघांसाठी काहीतरी खास केल्यासारखे वाटेल.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, १५ ऑगस्टचा दिवस  आता फार दूर नाही.  आणि आता 15 ऑगस्ट मध्ये आणखी एका मोहिमेची भर पडली आहे, 'हर घर तिरंगा अभियान'.  गेल्या काही वर्षांपासून देशभरात 'हर घर तिरंगा अभियाना'साठी सर्वांचाच उत्साह आहे.  गरीब असो, श्रीमंत, छोटं घर असो की मोठं घर, प्रत्येकाला तिरंगा फडकवताना अभिमान वाटतो.  तिरंग्यासोबत सेल्फी काढण्याची आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्याचीही क्रेझ आहे.  तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा कॉलनीत किंवा सोसायटीतील प्रत्येक घरावर तिरंगा फडकतो, तेव्हा काही वेळातच इतर घरांवरही तिरंगा दिसू लागतो.  म्हणजेच ‘हर घर तिरंगा अभियान’ ,  तिरंग्याच्या अभिमाना मुळे  एक अनोखा उत्सव बनला आहे.  आता याबाबत विविध प्रकारचे नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत.  १५ ऑगस्ट जसजसा जवळ येतो तसतसे घर, कार्यालये, गाड्यांमध्ये तिरंगा लावण्यासाठी विविध प्रकारची उत्पादने दिसू लागतात.  काही लोक तर 'तिरंगा' त्यांच्या मित्रांना आणि शेजाऱ्यांना वाटतात सुद्धा.  हा आनंद, हा तिरंग्याबद्दलचा उत्साह आपल्याला एकमेकांशी जोडतो आहे.

मित्रांनो, पूर्वीप्रमाणे याही वर्षी तुम्ही ‘harghartiranga.com’ वर तुमचा तिरंग्यासोबतचा सेल्फी नक्कीच अपलोड कराल आणि मला तुम्हाला आणखी एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे.  दरवर्षी १५ ऑगस्टपूर्वी तुम्ही मला तुमच्या अनेक सूचना पाठवता.  या वर्षीही तुम्ही मला तुमच्या सूचना जरूर पाठवा.  तुम्ही तुमच्या सूचना MyGov किंवा NaMo App वर देखील पाठवू शकता.  15 ऑगस्ट रोजीच्या माझ्या भाषणात मी शक्य तितक्या सूचना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेन.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ च्या या भागात तुमच्याशी संवाद साधून खूप आनंद झाला.  पुढच्या वेळी आपण पुन्हा भेटू, देशाच्या नवीन कामगिरीसह आणि लोकसहभागासाठी नवीन प्रयत्नांसह. कृपया 'मन की बात'साठी आपल्या सूचना पाठवत राहा.  येत्या काळात अनेक सणही येत आहेत.  तुम्हाला सर्व सणांच्या हार्दिक शुभेच्छा.  कुटुंबासह सणांचा आनंद घ्या.  देशासाठी सतत काहीतरी नवीन करण्याची उर्जा कायम ठेवा.  खूप खूप धन्यवाद.  नमस्कार

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures

Media Coverage

India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister lauds the passing of amendments proposed to Oilfields (Regulation and Development) Act 1948
December 03, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi lauded the passing of amendments proposed to Oilfields (Regulation and Development) Act 1948 in Rajya Sabha today. He remarked that it was an important legislation which will boost energy security and also contribute to a prosperous India.

Responding to a post on X by Union Minister Shri Hardeep Singh Puri, Shri Modi wrote:

“This is an important legislation which will boost energy security and also contribute to a prosperous India.”