Terrorists had shaken Mumbai and the entire country. But it is India's strength that we recovered from that attack and are now crushing terrorism with full courage: PM Modi
26th November is very important. On this day in 1949, the Constituent Assembly adopted the Constitution of India: PM Modi
When there is 'Sabka Saath' in nation building, only then 'Sabka Vikas': PM Modi
In India today, it's evident that the 140 crore people are driving numerous changes: PM Modi
The success of 'Vocal For Local' is opening the doors to a developed India: PM Modi
This is the second consecutive year when the trend of buying goods by paying cash on Diwali is decreasing. People are making more and more digital payments: PM Modi
In contrast to a decade ago, our patents are now receiving approvals at a rate that is tenfold higher: PM Modi
One of the biggest challenges of the 21st century is – ‘Water Security’. Conserving water is no less than saving life: PM Modi

 ‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे. आज 26 नोव्हेंबर. हा दिवस  आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशावर सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशच  हादरवून टाकला होता. पण  हेच भारताचे सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता अत्यंत धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत.  मुंबईवरील दहशतवादी  हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वाना  मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांचे  आज देश स्मरण करत आहे.

माझ्या कुटुंबियांनो, 

26 नोव्हेंबर हा दिवस आणखी एका कारणासाठीही खूप महत्त्वाचा आहे. याच  दिवशी 1949 मध्ये संविधान सभेने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला होता.  मला आठवते आहे की  2015 साली जेव्हा आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 125 वी जयंती साजरी करत होतो, त्याच वेळी 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करावा अशी कल्पना समोर आली. आणि तेव्हापासून आपण दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करत आहोत. मी सर्व देशवासियांना संविधान दिनानिमित्त  खूप खूप शुभेच्छा देतो, आणि नागरिकांच्या कर्तव्याला प्राधान्य देत, आपण सर्वजण एकत्र येऊन  विकसित भारताचा संकल्प निश्चितपणे पूर्ण करू.

मित्रांनो, संविधान तयार करण्यासाठी  2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले हे आपणा सर्वांना माहीती आहे. श्री सच्चिदानंद सिन्हाजी हे संविधान सभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य होते. 60 पेक्षा जास्त  देशांच्या संविधानांचा अभ्यास करून आणि दीर्घ चर्चेनंतर आपल्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात आला. मसुदा तयार झाल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी त्यात पुन्हा २ हजारांहून अधिक दुरुस्त्या करण्यात आल्या. 1950 मध्ये राज्यघटना लागू झाल्यानंतरही, आत्तापर्यंत  एकूण 106 वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. कालमान, परिस्थिती आणि देशाची आवश्यकता  लक्षात घेऊन वेगवेगळ्या सरकारांनी निरनिराळ्या  वेळी ह्या सुधारणा केल्या. पण ही दुर्दैवी गोष्ट आहे की राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती ही भाषणस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांवर गदा आणण्यासाठी केली गेली होती.  44 व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आणीबाणीच्या काळात केल्या गेलेल्या  त्या चुका सुधारण्यात आल्या.

मित्रांनो, संविधान सभेचे काही सदस्य नामनिर्देशित करण्यात आले होते. हे देखील खूप प्रेरणादायी आहे की  त्यापैकी 15 महिला होत्या. अशाच एक  सदस्या, हंसा मेहताजी ह्यांनी महिलांच्या हक्क आणि न्यायासाठी आवाज उठवला होता. त्या वेळी भारत हा अशा काही मोजक्या देशांपैकी एक होता जिथे संविधानाने महिलांना मतदानाचा अधिकार दिलेला होता. राष्ट्र उभारणीत सर्वांचा सहभाग असेल  तरच सर्वांचा विकास होऊ शकतो. मला समाधान वाटते की संविधान निर्मात्यांच्या याच दूरदृष्टीचे पालन करत  भारताच्या संसदेने आता 'नारी शक्ती वंदन कायदा' संमत केला आहे. ‘नारी शक्ती वंदन कायदा’ हा आपल्या लोकशाहीच्या संकल्प शक्तीचे उदाहरण आहे. आपल्या विकसित भारत ह्या संकल्पाला चालना देण्यासाठी देखील हा कायदा तितकाच उपयुक्त ठरेल.

माझ्या कुटुंबियांनो, जेव्हा देशातील जनता राष्ट्र उभारणीची जबाबदारी घेते,  तेव्हा विश्वातील  कोणतीही शक्ती त्या देशाला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. आज भारतामध्ये देखील  हे स्पष्टपणे आढळते आहे की देशातील अनेक बदलांचे नेतृत्व  हे भारतातील 140 कोटी जनताच करीत आहे. ह्याचे एक  प्रत्यक्ष उदाहरण आपण या सणासुदीच्या काळात पाहिले आहे. गेल्या महिन्यातील  ‘मन की बात’ मध्ये मी ‘व्होकल फॉर लोकल’  अर्थात भारतीयांनी स्थानिक उत्पादने खरेदी करावी ह्यावर भर दिला होता. गेल्या काही दिवसांत देशात दिवाळी, भाऊबीज  आणि छठ या सणांच्या काळात 4 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची व्यावसायिक उलाढाल झाली आहे. आणि ह्याच दिवसांत, लोकांनी भारतातील स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचा प्रचंड उत्साह दाखवला. आता तर घरातील लहान मुलेदेखील  दुकानातून  काही खरेदी करताना त्या वस्तूंवर  मेड इन इंडिया असे लिहिलेले  आहे  की नाही हे पाहू लागली  आहेत. केवळ इतकेच नाही तर आता ऑनलाइन खरेदी करताना देखील लोक वस्तूचे country of origin , वस्तूंचे निर्मिती स्थान पाहायला  विसरत  नाहीत.

 मित्रांनो, ज्याप्रमाणे 'स्वच्छ  भारत अभियानाला ’ मिळणारे यश हेच त्या अभियानाचे प्रेरणास्थान बनत आहे, त्याचप्रमाणे ‘व्होकल फॉर लोकल ‘ अभियानाचे यश हेच विकसित भारत - समृद्ध भारत यशाचे महाद्वार उघडत आहे. ‘व्होकल फॉर लोकलचे ‘  हे अभियान संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहे. ‘वोकल फॉर लोकल अभियान’ ही देशवासियांना रोजगार मिळण्याची  हमी आहे. हीच विकासाची हमी आहे, हीच देशाच्या समतोल विकासाची हमी आहे. ह्या अभियानामुळे  शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही लोकांना समान संधी मिळते. ह्या अभियानामुळे  स्थानिक उत्पादनांसाठी  मूल्य वर्धनाचा  मार्गही मोकळा होतो आणि जर कधी जागतिक अर्थव्यवस्थेत चढ-उतार झालेच  तर व्होकल फॉर लोकल हा मंत्र आपल्या अर्थव्यवस्थेचेही संरक्षण  करतो.

मित्रांनो, भारतीय उत्पादनेच खरेदी करायची हा विचार  केवळ सणांच्या दिवसांपुरताच मर्यादित राहू नये. आता  लग्नसराईचा हंगामही सुरू झाला आहे. काही व्यापारी संस्थांच्या अंदाजानुसार या लग्नसराईत जवळपास 5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल  होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विवाहसमारंभासाठी खरेदी करताना देखील आपण सर्वांनी भारतात बनवलेल्या उत्पादनांनाच  महत्त्व द्यावे. आणि हो, जेव्हा लग्नाचा विषय निघालाच आहे तर  सांगतो की  एक गोष्ट मला खूप काळापासून सलते आहे  आणि माझ्या मनातील वेदना, मी माझ्या कुटुंबियांना नाही सांगणार तर कोणाला सांगणार?  जरा विचार करा, आजकाल काही कुटुंबांमध्ये परदेशात जाऊन विवाहसमारंभ साजरा करण्याची एक नवी पद्धत सुरु होते आहे. पण असे करणे आवश्यक आहे का? 

जर आपण भारतातच, भारतातील आपल्या लोकांमध्ये  विवाह समारंभ साजरे केले तर देशाचा पैसा देशातच राहील. देशातील लोकांना तुमच्याकडील विवाहसमारंभात  काही सेवा पुरवण्याची  संधी मिळेल, अगदी गरीब लोकही आपल्या लहान लहान मुलांना तुमच्याकडील लग्नसमारंभाची वर्णने सांगतील. व्होकल फॉर लोकल  या अभियानाला  तुम्ही अशी साथ देऊन ते अभियान पुढे नेऊ शकता का? असे लग्न सोहळे आपण आपल्याच देशात का करू नयेत? कदाचित तुम्हाला हवी तशी व्यवस्था आज इथे उपलब्ध नसेल, अशीही  शक्यता आहे. पण असे सोहळे आपण देशातच आयोजित केले तर आपल्या देशातील व्यवस्थाही विकसित होईल. हा खूप मोठ्या कुटुंबांशी संबंधित असा  विषय आहे. मला आशा वाटते आहे की माझी वेदना त्या मोठ्या कुटुंबांपर्यंत नक्कीच पोहोचेल.

 माझ्या कुटुंबियांनो, या सणासुदीच्या काळातच लोकांचा आणखी एक मोठा कल दिसला आहे. हे सलग दुसरे वर्ष आहे की जेव्हा दिवाळीनिमित्त खरेदी करताना रोख रक्कम देऊन काही वस्तू खरेदी करण्याचा कल हळूहळू कमी होत आहे. म्हणजेच आता लोक जास्तीत जास्त वेळा  डिजिटल पेमेंट करत आहेत. हे खूप उत्साहवर्धक आहे. तुम्ही देखील आणखी एक गोष्ट करू शकता. तुम्ही ठरवू शकता  की पुढचा महिनाभर  तुम्ही फक्त UPI किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमातून पेमेंट कराल आणि रोख रक्कम देणार नाही. भारतातील डिजिटल क्रांतीच्या यशामुळे आता  हे शक्य होणार आहे. आणि असा एक महिना पूर्ण झाल्यावर, तुम्ही कृपया  आपले अनुभव आणि  फोटो मला पाठवा. मी तुम्हाला आत्ताच पुढच्या महिन्यासाठी  शुभेच्छा देतो.

माझ्या कुटुंबियांनो, आपल्या  तरुण मित्रांनी देशाला आणखी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे, ज्यामुळे आपले मन अभिमानाने फुलून जाणार आहे. बुद्धिमत्ता, नूतन कल्पना आणि नवोन्मेष - ही आज भारतीय तरुणांची ओळख बनली आहे.  तंत्रज्ञानाच्या जोडीनेच  त्यांच्या intellectual property मध्ये,  बौद्धिक संपदेत देखील  सतत वाढ होत राहणे, हीच मुळात  देशाच्या क्षमता वाढवणारी  महत्त्वाची प्रगती आहे. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की भारतीयांकडून केल्या गेलेल्या पेटंट अर्जांमध्ये 2022 मध्ये  31 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने एक अतिशय मनोवेधक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा  अहवाल सांगतो की पेटंट दाखल करण्यात आघाडीवर असलेल्या टॉप-10 देशांमध्येही ह्या पूर्वी असे कधीच घडले नव्हते. या गौरवास्पद  कामगिरीबद्दल मी माझ्या तरुण सहकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. मी माझ्या तरुण मित्रांना विश्वासाने सांगू इच्छितो की तुमच्या प्रत्येक पाऊलामध्ये   देश   तुमच्या साथीला आहे. सरकारने ज्या  प्रशासकीय आणि नियमांतील सुधारणा केल्या आहेत त्यानंतर  आज आपली तरुणाई मोठ्या प्रमाणावर नवोन्मेषात, नव्या  संशोधनात  गुंतली आहे. 10 वर्षांपूर्वीच्या आकडेवारीशी तुलना केली, तर आज आमच्या पेटंटसना  10 पट अधिक मंजुरी मिळत आहे.

आपल्या सर्वांना माहितीच  आहे की पेटंटसमुळे देशाची बौद्धिक संपदाच फक्त वाढते असे नाही, तर त्यामुळे आपल्यासाठी  नवनवीन  संधींची दारेदेखील खुली होतात. इतकेच नाही तर त्यामुळे आपल्या  स्टार्ट-अपस ची ताकद आणि क्षमता देखील वाढते. आज आपल्या शाळकरी मुलांच्या मनात देखील नवीन संशोधनात आणि नवोन्मेषाच्या भावनेचा विकास केला जात आहे. अटल टिंकरिंग लॅब, अटल इनोव्हेशन मिशन, महाविद्यालयात इन्क्युबेशन सेंटर्स, स्टार्ट-अप इंडिया अभियान, अशा सातत्यपूर्ण प्रयत्नांचे चांगले परिणाम देशवासियांसमोर दिसत आहेत. हे देखील भारताच्या युवा शक्तीचे, भारताच्या नाविन्यपूर्ण शक्तीचे प्रत्यक्ष  उदाहरण आहे. याच  उत्साहाने आपण ह्या पुढेही चालत राहू व  विकसित भारताचा आपला संकल्प निश्चित साध्य करून दाखवू आणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा म्हणतो, 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान '. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला आठवत असेल की मी  'मन की बात' मध्येच,  काही दिवसांपूर्वी  भारतात मोठ्या संख्येने भरणाऱ्या मेळ्यांबद्दल, जत्रांबद्दल  सांगितले होते. तेव्हा  एका स्पर्धेची कल्पना समोर आली, ज्यामध्ये लोक मेळ्यांचे वा जत्रांशी  संबंधित फोटो प्रसिद्ध  करतील. सांस्कृतिक मंत्रालयाने ह्याच विषयी ‘ मेला मोमेंट्स स्पर्धेचे ; - मेळ्यातील क्षण ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते. तुम्हाला हे ऐकून आनंद वाटेल की हजारो लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यातील अनेकांनी बक्षिसेही जिंकली. कोलकाता येथे राहणारे श्री. राजेश धरजी यांनी “चरक मेळा” मधील फुगे आणि खेळणी विकणाऱ्याच्या त्यांनी काढलेल्या अप्रतिम फोटोसाठी पुरस्कार मिळवला.  ही जत्रा ग्रामीण बंगालमध्ये खूपच  लोकप्रिय आहे. अनुपम सिंह जी यांना वाराणसीच्या होळी उत्सवाच्या फोटोसाठी “ मेळा  पोर्ट्रेट पुरस्कार मिळाला. 'कुलसाई दसरा'शी संबंधित एक आकर्षक पैलू दाखविल्याबद्दल अरुण कुमार नलीमेलाजी यांना पुरस्कार देण्यात आला. तसेच पंढरपूरमधील  भक्तीभाव दाखवणारा एक फोटो लोकांना सर्वात जास्त आवडलेल्या फोटोमध्ये समाविष्ट झाला. तो  फोटो पाठवला होता महाराष्ट्रातील श्री. राहुलजी ह्यांनी.  या स्पर्धेत आलेले  अनेक फोटो,  जत्रेत मिळणाऱ्या  स्थानिक पदार्थांचे, पक्वान्नांचे होते.  यामध्ये पुरलिया येथे राहणारे आलोक अविनाश जी ह्यांनी पाठवलेल्या फोटोला पुरस्कार मिळाला. त्यांनी बंगालच्या ग्रामीण भागातील एका जत्रेमधील खाद्यपदार्थ दाखवले होते. प्रणव बसाकजींनी काढलेल्या फोटोलाही बक्षीस मिळाले. त्यांनी भगोरिया महोत्सवात कुल्फीचा आनंद घेणाऱ्या महिलांचा फोटो काढला होता. रुमेला जी ह्यांनी छत्तीसगडमधील जगदलपूर येथील गावातील जत्रेत भजी खाणाऱ्या  महिलांचा फोटो पाठवला होता - त्यालाही बक्षीस मिळाले. 

मित्रांनो, ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी आज प्रत्येक गावाला, प्रत्येक शाळेला , प्रत्येक पंचायतीला अशा स्पर्धा सातत्याने आयोजित करण्याची विनंती करेन. . आजकाल सामाजिक माध्यमांची शक्ती इतकी  वाढली आहे, तंत्रज्ञान आणि मोबाईल फोन घरा घरात पोहोचले आहेत. मग तो तुमचा स्थानिक सण असो किंवा उत्पादन, ह्या द्वारे तुम्ही जगापर्यंत पोचू शकता. 

   मित्रांनो, जसं गावोगाव  जत्रा भरतात, त्याचप्रमाणे इथल्या विविध नृत्यांचीही स्वतःची परंपरा आहे. झारखंड, ओडिशा आणि बंगालच्या आदिवासी भागात 'छऊ' नावाचे नृत्य  अतिशय प्रसिद्ध आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत ‘ ह्या विचाराने,  श्रीनगरमध्ये १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान 'छऊ' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्वांनी 'छऊ' नृत्याचा आनंद लुटला. श्रीनगरमधील तरुणांना 'छऊ' नृत्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. ह्याच प्रकारे,  काही आठवड्यांपूर्वी कठुआ जिल्ह्यात 'बसोहली उत्सव' आयोजित करण्यात आला होता. हे स्थान जम्मूपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. या महोत्सवात स्थानिक कला, लोकनृत्य आणि पारंपरिक रामलीलेचे आयोजन करण्यात आले होते.

   मित्रांनो, भारतीय संस्कृतीचं सौदंर्य सौदी अरेबियातही अनुभवायला मिळालं. याच महिन्यात सौदी अरेबियात संस्कृत उत्सव नावाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम अत्यंत अनोखा होता आणि तो संपूर्ण कार्यक्रम संस्कृतमध्ये होता. संवाद, संगीत, नृत्य सारे काही संस्कृतमध्ये. त्यात स्थानिक लोकांचा सहभागही पहायला मिळाला.

 माझ्या परिवारातील सदस्यांनो,  स्वच्छ भारत आता तर संपूर्ण देशाचा प्रिय विषय बनला आहे. माझा तर तो आवडता विषय आहेच. आणि जेव्हा मला त्या विषयाशी एखादी जोडलेली बातमी मिळते तेव्हा माझं  मन त्याकडे धावत जातं. आणि हे स्वाभाविक आहे की मन की बातमध्ये त्या बातमीला  जागा मिळतेच. स्वच्छ भारत अभियानानं साफसफाई आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत लोकांची मानसिकता बदलली आहे. हा उपक्रम आज राष्ट्रीय भावनेचं प्रतीक बनला आहे, जिने करोडो देशवासियांचं  जीवन सुखमय बनवलं आहे.   या अभियानानं  वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना खास करून युवकांच्या सामूहिक भागीदारीसाठी  प्रेरित केलं आहे.  असाच एक  प्रशंसनीय प्रयत्न सूरतमध्ये पहायला मिळाला आहे. युवकांच्या एका संघानं इथं प्रोजेक्ट सुरत  ची सुरूवात केली  आहे. याचं लक्ष्य सुरतला एक आदर्श शहर बनवायचं आहे जे स्वच्छता आणि शाश्वत विकासांचं एक उत्कृष्ट उदाहरण बनले. सफाई संडे नावाच्या सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत सुरतचे युवक प्रथम सार्वजनिक जागा आणि ड्यूमास बीचची स्वच्छता करत असत. नंतर हे लोक तापी नदीच्या किनाऱ्यांची स्वच्छता करण्यासाठी पूर्णपणे जोडले गेले आणि आपल्याला हे समजून आनंद होईल की पाहता पाहता या उपक्रमाशी जोडलेल्या लोकांची संख्या आता पन्नास हजारावर पोहचली आहे. लोकांकडून मिळालेल्या समर्थनामुळे टीमचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर त्यांनी कचरा गोळा करण्याचं कामही सुरू केलं. आपल्याला हे समजून संतोष वाटेल की या लोकांनी लाखो किलो कचरा हटवला आहे. जमिनी स्तरावरून केले जाणारे  असे प्रयत्न खूप मोठे परिवर्तन घडवून आणणारे ठरतात.

मित्रांनो, गुजरातेतूनच एक माहिती हाती आली आहे. काही आठवडे अगोदर तेथे अंबाजीमध्ये भादरवी पून मेळ्याचं आयोजन केलं गेलं होतं. या मेळ्यात ५० लाखाहून अधिक लोक आले. हा मेळा दरवर्षी होत असतो.  या मेळ्याची सर्वात खास बाब ही होती की मेळ्य़ासाठी आलेल्या लोकानी गब्बर हिल च्या एक मोठ्या भागात स्वच्छता मोहीम राबवली. मंदिरांच्या आसपासच्या सर्व  जागेची स्वच्छता करण्याचं हे अभियान अत्यंत प्रेरक आहे.
   मित्रानो, मी नेहमी हे सांगत असतो की हे स्वच्छता अभियान एका दिवसाचं किंवा एका आठवड्याचं अभियान नाही. तर ते एक जीवनात झोकून देण्याचं काम आहे. आम्ही आपल्या आसपास असे लोक पहातो की ज्यांनी आपलं पूर्ण जीवन स्वच्छतेशी  संबंधित विषयातच घालवलं आहे. तामिळनाडूच्या कोईमतूर जिल्ह्यातील लोगानाथजी हे यांचं उदाहरण अजोड आहे. लहानपणी ते गरीब मुलांचे फाटलेले कपडे पाहून ते व्यथित होत. त्यानंतर त्यांनी अशा मुलांना मदत करण्याचा निश्चय केला आणि आपल्या कमाईतील एक भाग ते या मुलांच्या मदतीसाठी दान करू लागले. पैसे कमी पडले तर लोगानाथनजी यांनी लोकांचे स्वच्छतागृहांचीही साफसफाई केली  ज्यामुळे गरजू मुलांना मदत होईल. ते गेल्या २५ वर्षात पूर्णपणे समर्पित भावानं  या कामाला जोडले गेले आहेत आणि आतापर्यंत १५०० हून अधिक मुलांची त्यांनी मदत केली आहे. मी पुन्हा एकदा अशा प्रयत्नांची प्रशंसा करतो. देशभरात होत असलेले असे अनेक प्रयत्न हे आम्हाला केवळ प्रेरणा देत नाहीत तर  काही तरी नवीन करण्याची इच्छाशक्तीही आमच्यात जागवतात.
     माझ्या कुटुंबातील सदस्यांनो, २१व्या शतकातील आव्हानांपैकी एक आहे जल सुरक्षा. पाण्याचं संरक्षण करणं हे जीवन वाचवण्यापेक्षा कमी नाही. जेव्हा आम्ही सामूहिकतेच्या भावनेतून एखादं काम करतो. तेव्हा तर यशही मिळत असतं. याचं एक उदादरण देशातील प्रत्येक जिल्ह्यात तयार होत असलेल्या अमृतसरोवर हेही आहे. अमृत महोत्सव दरम्यान भारताने जी ६५ हजाराहून अधिक अमृत सरोवरं बनवली आहेत, ती येणाऱ्या पिढ्यांना लाभ देतील. आता आमची  ही जबाबदारी आहे की जेथे जेथे अमृत सरोवरं बनली आहेत.त्यांची निरंतर देखभाल केली जावी. ते जल संरक्षणाचे प्रमुख स्रोत बनून रहावेत.
  मित्रांनो, जल संरक्षणाच्या अशाच चर्चेमध्ये मला गुजरातच्या अमरेलीमध्ये झालेल्या जलउत्सवाबद्दलही समजलं. गुजरातेत बारा मास वाहणाऱ्या नद्यांचा अभाव आहे . त्यामुळे  लोकांना जास्त करून पावसाच्या पाण्यावरच अवलंबून रहावं लागतं. गेल्या वीस पंचवीस वर्षात सरकार आणि सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांनंतरही तेथील स्थितीत परिवर्तन जरूर आलं आहे. म्हणून तेथे जलउत्सवाची प्रमुख भूमिका आहे. अमरेली मध्ये झालेल्या जल उत्सवाच्या दरम्यान जल संरक्षण आणि तलावाच्या संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. त्यात वॉटर स्पोर्ट्सलाही उत्तेजन देण्यात आलं. जल सुरक्षेबाबत जाणकारांशी चर्चाही करण्यात आली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना तिरंग्याचा कारंजे फारच पसंत पडलं. या जल  उत्सवाचं आयोजन सूरतमध्ये हिरे व्यवसायात नाव कमावलेल्या सावजी भाई ढोलकिया प्रतिष्ठाननं केलं होतं. मी तेथे सहभागी झालेल्या प्रत्येकाचं
अभिनंदन करतो, जल संरक्षणासाठी असंच काम करत रहाण्यासाठी शुभेच्छा देतो.

     माझ्या कुटुंबीयांनो, आज जगभरात कौशल्य विकासासाठी स्वीकारार्हता मिळत आहे. जेव्हा आम्ही एखाद्याला कौशल्य शिकवतो तेव्हा त्याला त्याला एक हुनरच नाही तर उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देत असतो. जेव्हा मला हे समजलं की एक संस्था गेल्या चार दशकांपासून कौशल्य विकासाच्या कामात गुतलेली आहे, तर मला अधिकच चांगल वाटलं. ही संस्था आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलममध्ये आहे.  आणि तिचं नाव बेल्जीपुरम यूथक्लब असं आहे. कौशल्य विकासावर फोकस करून बेल्जीपुरम यूथ क्लबनं जवळपास 7000 महिलांना सक्षम बनवलं आहें. यातील सर्वाधिक महिला आज स्वबळावर काही काम करत आहेत. या संस्थेनं बाल मजुरी करणाऱ्या मुलांनाही काही ना काही कौशल्य शिकवून त्यांना दुष्टचक्रातून  बाहेर निघण्यास मदत केली आहे. बेल्जीपुरम यूथक्लबच्या टीमनं शेतकरी उत्पादन संघ म्हणजे एफपीओ शी जोडल्या  गेलेल्या शेतकऱ्यांना नवीन कौशल्य शिकवलं आहे ज्यामुळे शेतकरी सक्षम झाले आहेत. हा यूथ क्लब स्वच्छतेबाबतही गावागावात जागृती करत आहे. संस्थेने अनेक शौचालयं निर्माण करण्यातही मदत केली आहे. मी कौशल्य विकासासाठी या संस्थेशी जोडल्या गेलेल्या सर्व लोकांचं अभिंनंदन करतो. त्यांची प्रशंसा करतो. देशाच्या गावागावात कौशल्य विकासासाठी अशा सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. मित्रांनो, जेव्हा एका लक्ष्यासाठी सामूहिक प्रयत्न होतो. तेव्हा, तेव्हा यशाची उंचीही अधिक होऊन जाते. मी आपल्यासर्वांना लद्दाखचे एक प्रेरक उदाहरण सांगू इच्छितो. आपण पश्मिना शालींच्याबात तर ऐकलंच असेल,गेल्या काही काळापासून लद्दाखी पश्मिना शालींची खूप चर्चा होत आहे. लद्दाखी पश्मिना लूम्स ऑफ लद्दाखनावाने जगभरात बाजारपेठांत जात आहे. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल की या शाली तयार करण्यात १५ गावांतील ४५० हून अधिक महिला सहभागी आहेत. सुरूवातीला त्या ही उत्पादने येथे आलेल्या पर्यटकांनाच विकत होत्या. पण आता डिजिटल भारतच्या या काळात त्यांनी बनवलेल्या या वस्तु देश आणि जगातील वेगवेगळ्या बाजारात पोहचत आहेत. म्हणजे आमचे लोकल आता ग्लोबल होत आहे.आणि यातून या महिलांचं उत्पन्न ही वाढलं आहे.
   मित्रांनो, नारी शक्तीचं असं यश देशाच्या कानाकोप-यात  आहे. अशा बाबी जास्तीत जास्त समोर आणण्याची आवश्यकता आहे. आणि हे सांगण्यासाठी मन की बातपेक्षा दुसरे अधिक चांगले व्यासपीठ काय असू शकते. तर आपणही अशा प्रकारची जास्तीत जास्त उदाहरणे माझ्यासोबत सामायिक करा  ते सुद्धा    आपल्यासमोर आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.
माझ्या कुटुंबियांनो, मन की बातमध्ये आपण असे सामूहिक प्रयत्नांची चर्चा करत आहोत.   ज्यांनी समाजात मोठमोठी बदल झाले आहेत. मन की बातचं एक यश हेही आहे की, याने घराघरात रेडिओला लोकप्रिय बनवलं आहे. माय गव्ह वर मला उत्तरप्रदेशच्या अमरोहाचे रामसिंह बौद्धजी यांचं पत्र मिळालं आहे. रामसिंह जी गेल्या अनेक वर्षापासून रेडिओंचा संग्रह करण्याच्या कामात जोडले आहेत.  त्यांचे असं म्हणणं आहे की मन की बात कार्यक्रमानंतर त्यांचा रेडिओ म्युझियम  संग्रह पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. असंच मन की बात ने प्रेरित होऊन अहमदाबादच्या जवळच तीर्थधाम प्रेरणा तीर्थनं एक मनोरंजक प्रदर्शन भरवलं आहे. यात देशविदेशातले १०० हून जास्त जुने रेडिओ ठेवले आहेत. इथं मन की बात चे सारे भाग ऐकले जाऊ शकतात. आणखी ही अशी उदाहरणे आहेत की  जेथे मन की बात पासून प्रेरणा घेऊन कशा प्रकारे आपलं स्वतःचं काम सुरू केलं. असंच एक उदाहरण कर्नाटकच्या चामराजनगर च्या वर्षाजींचं आहे. ज्यांना मन की बातनं आपल्या पायावर उभं राहण्यासाठी प्रेरित केलं. या कार्यक्रमातील एका एपिसोडपासून प्रेरणा घेऊन त्यांनी केळीपासून जैविक खत तयार करण्यास सुरूवात केली. निसर्गाशी अत्यंत जवळीक जपलेल्या वर्षाजींचा हा उपक्रम इतरांसाठीही रोजगाराची संधी घेऊन आला आहे.
     माझ्या कुटुंबियांनो, उद्या २७ नोव्हेंबरला कार्तिक पूर्णिमेचं पर्व आहे. याच दिवशी देवदिवाळीही साजरी केली जाते. आणि माझं मन तर असं म्हणतं की काशीची देवदिवाळी जरूर पाहू. यावेळी मी काशीला तर जाऊ शकत नाही. परंतु  बनारसच्या लोकांना मन की बातच्या माध्यमातून माझ्य़ा शुभकामना पाठवत आहे. यावेळीही काशीच्या घाटांवर लाखो दिवे पेटवले जातील. भव्य आरती होईल, लेसर शो होईल लाखांच्या संख्येने देशविदेशातील लोक येऊन देवदिवाळीचा आनंद लुटतील.
    मित्रांनो, उद्या कार्तिक पोर्णिमेच्या दिवशीच गुरू नानकदेवजींचं प्रकाश पर्व आहे. गुरू नानकजींचे अनमोल संदेश भारताच नव्हे तर जगासाठी आजही प्रेरक आणि प्रासंगिक आहेत. ते आम्हाला साधेपणा, सद्भाव आणि दुस-यांप्रती समर्पित होण्यासाठी प्रेरित करतात. गुरू नानकदेवजी यांनी सेवाभावना आणि सेवाकार्याची जी शिकवण दिली  आहे, तिचं पालन पूर्ण विश्वातली शीख  बंधुभगिनी  करताना दिसतात. मी मन की बातच्या सर्व श्रोत्यांना गुरू नानकदेवजीच्या प्रकाशपर्वबद्दल शुभेच्छा देतो.  
माझ्या कुटुंबियानो, आज मन की बातमध्ये  यावेळी इतकंच. पाहता पाहता  वर्ष २०२३ समाप्तीच्या दिशेंनं निघालं आहे.    प्रत्येकवर्षी प्रमाणेच आपण आणि मी विचार करत  आहोत की अरे किती लवकर हे वर्ष संपलं. पण हेही सत्य आहे की हे वर्ष भारतासाठी असीम यशाचं राहिलं आहे. भारताचं यश हे प्रत्येक  भारतीयांचं यश आहे.  मला याचा आनंद आहे की मन की बात भारतीयांचं  यश  समोर आणण्याचं एक सशक्त माध्यम बनलं आहे. पुढील वेळेला देशावासियांच्या  अनेक यशांबद्दल पुन्हा आपल्याशी चर्चा होईल. तोपर्यंत मला निरोप द्या. धन्यवाद. 
खूप खूप धन्यवाद, 
नमस्कार.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025

Media Coverage

India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 डिसेंबर 2024
December 24, 2024

Citizens appreciate PM Modi’s Vision of Transforming India