सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ मिळाल्याबद्दल खूप-खूप अभिनंदन. जेव्हापासून तुम्हाला समजले असेल की तुमचे नाव या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे, तेव्हा तुमची उत्कंठा वाढली असेल. तुमचे आईवडील, मित्र , शिक्षक , ते सर्वजण देखील तुमच्याइतकेच उत्सुक असतील. तुमच्याप्रमाणे मी देखील तुम्हाला भेटण्याची वाट पाहत होतो. मात्र कोरोनामुळे आता आपली आभासी भेट होत आहे.
प्रिय मुलांनो
तुम्ही जे काम केले आहे, तुम्हाला जो पुरस्कार मिळाला आहे, तो यासाठी देखील खास आहे कारण तुम्ही हे सगळे कोरोना काळात केले आहे. एवढ्या कमी वयात तुमची ही कामगिरी अवाक करणारी आहे. कुणी क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करत आहे , काहीजण तर आतापासून संशोधन करत आहेत. तुमच्यातूनच उद्याचे देशाचे खेळाडू, देशाचे वैज्ञानिक, देशाचे नेते , देशाचे मोठमोठे मुख्य कार्यकारी अधिकारी भारताची गौरवशाली परंपरा वृद्धिंगत करताना दिसतील. आता जी चित्रफीत सुरु होती त्यात तुमच्या सगळ्यांच्या कामगिरीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली होती. तुमच्यापैकी अनेक मुलांबाबत मला अध्ये -मध्ये माहिती मिळत असते, ऐकले आहे. आता पहा, मुंबईची मुलगी आपली काम्या कार्तिकेयन. तुम्हाला आठवत असेल, मी मन की बात मध्ये देखील तिचा उल्लेख केला होता. काम्या हिला गिर्यारोहण क्षेत्रात देशाचे नाव उंचावल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे. चला, आज आपण काम्याशीच बोलूया. तिच्यापासूनच सुरुवात करूया. मला तिला काही तरी नक्कीच विचारायचे आहे.
प्रश्न - काम्या, आता सध्याच्या काळात मला नाही वाटत तू शांत बसली असशील , काही ना काही करत असशील. तू कोणता नवीन पर्वत सर केला आहेस ? काय केलंस या दिवसांमध्ये ? कोरोनामुळे काही अडचणी आल्या का , काय झाले ?
उत्तर- सर, कोरोनाने संपूर्ण देशासमोरच थोडयाफार प्रमाणात आव्हाने निर्माण केली आहेत. परंतु, जसे तुम्ही म्हणालात, आपण असेच बसून राहू शकत नाही. आपल्याला कोरोना नंतरही धीराने बाहेर यायचे आहे. मी माझे प्रशिक्षण आणि सगळे दैनंदिन व्यवहार कोरोना काळातही सुरूच ठेवले आणि आता यावेळी आम्ही जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग मध्ये आहोत आणि माझ्या पुढल्या पर्वतारोहणासाठी प्रशिक्षण घेत आहे, जे उत्तर अमेरिकेतले माउंट देनाली आहे. आणि आम्ही यावर्षी जूनमध्ये माउंट देनाली चढण्यासाठी आतापासून प्रशिक्षण घेत आहोत.
प्रश्न – तर आता तुम्ही बारामुला येथे आहात ?
उत्तर – हो, सर, कार्यालयाने आम्हाला खूप मदत केली आहे आणि त्यांनीही गेल्या तीन दिवसांपासून 24x7 काम केले आहे. आणि आम्ही इथे बारामुल्ला मध्ये येऊन तुम्हाला भेटू शकलो आहोत .
प्रश्न – तुझ्याबरोबर आणखी कोण आहेत ? ओळख करून दे.
उत्तर- सर, ही माझी आई आहे आणि हे बाबा आहेत.
पापा – नमस्कार
मोदी जी –तुमचेही अभिनंदन. तुम्ही मुलीचे मनोबल देखील वाढवले आणि तुम्ही तिची मदत देखील केली आहे. अशा आईवडिलांचे तर मी विशेष अभिनंदन करतो.
प्रश्न - अच्छा, तुझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार तर तुझी मेहनत आणि तुझे मनोबल हेच आहे. तू तर पर्वतांवर चढतेस, ट्रेकिंग करतेस आणि संपूर्ण जग फिरतेस , आणि अचानक जेव्हा कोरोनामुळे सगळे बंद झाले तेव्हा हे वर्ष तू कसे पार पाडलेस ? काय करत होती?
उत्तर – सर, मी कोरोनाकडे एक संधी म्हणून पाहिले , मला …
प्रश्न – म्हणजे तू सुद्धा संकटाला संधीत बदललेस?
उत्तर – हो सर
प्रश्न – सांग
उत्तर – सर, आता जाऊन पर्वत तर नाही चढू शकत, मात्र मला वाटले की मी या काळात इतरांसाठी प्रेरणा बनू शकते. तर मी या काळात अनेक शाळा आणि संस्थांमध्ये वेबिनार देत आहेआणि माझ्या मोहिमेबाबत माहिती देत आहे आणि त्याचा संदेश देखील सर्वापर्यन्त पोहचवायचा आहे, सर
प्रश्न – मात्र शारीरिक तंदुरुस्तीसाठी देखील काही करावे लागत असेल ?
उत्तर- हो सर, साधारणपणे आम्ही धावायला आणि सायकल चालवायला जायचो मात्र पहिल्या लॉकडाऊनमध्ये याला परवानगी नव्हती. त्यामुळे मुंबईत आम्ही ज्या 21 मजली इमारतीत राहतो, तिथेच आम्ही तंदुरुस्त राहण्यासाठी जिने वर खाली चढायचो उतरायचो. आणि लॉकडाऊन थोडा शिथिल झाल्यानंतर आम्ही मुंबईला राहायला गेलो असल्यामुळे , शनिवार-रविवारी सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये छोटे मोठे ट्रेक करत होतो.
प्रश्न – मुंबईत थंडी काय असते हे माहीतच नसेल. इथे तर आज बारामुल्ला मध्ये कडाक्याच्या थंडीत राहत असशील तू?
उत्तर – हो सर
पंतप्रधानांची टिप्पणी:
हे पहा, कोरोनाने निश्चितच सर्वाना प्रभावित केले आहे. मात्र मी एक गोष्ट पाहिली आहे की देशातली मुले, देशाच्या भावी पिढीने या महामारीचा सामना करण्यात खूप मोठी भूमिका पार पाडली आहे .साबणाने 20 सेकंद हात धुणे असेल - ही गोष्ट मुलांनी सर्वप्रथम आत्मसात केली. आणि मी तेव्हा सोशल मीडियावर कितीतरी व्हिडिओ पहायचो ज्यात मुले कोरोनापासून वाचण्यासाठी उपाय सांगायची. आज हा पुरस्कार अशा सर्व मुलाना देखील मिळाला आहे. अशी कुटुंब आणि असा समाज, जिथे मुलांकडून शिकण्याची संस्कृती असते , तिथे मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास तर होतोच, त्याचबरोबर मोठ्यांमध्ये देखील नवीन शिकण्याची इच्छा कायम राहते. त्यांचा उत्साह कायम राहतो. आणि मोठी मंडळी देखील विचार करतात की -अरे वाह...आपल्या मुलांनी सांगितले आहे तर आपण नक्कीच करू. आपण हे कोरोना काळात देखील पाहिले आहे आणि स्वच्छ भारत अभियानादरम्यान देखील मी पाहिले आहे. मुले जेव्हा एखाद्या अभियानात सहभागी होतात तेव्हा त्यात नक्की यश मिळते. काम्या तुझे , तुझ्या आईवडिलांचे, तुझ्या प्रशिक्षकांचे , सर्वांचे मी खूप अभिनंदन करतो. खूप-खूप शुभेच्छा देतो. आणि तू काश्मीरची मजा देखील लूट आणि नव्या साहसाने पुढे देखील जा. आपले आरोग्य, आपली तंदुरुस्ती याकडे लक्ष दे, नवी उंची गाठ , नवनवीन शिखरे सर कर. प्रिय मुलांनो, आपल्याबरोबर आज झारखंडची एक कन्या देखील आहे , सविता कुमारी. तिला क्रीडा प्रकारातील सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
प्रश्न - सविता , तू कधी ठरवलंस की तुला नेमबाजीमध्ये पुढे जायचे आहे? हा विचार कुठून आला आणि यात तुला तुझ्या कुटुंबाची मदत तर झालीच असेल. तर मला तुझ्याकडून हे नक्कीच ऐकायला आवडेल ,जेणेकरून देशातील मुलांना समजेल की झारखंडच्या दूर-सुदूर जंगलांमध्ये आपली एक मुलगी काय पराक्रम गाजवत आहे , यातून देशातील मुलांना प्रेरणा मिळेल. सांग .
उत्तर- सर, मी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिकत होते, तिथेच मला नेमबाजी शिकण्याची प्रेरणा मिळाली.
प्रश्न- तू देशासाठी पदक प्राप्त करायला सुरुवात देखील केली आहेस . संपूर्ण देशाच्या शुभेच्छा तुझ्याबरोबर आहेत. भविष्यासाठी तुझ्या मनात कोणती उद्दिष्टे आहेत, कुठवर खेळायचे आहे?
उत्तर- सर, मला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकायचे आहे आणि देशासाठी जेव्हा राष्ट्रगीताची धून वाजते तेव्हा मला खूप छान वाटते.
प्रश्न – वाह! तुझ्याबरोबर कोण-कोण आहेत ?
उत्तर – सर, आई आली आहे आणि इथे वडील देखील आले आहेत.
प्रश्न– अच्छा, ते देखील खेळायचे का ? वडिलांनी कधी खेळांमध्ये भाग घेतला होता का ?
उत्तर – सर , नाही .
प्रश्न – अच्छा , सर्वात आधी सुरुवात तू केलीस?
उत्तर – हो , सर
प्रश्न– आता जेव्हा तुला बाहेर जावे लागते, तेव्हा आईबाबांना काळजी वाटत नाही ना ?
उत्तर – सर, आता सर आहेत ना बरोबर, त्यांच्याबरोबर जाते.
प्रश्न– अच्छा
पंतप्रधानांची टिप्पणी:
आपण ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळावे, सुवर्णपदक जिंकून यावे, ही तुमची स्वप्ने खरोखरच भारतातील प्रत्येक मुलाला नवी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरणा देतात. माझ्या शुभेच्छा कायम तुमच्याबरोबर असतील. क्रीडा जगतात झारखंडची जी गुणवत्ता आहे त्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. मी तर पाहिले आहे की झारखंडच्या मुली मोठी कमाल करतात. कशा प्रकारे खेळांमध्ये आपला दबदबा निर्माण करत आहेत. छोटी -छोटी गावे, छोट्या शहरांमधून जेव्हा तुझ्यासारखे प्रतिभावान खेळाडू उदयाला येतात, तेव्हा जगात देशाचे नाव उज्वल करतात. सविता, तुला माझे खूप-खूप आशीर्वाद आहेत. खूप पुढे जा.
उत्तर – धन्यवाद सर.
माननीय पंतप्रधान महोदयांची प्रतिक्रिया-
वा:! जगात भारताचं नाव उंचावावं, नव्या भारताची ओळख आणखी भक्कम व्हावी ही अतिशय मोठी जबाबदारी आपल्या देशाच्या नवयुवकांवर आहे आणि हे उत्फुल्ल तरुणांनो, माझ्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. तुमच्या मनात खूप क्लॅरिटी आहे- खूप स्पष्टता आहे. आणि आपल्या कुटुंबांनी, आपल्या माता-पित्यांनी लहानपणापासून तुमच्यासमोर माननीय अब्दुल कलाम यांचा आदर्श ठेवला आहे त्यांचं नवभारताबद्दलचं स्वप्न तुमच्या डोळ्यांसमोर ठेवलं आहे. तुम्हाला अत्यंत योग्य वाट दाखवल्याबद्दल मी तुमच्या आई-वडिलांचं अभिनंदन करतो. 'हिरो कसे असावेत? आयडियल- आदर्श कोण असावेत?' हे लहानपणीच त्यांनी तुम्हाला शिकवल्यामुळे, तुमच्या जीवनाला आकार प्राप्त झाला. आणि तुम्हीही आपल्या आईवडिलांनी दिलेला कानमंत्र जगण्यात उतरवलात. म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो.
चला, आता गुजरातमध्ये एक चक्कर मारू. गुजरातच्या 'मंत्र जितेंद्र हरखानी' याच्याशी बोलूया. मंत्र जितेंद्रला पोहण्यामध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
प्रश्न-1- मंत्र, केम छो? मजा मे थे? तारे साथ कौन-कौन छे? (मंत्र कसा आहेस? मजेत? तुझ्याबरोबर कोण आहे?)
उत्तर- माझ्याबरोबर आईवडील आहेत.
प्रश्न- अच्छा, मंत्र, मला एक सांग हं..देशभरातले लोक आज तुझ्याकडे पाहतायत. तू इतकं मोठं धाडस करून देशाचं नाव उज्ज्वल केलं आहेस. बघ हं, माझ्याही लहानपणी, माझ्या गावात- वडनगरमध्ये- आमच्याइथे मोठं तळं होतं. आम्ही सगळी मुलं त्यात पोहत असू. पण ते पोहणं आणि तुझं पोहणं, यात खूप फरक आहे. खूप प्रशिक्षण घ्यावं लागतं, खूप कष्ट करावे लागतात. आणि तू तर, जलतरणात रेकॉर्ड करतोयस- विक्रम प्रस्थापित करतोयस, लोकांचं स्फूर्तिस्थान बनला आहेस. तू तर ऍथलिट आहेस. आणि ऍथलिट तर लक्ष्यप्राप्तीसाठी खूप फोकस्ड असतात- त्याकडे त्यांचं खूप लक्ष असतं. तर मग मला सांग, तुझं लक्ष्य काय आहे? काय करायचं आहे तुला भविष्यात? पुढे पुढे कसं जायचंय? सांग बरं, माझ्याशी बोल.
उत्तर- गुड मॉर्निंग सर,
प्रश्न – हा ,गुड मार्निंग। सांग सांग..
उत्तर – सर, मला जगातला best swimmer- सर्वोत्कृष्ट जलतरणपटू व्हायचंय. आणि तुमच्यासारखा होऊन देशाची सेवा करण्याची माझी इच्छा आहे.
प्रश्न – बघ, तुझ्या मनात इतकं मोठं स्वप्न आहे.. मला अगदी पक्की खात्री आहे की, तुझे आईवडील ज्या समर्पण भावनेनं तुला आपला वेळ देत आहेत, तूच त्यांच्या जीवनाचं स्वप्न बनून गेला आहेस, तूच त्यांचा जीवनमंत्र बनून गेला आहेस. आणि त्यामुळेच तू जो पराक्रम गाजवतो आहेस, ज्या हिमतीनं आणि मेहनतीनं पुढे जात आहेस, त्याने केवळ तुझ्या माता-पित्यांनाच असं नाही, तर अनेकांना अभिमान वाटतो आहे. तुझ्याचसारख्या जितक्या मुलांचे आईवडील असतील, त्या साऱ्यांसाठी तुझे आईवडील एक प्रेरणा बनले आहेत. आणि तूही प्रेरणा बनला आहेस. म्हणूनच मी तुझं अभिनंदन करतो. खूप छान उत्साहानं तू बोलतो आहेस. हीदेखील एक मोठी गोष्ट आहे. मी पुन्हा एकदा तुझं अभिनंदन करतो, आणि मला अशी माहिती मिळाली आहे, की बहुतेक तुझे जे प्रशिक्षक होते, त्यांनी तुला वचन दिलं आहे- माझी भेट घडवून आणण्याचं. दिलंय ना? मग अजूनपर्यंत भेट झाली नाही, म्हणून तू भांडला का नाहीस त्यांच्याशी?
उत्तर – तुम्हीच या. मी इथे चहा पाजेन तुम्हाला.
प्रश्न – मग, मी जेव्हा गुजरातमध्ये येईन, तेव्हा भेटायला येशील मला?
उत्तर – नक्की येईन.
प्रश्न – मग राजकोटहून गांठिया घेऊन यावं लागेल हं . .. काय म्हणतोय बरं हा?
उत्तर – सर, हा म्हणतोय की जेव्हा तुम्ही याला तेव्हा जिलबी, गांठिया सगळं घेऊन येऊ. तुम्ही म्हणाल तर चहाही पाजू.
अच्छा, तर मित्रांनो, यावर्षी राष्ट्रीय बाल पुरस्कारांमध्ये जी विविधता आहे, ती खूपच छान गोष्ट आहे. आता तिरंदाजीतून बाहेर निघत आपण कलेच्या जगाची सफर करुया. मणिपूर ची कन्या आपली नवीश कीशम, उत्तम पेंटींग्ज करण्यासाठी तिला आज पुरस्कार मिळाला आहे.
प्रश्न – तर बेटा नवीश, आम्हाला तुझ्याविषयी सांग, आम्ही तुझ्याबद्दल ऐकायला उत्सुक आहोत. तू खूप छान पेंटीग्ज करते. रंगांमध्ये तर तशीच खूप ऊर्जा असते. आणि तु ज्या भागात राहतेस तो ईशान्य भारतही विविधरंगी प्रदेश आहे. त्या रंगांना सजवले तर, हा आयुष्य भरून टाकणारा अनुभव असतो. मला असे सांगण्यात आलं आहे की तू पर्यावरणावर, वनसंपदेवर जास्तीत जास्त चित्र काढतेच. हाच विषय तुला इतका आकर्षित का करतो?
उत्तर – सगळ्यात आधी आपल्याला गुड आफ्टरनून सर. आपल्याशी वैयक्तिक संवाद साधता येणं हा खरोखरच माझा सन्मान आहे. माझं नाव वनीश कीशम आहे आणि मला पर्यावरण विषयावर चित्र काढायला आवडतं, कारण आजकाल दिवसेंदिवस पर्यावरण प्रदूषित होत आहे. इथे इम्फाल मध्ये देखील खूप प्रदूषण आहे. झाडं लावून पर्यावरण, आपली वृक्ष आणि वन्य संपदेचं, रक्षण करून मला हे सर्व बदलायचं आहे.आपले विशाल वृक्ष, मला त्यांना संरक्षण करायचं आहे,त्यामुळे एक कलाकार म्हणून माझ्या कलेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा मी प्रयत्न करते. .
प्रश्न - अच्छा ! तुझ्या कुटुंबात आणखी कोणी आहेत का ? जे पेंटिंग करतात? आई, बाबा, भाऊ, काका.. कोणी..
उत्तर – नाही सर! माझे वडील व्यावसायिक आहेत आणि माझी आई गृहिणी आहे. ,माझ्या घरात मी एकटीच कलाकार आहे.
प्रश्न – तुझ्यासोबत तुझे वडील आणि आई आहेत ना?
उत्तर – हो.
प्रश्न – तर मग हे तुला रागावत असतील, की तू काय दिवसभर चित्र काढत बसतेस, पेंटिंग करतेस? काही अभ्यास करत नाहीस, कामं करत नाहीस, असे रागावतात का?
उत्तर – नाही सर! ते खूप मदत करतात आणि प्रोत्साहन देतात मला.
प्रश्न – मग तर तू खूप नशीबवान आहेस. तू वयाने तर लहान आहेस, पण तुझे विचार खूप मोठे आहेत. अच्छा, पेंटीग व्यतिरिक्त तुला आणखी काय काय छंद आहेत?
उत्तर- सर, मला गायला खूप आवडतं. शिवाय बागकाम करण्याचीही आवड आहे.
पंतप्रधानांची टिप्पणी:
नवीश, मी मणिपूर ला अनेकदा आलो आहे.आणि माझा नेहमीच अनुभव आहे की तिथला निसर्ग मला खूप आकर्षित करतो. तिथे निसर्गाविषयी लोकांच्या मनात श्रद्धा आहे. निसर्गरक्षणासाठी संपूर्ण ईशान्य भारतात प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवाचीही पर्वा करत नाही. मणिपूर येथेही हेच आपल्याला बघायला मिळते आणि हे खूप उच्च संस्कार आहेत असे मी मानतो.
प्रश्न – अच्छा, तू गाणं गातेस, असं तू सांगितलंसं. तर काही ऐकवशील का मला?
उत्तर – हो सर ! मी काही व्यवसायिक गायिका नाही, पण गायला मला आवडतं म्हणून मी तुम्हाला एक लोकगीत ऐकवते.
उत्तर – वा वा !! फार सुंदर ! मी तुझ्या आईबाबांचे अभिनंदन करतो. आणि मला असं वाटतं की तू संगीत क्षेत्रातही काहीतरी करायला हवंस. आवाज छान आहे तुझा. मी काही संगीताचा जाणकार नाही, पण तुझं गाणं ऐकून छान वाटलं. तर आता तुला या सगळ्यासाठी आणखी मेहनत घ्यायला हवी. माझे तुला खूप खूप आशीर्वाद!
मित्रांनो,
आपल्या देशातील मुले इतकी गुणवान आहेत, त्यांच्यात इतकी कौशल्ये आहेत की त्यांची जेवढी तारीफ करावी, तेवढी कमीच. हेच बघा ना, एकीकडे इतकी उत्तम पेंटींग्ज तयार करणारी ही कन्या नवीश आहे तर कर्नाटकचा राकेश कृष्णही आहे. राकेशला शेतीशी सबंधित संशोधनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. राकेश तुझे खूप खूप अभिनंदन ! आणि मी तुझ्याशी बोलायला खूपच उत्सुक आहे.
प्रश्न – राकेश, जेंव्हा मी तुझं प्रोफाईल बघत होतो, तेंव्हा मला फार चांगलं वाटलं. इतक्या कमी वयात तू संशोधन करतो आहेस, ते देखील आपल्या शेतकऱ्यांबद्दल विचार करोत आहेस. तू विज्ञानाचा विद्यार्थी आहेस, तेंव्हा संशोधन करणे स्वाभाविकच आहे. पण शेतकऱ्यांसाठी संशोधन करायचे आहे, ही सामान्य गोष्ट नाही. तर, मला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल की यात तुझं मन कसं काय रमलं, हे काम करावं असं मनात कसं आलं?
उत्तर- सर, सर्व प्रथम नमस्कार आणि सर, मी सांगेन की मला विज्ञान आणि संशोधनात मला रस होता. पण सर माझे वडील शेतकरी आहेत आणि मी शेतकरी कुटुंबातला आहे. हे माझे वडील आहेत आणि ही माझी आई आहे. तर, सर मी सध्याच्या शेती पद्धतीत असलेल्या अनेक समस्या मला दिसत होत्या, त्यासाठी काही तरी तर करायचं होतं. आणि मला असं वाटत होतं की शेतकरी जे आपले अन्नदाता आहेत त्यांच्यासाठी काही तरी कारावं. माझं जे तांत्रिक संशोधन आहे, आणि त्यांना मदत करण्यासाठी मी एक यंत्र बनवले आहे सर. तर सध्या जी पद्धत आहे त्यापेक्षा माझ्या मशीनमुळे 50%हून जास्त नफा मिळतो सर.
प्रश्न – बरं, कधी वापरले आहे का, शेतात वापरले आहे वडिलांसोबत?
उत्तर – हो सर, वापरलं तर आहे. तर मी सांगू इच्छितो सर, माझे यंत्र वापरल्यामुळे 10-15% कमी वेळ लागतो, ते कामाचा वेळ वाचवते. आणि जे मी प्रत्यक्ष प्रयोग करून बघितले आहे, त्यानुसार माझे यंत्र सर्वात जास्त नफा देते आणि सर्वात जास्त जर्मिनेशन दर देते. सर, त्याचं असं आहे, शेतीत काम करायला जे कुशल कामगार हवे असतात, म्हणजे शेतकऱ्यांना जे कामगार हवे असतात, त्यांचे दर आकाशाला भिडले आहेत, खूप वाढले आहेत आणि आम्हाला कुशल कामगार मिळत नाहीत. म्हणून मी एक बहुउद्देशीय यंत्र बनवले. ज्यामुळे शेतकरी सगळी कामं एकदम करून खूप वेळ आणि पैसे वाचवू शकेल.
प्रश्न – बरं, जेंव्हा तू बनवलं, वर्तमानपत्रात छापून आलं, लोकांना समजलं तर या ज्या उत्पादक कंपन्या असतात, स्टार्टअपवाले असतात, त्यापैकी कुणी तुझ्याकडे आलं का? की चल, आम्ही हे सगळं मोठ्या प्रमाणावर करतो. खूप मोठं उत्पादन करू. असं काही झालं का?
उत्तर – हो सर, दोन – तीन कंपन्यांनी मला विचारलं आणि मी राष्ट्रपती भवनात झालेल्या संशोधनाचा उत्सव कार्यक्रमात भाग घेतला होता आणि तिथे येऊन त्यांनी विचारलं होतं, सर. पण मूळ नमुना पूर्ण विकसित झाला नाही सर. अजून देखील मला यावर काम करायचं आहे, आणखी चांगल्या पद्धतीने मला हे तयार करायचं आहे.
प्रश्न – ठीक आहे. तुझे शिक्षक यात रस घेऊन तुला आणखी मदत करत आहेत का? आणि कुणी वैज्ञानिक, जगातले आणखी कुणी मदत करत आहेत का? कुणी तुला ऑनलाईन संपर्क केला आहे का?
उत्तर – हो सर, माझ्या हायस्कूलचे शिक्षक आणि सर्व कनिष्ठ महाविद्यालयातले प्राध्यापक आहेत, ते सर्व मला मार्गदर्शन करत असतात आणि प्रोत्साहन देत असतात सर. माझ्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर मला माझ्या मेहनती पालकांनी आणि शिक्षकांनी प्रोत्साहन दिले आहे सर. तर आज मी जे काही आहे, ते त्यांच्यामुळेच आहे आणि त्यांनी जी प्रेरणा दिली त्यामुळे मी आज इथवर येऊन पोहोचलो आहे सर.
चला मी तुझ्या आई – वडलांचे देखील अभिनंदन करतो की ते शेती देखील मन लावून करतात आणि मुलाच्या मनात देखील शेतीबद्दल आवड निर्माण केली आहे. मुलाची जी प्रतिभा आहे तिला देखील शेतीकडे वळवलं आहे. म्हणून आपले दुप्पट अभिनंदन केले पाहिजे.
माननीय पंतप्रधानांची टिप्पणी:
राकेश सारख्या आधुनिक ऋषींची आज आपल्या देशाला गरज आहे. आणि इतक्या कमी वयात याला हे केवळ समजतच नाही तर शेतीला आधुनिक बनवण्यासाठी, तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी प्रयत्न देखील करत आहे, हे बघून मला चांगल वाटलं.
तुम्ही पुढेही असेच यशस्वी होत रहा, माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! आणि तुमच्या आईवडिलांचेही मी आभार मानतो की त्यांनी आपल्या मुलाला अशा कामासाठी प्रेरित केले आहे की जे काम शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. चला आता उत्तरप्रदेशात जाऊया. युपीच्या अलीगढ येथे राहणाऱ्या मोहम्मद शादाब यांच्याशी गप्पा मारुया. मला असे सांगण्यात आले आहे की मोहम्मद शादाब यांनी अमेरीकेपर्यंत भारताचा झेंडा उंच केला आहे, देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.
प्रश्न - शादाब, तू अमेरिकेत एक युवा सदिच्छादूत म्हणून काम करत आहेस, शिष्यवृत्ती मिळवून अलिगढ ते अमेरिकेपर्यंतचा प्रवास तू केला आहे. अनेक पुरस्कारही जिंकले आहेत आणि महिला सक्षमीकरणाचे कामही करतो आहेस. हे सगळे करण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली आहे?
उत्तर – आदरणीय पंतप्रधान महोदय – नमस्कार ! सगळ्यात आधी तर मी हे सांगू इच्छितो की मी अलीगढ़ मुस्लीम विद्यापीठात 11 व्या वर्गाचा विद्यार्थी आहे आणि हे सगळे काम करण्याची प्रेरणा मला माझे आई-बाबा आणि अलीगढ़ मुस्लीम विद्यापीठाच्या शिक्षकांकडून मिळते. आपल्या सर्वांना माहितीच आहे की अलीगढ़ मुस्लीम विद्यापीठ एक असे स्थान आहे जिने जगाला अनेक उत्तम आणि गुणवंत लोक दिले आहेत. माझी सुद्धा हीच इच्छा आहे की मी देखील या विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करावे आणि आपल्या देशासाठी काहीतरी करावे.
प्रश्न – मग तुझे आई-वडील असे काही करत असत की तुला ते असे काही करायला प्रेरणा देतात?
उत्तर – नाही, माझे आई-वडील आधीपासूनच क्रीडा क्षेत्रात आहेत. माझ्या आईवडलांचे असे म्हणणे आहे, की जसे डॉ ए पी जे अब्दुल कलाम सर होते, त्यांनी देशाला इतकी महत्वाची क्षेपणास्त्रे दिलीत त्यामुळे आज आपला देश त्यासाठी कोणावर अवलंबून नाही. माझ्या आई-वडलांची इच्छा आहे की मी ही देशासाठी असेच काहीतरी करावे, जे लोक वर्षानुवार्षे लक्षात ठेवतील.
प्रश्न-2 – बघ, खरोखरच तू देशाचे नाव उज्ज्वल करतो आहेस. अच्छा, पुढे काय करायचे याचा विचार केला आहेस का? तुझ्या मनात तर अनेक मोठमोठ्या गोष्टी येत असतील?
उत्तर- हो सर, माझे स्वप्न आहे की मोठा झाल्यावर आयएएस अधिकारी बनावे आणि समाजाची सेवा करावी. आणि मी तिथेच थांबणार नाही.मी पुढे संयुक्त राष्ट्रांत जाऊन मानवाधिकारांवर काम करू इच्छितो. माझे हे स्वप्न आहे की मी संयुक्त राष्ट्रांत जावे आणि आपल्या देशाचा झेंडा तिथे फडकवावा,आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करावे.
माननीय पंतप्रधान महोदयांची प्रतिक्रिया-
चला, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि अभिनंदन. तुम्ही सगळ्यांनी खूपच छानछान गोष्टी सांगितल्यात. प्रिय मुलांनो, या गप्पांवरुन आणि तुम्हा सगळ्यांना मिळालेल्या पुरस्कारांवरून हे लक्षात येतं की, जेव्हा एका छोट्याशा कल्पनेची, एका योग्य कृतीशी भेट होते, तेव्हा किती मोठे आणि प्रभावशाली रिझल्ट दिसून येतात ! तुम्ही सगळे स्वतःच याच किती मोठं उदाहरण आहात. आजच्या आपल्या या यशाची सुरुवातही अशाच एखाद्या विचारापासून झाली असेल. एखादी आयडिया असेल मुळाशी. आता पश्चिम बंगालच्या सौहादर्य डे याचंच बघा ना, तो पौराणिक कथा आणि देशाच्या गौरवशाली इतिहासाशी संबंधित लेखन करतो. त्याच्या मनात जेव्हा हा विचार पहिल्यांदा उमटला असेल, की- 'या दिशेने पुढे जायचं आहे, मला लिहायचं आहे'- तर तेव्हा तो फक्त तितका विचार करून बसून नाही राहिला. त्याने योग्य कृती केली, लिखाण सुरु केलं, आणि त्याचा परिणाम आज आपण बघतोच आहोत. असाच आहे आसामचा तनुज सामदार, बिहारची ज्योती कुमारी, दोन बालकांना वाचवणारा महाराष्ट्राचा कामेश्वर जगन्नाथ वाघमारे, सिक्कीमचा आयुष रंजन, पंजाबची कन्या- नाम्या जोशी-- या प्रत्येक बालकाची प्रतिभा, तिचं किंवा त्याचं टॅलेंट देशाच्या गौरवत भर घालणारंच आहे. मला तर तुम्हा सगळ्यांशीच बोलण्याची इच्छा आहे. 'एक भारत--श्रेष्ठ भारत' याची नितांत सुंदर अभिव्यक्ती आहेत तुम्ही सगळे. वेळेअभावी तुम्हा सगळ्यांशी बोलता येणं शक्य नाही आत्ता.
मित्रांनो,
संस्कृतमध्ये एक सुंदर श्लोक आहे- आणि आमच्या लहानपणी आमचे शिक्षक आम्हाला तो ऐकवायचे- आमच्याकडून पुनःपुन्हा घोकून घ्यायचे. ते म्हणायचे-
“उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथै:” अर्थात- कार्यं पूर्ण होतात ती उद्यमाने- प्रयत्न/ परिश्रम करण्याने. केवळ कल्पना लढवून कार्यं सिद्धीस जात नाहीत. कल्पनेला कृतीची जोड मिळाली की त्यातून आणखी कितीतरी कृतींचा उदय होतो. जसं तुमच्या यशानं इतर कित्येक लोकांना प्रेरणा दिली असेल, तसंच. तुमचे मित्र, तुमचे सवंगडी, आणि देशातली इतर मुलं, तुम्हाला टीव्हीवर बघणारी मुलं, तुमच्याबद्दल वर्तमानपत्रात वाचणारी कित्येक मुलं- तीही तुमच्यापासून स्फूर्ती घेऊन पुढे जातील, नवे संकल्प करतील आणि त्यांच्या पूर्ततेसाठी जिवापाड मेहनत करतील. अशीच त्यांच्यापासून आणखी अनेकांना प्रेरणा मिळेल. हे चक्र असंच मोठं होत जातं. पण बाळांनो, आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. नेहमी लक्षात ठेवा, की हे पुरस्कार म्हणजे तुमच्या जीवनातला एक छोटासा टप्पा आहे. या यशाच्या आनंदात तुम्हाला हरवून जायचं नाही आहे. तुम्ही इथून गेल्यावर लोक तुमचं खूप कौतुक करतील. वर्तमानपत्रात तुमचं नाव झळकत असेल, तुमच्या मुलाखतीही घेतल्या जातील. पण, लक्षात ठेवा, हे कौतुक तुमच्या ऍक्शन्समुळे- तुमच्या कृतीमुळे होत आहे. तुमच्या कर्मामुळे होत आहे. तुमच्या कमिटमेंट- वचनबद्धतेमुळे होत आहे. या कौतुकात भरकटून जर ऍक्शन्स थांबल्या, तुमचा कामाशी संबंध तुटला, तर हेच कौतुक तुमच्या प्रगतीत अडसर ठरू शकतं. अजून पुढे आयुष्यभर तुम्हाला उत्तरोत्तर मोठं यश मिळवत जायचं आहे. मला तुम्हाला आणखी एक सुचवायचं आहे. तुम्ही नक्कीच काही ना काही वाचत असाल. पण दरवर्षी आवर्जून- तुम्हाला ज्या कोणाचं आवडेल त्याचं - एक चरित्र जरूर वाचा. आत्मचरित्र असो किंवा चरित्र, जरूर वाचा. मग ते कोणा वैज्ञानिकाचं असो, एखाद्या खेळाडूचं असो, एखाद्या मोठ्या शेतकऱ्याचं असो, एखादा तत्त्वज्ञ, लेखक.. तुम्हाला जे कोणी आवडेल ते- पण मनाशी ठरवून टाका, की मी वर्षातून एकदा एक चरित्र अगदी मन लावून वाचेन. कमीत कमी एक चरित्र. बघा, जीवनात सातत्यानं नवीन प्रेरणा मिळत राहील.
माझ्या नवतरुण मित्रांनो,
तुम्ही या सगळ्या गोष्टींना महत्त्व द्यावं असं मला निश्चितच वाटतं. पण, मला आणखी तीन गोष्टी इथे सांगायच्या आहेत.
एक म्हणजे- सातत्याचा संकल्प.
म्हणज, तुमच्या कामाची गती कधी थांबता कामा नये, त्यात कधी शैथिल्य येत कामा नये. एक काम पूर्ण झालं की लगेच त्याच्या पुढचा नवा विचार सुरु केला पाहिजे.
दोन- देशासाठी संकल्प.
जे काही काम कराल ते फक्त आपलं एकट्यापुरतं काम मानून करू नका. 'माझं काम, माझ्यासाठी काम' अशा विचारसरणीमुळे आपल्या कक्षा अगदी संकुचित होऊन जातात. तुम्ही जेव्हा देशासाठी काम कराल तेव्हा आपोआप तुमचं काम कितीतरी पटींनी मोठं होईल. असं वाटू लागेल, की अनेक लोक तुमच्या कामासाठी काही ना काही करत आहेत. अशाने तुमच्या विचारांचा विस्तार वाढेल. यावर्षी आपला देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात पदार्पण करत आहे. काय केल्याने देशाला आणखी पुढे घेऊन जाता येईल, याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे.
आणि तिसरी गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे विनम्रतेचा संकल्प.
प्रत्येक यशागणिक अधिकाधिक विनम्र होत जाण्याचा संकल्प केला पाहिजे. कारण, तुमच्याकडे विनम्रता असेल, तर आणखी शेकडो-हजारो लोक तुमच्याबरोबर राहून तुमचं यश साजरं करतील. तुमचं यश आपोआप स्वतःच मोठं होऊन जाईल.
तर मग, हे तिन्ही संकल्प तुम्ही लक्षात ठेवले , असं मी धरून चालू? अगदी पक्के लक्षात ठेवले , आणि मला खात्री आहे, की तुम्ही सगळे खूप focussed आहात, तुम्ही विसरणार नाही. आणि मला हेही माहिती आहे, की हे तुम्ही विसरणारही नाही नि कोणाला विसरू देणारही नाही. पुढे आयुष्यात आणखी मोठमोठी कामं कराल. तुमच्या भावी जीवनाबद्दलची जी स्वप्नं आहेत, ती पूर्ण होवोत, आणि सातत्यानं अशाच यशाच्या मदतीने तुम्ही सर्व नवतरुण आणि सर्व बालकं देशाला आणखी पुढे घेऊन जात राहोत.. याच शुभेच्छांसह तुमच्या कुटुंबियांचं, सर्व शिक्षकवर्गाचं, सर्वांचं, मी खूप खूप अभिनंदन करतो. सर्वाना मनापासून शुभेच्छा आणि तुम्हा सर्व मुलांना अनेक अनेक आशीर्वाद.
खूप खूप धन्यवाद !