The nation has fought against the coronavirus pandemic with discipline and patience and must continue to do so: PM
India has vaccinated at the fastest pace in the world: PM Modi
Lockdowns must only be chosen as the last resort and focus must be more on micro-containment zones: PM Modi

माझ्या प्रिय देशवासीयांनो, नमस्कार !

देश आज पुन्हा एकदा कोरोना विरोधात खूप मोठी लढाई लढत आहे. काही आठवड्यांपूर्वींपर्यंत परिस्थीती आटोक्यात होती. आता मात्र कोरोनाची ही दुसरी लाट वादळ होऊन आली आहे. जो त्रास तुम्ही सोसला आहे, जो त्रास तुम्ही सोसत आहात, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. गेल्या काही काळात ज्यांनी आपली माणसं गमावली, मी सर्व देशवासियांना कडून त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. कुटुंबातील एका सदस्याच्या रूपात मी आपल्या दुःखात सहभागी आहे. आव्हान मोठं आहे. परंतु सगळे मिळून आपल्याला संकल्प, धैर्य आणि तयारीसह यावर मात करायची आहे.

 

मित्रांनो,

माझं म्हणणं विस्तारानं मांडण्यापूर्वी, मी देशातील सर्व डॉक्टर्स, वैदयकीय कर्मचारी, निम वैदयकीय कर्मचारी, आपले सगळे सफाई कर्मचारी बंधू भगीनी, आपले रुग्णवाहीका चालक, आपली सुरक्षादले-पोलिस कर्मचारी, सर्वांचं कौतुक करतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही तुम्ही प्राणाची बाजी लावत लोकांचे जीव वाचवले होते. आज पुन्हा एकदा या संकटात आपलं कुटुंब, आपलं सुख, आपल्या चिंता बाजूला सारुन दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र झटत आहात.

मित्रांनो,

आपल्या शास्त्रात म्हटलं आहे - त्याज्यम् न धैर्यम्, विधुरेऽपि काले। अर्थात, अतिशय कठीण काळातही धैर्य सोडता कामा नये.

कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा,  योग्य दिशेने प्रयत्न करावा, तेव्हाच आपण विजय प्राप्त करू शकतो. हाच मंत्र डोळ्यासमोर ठेवून देश अहोरात्र काम करत आहे. गेल्या काही दिवसात जे निर्णय घेतले आहेत, जी पावले उचलली आहेत त्यामुळे परिस्थिती वेगाने सुधारली जाईल. यावेळी कोरोना संकटात देशातील ऑक्सीजनची मागणी प्रचंड वाढली आहे. यावर वेगाने आणि पूर्ण संवेदनशीलतेनं काम केलं जात आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारं, खाजगी क्षेत्रं प्रत्येक गरजूला आॉक्सीजन मिळावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करताहेत. ऑक्सीजनचं उत्पादन आणि पुरवठा वाढवण्यासाठी सर्वच पातळ्यांवर उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यांमधे ऑक्सीजन प्रकल्प असोत, एक लाख नवीन सिलेंडर पोहोचवणं असो, औद्योगिक एककांमधे वापर होत असलेल्या ऑक्सीजचा वैदयकीय उपयोग असो, ऑक्सीजन रेल्वे असो, शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत.

 

मित्रांनो,

यावेळी कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढू लागली, देशातल्या औषधनिर्माण क्षेत्रानं औषधांचं उत्पादन आणखी वाढवलं आहे.

जानेवारी फेब्रुवारीच्या तुलनेत आज देशात औषधांचं उत्पादन कैक पटीनं होत आहे. त्याचा वेग आता आणखी वाढवला जात आहे. औषध निर्माण उद्योगातले जे प्रमुख, मात्तब्बर, तज्ञ मंडळी आहेत त्यांच्याशी कालही माझं प्रदीर्घ सविस्तर बोलणं झालं.

उत्पादन वाढवण्यासाठी औषध कंपन्यांची सर्वप्रकारे मदत केली जात आहे. आपल्या देशात वेगानं सर्वोत्तम औषध निर्मिती करणारं सक्षम आणि प्रचंड मोठं औषध निर्माण क्षेत्र आहे,  हे आपलं सौभाग्य आहे. यासोबतच रुग्णालयांमध्ये रुग्णशय्या   (बेडची) संख्या वाढवण्याचं कामही वेगानं सुरु आहे. काही शहरांमधे अधिकची मागणी लक्षात घेता विशेष आणि विशाल कोविड रुग्णालयं तयार केली जात आहेत.

 

मित्रांनो,

देशात गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाचे थोडेच रुग्ण आढळले होते त्याचवेळी भारतामधे कोरोना विषाणू विरोधात प्रभावी लशीसाठीचं काम सुरु केलं होतं.आपल्या शास्त्रज्ञांनी रात्रंदिवस एक करून खूपच कमी कालावधीत देशवासीयांसाठी लस विकसित केली आहे. जगातली सर्वात स्वस्त लस आज भारतात आहे. भारतातल्या शीतसाखळी व्यवस्थेला अनुकूल लस आपल्याकडे आहे. याच प्रयत्नांअंतर्गत आपल्या खाजगी क्षेत्रानं नवोन्मेष (innovation) आणि उक्रमशीलतेच्या (enterprise) भावनेचं उत्कृष्ट प्रदर्शन केलं आहे. लशीची मान्यता आणि नियमन प्रक्रीया वेगाने करण्याबरोबरच, सर्व शास्त्रीय आणि नियामक मदतही वाढवली आहे. हा प्रयत्न एका संघभावनेतून केला जात आहे, त्यामुळे, आपला भारत दोन स्वदेशी (मेड इन इंडिया) लशींसह जगातलं सर्वात मोठं लसीकरण अभियान सुरु करु शकला. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यापासूनच अधिकाधिक क्षेत्रांपर्यंत, गरजूंपर्यंत लस पोहचावी यावर भर देण्यात आला. जगात सर्वात वेगाने भारतातच आधी 10 कोटी, मग 11 कोटी आणि आता  12 कोटी लशीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.  कोरोनाच्या या लढाईत आपल्याला दिलासा आणि उमेद मिळतेय, कारण आपल्या आरोग्य क्षेत्रातल्या कर्मचारी, आघाडीवर कार्यरत कोरोनायोद्धे आणि ज्येष्ठ नागरीकांच्या एका मोठ्या गटाला लशीचा लाभ मिळाला आहे.

 

मित्रांनो,

लसीकरणासंदर्भात कालच आणखी एक महत्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला आहे. एक मे नंतर 18 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीचं लसीकरण करता येईल. भारतात आता जी लस तयार होईल त्याचा निम्मा वाटा थेट राज्यं आणि रुग्णालयांना मिळणार आहे.

याचवेळी, गरीब, ज्येष्ठ नागरीक, कनिष्ठ वर्गातले, कनिष्ठ मध्यम वर्गातले लोक आणि 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी केन्द्र सरकारचं लसीकरण अभियान पूर्वीप्रमानेच वेगानं

सुरुच राहील. आधीप्रमाणेच सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लस मिळेल. मी म्हटलं त्याप्रमाणे गरीब कुटुंब असतील, आपले कनिष्ठ वर्ग, कनिष्ठ मध्यम वर्गातले कुटुंब असतील याचा लाभ घेऊ शकतील.

 

मित्रांनो,

आपल्या सगळ्यांचे प्रयत्न ,जीव वाचवण्याचे आहेत. जीव वाचवण्या बरोबरच आर्थिक व्यवहार आणि रोजगार यावर कमीत कमी परिणाम व्हावा हा देखील प्रयत्न आहे. प्रयत्नांचं स्वरुप हेच ठेवलं जावं. अठरा वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुलं केल्यानं शहरातल्या आपल्या काम करणाऱ्या मनुष्यबळाला वेगानं लस उपलब्ध होईल. राज्यं आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांनी, श्रमिकांना वेगानं लस मिळू शकेल. माझं, राज्य प्रशासनाला आवाहन आहे की त्यांनी श्रमिकांमधे विश्वास जागता ठेवावा. त्यांना समजवावं की आहेत तिथेच त्यांनी रहावं.

राज्यांद्वारे दिलेला हा विश्वास त्यांची खूप मदत करु शकेल की,  आहेत त्याच शहरात त्यांना येत्या काही दिवसात लसही मिळेल आणि त्यांचं कामही बंद होणार नाही.

 

मित्रांनो,

गेल्यावेळी जी परिस्थिती होती ती आतापेक्षा खूपच भिन्न होती. त्यावेळी आपल्याकडे या वैश्विक महामारीशी लढण्यासाठी कोरोना संबंधित नेमकी  वैद्यकीय पायाभूत व्यवस्था नव्हती. तुम्ही आठवून बघा, देशाची काय स्थिती होती. कोरोना चाचण्यांसाठी पुरेशा प्रयोगशाळा नव्हत्या, PPEs चं कोणत्याही प्रकारचं उत्पादन नव्हतं. आपल्याकडे या रोगावरच्या उपचाराची विशेष माहितीही नव्हती. परंतु खूपच कमी कालावधीत आम्ही यात सुधारणा केली. आपल्या डॉक्टरांनी आज या रोगावरच्या उपचारात चांगलं प्रभुत्व मिळवलं आहे. ते जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचवत आहेत.

आपल्याकडे आज मोठ्या प्रमाणावर PPE किट्स आहेत, प्रयोगशाळांचं मोठं जाळं आहे आणि आपण चाचण्यांची सुविधा निरंतर वाढवत आहोत.

 

मित्रांनो,

देशानं आत्तापर्यंत कोरोना विरोधात खूपच सक्षमतेनं आणि प्रचंड धैर्यानं लढा दिला आहे. याचं श्रेय सर्व देशवासियांनाच जातं.

अनुशासन आणि धैर्यानं कोरोनाचा सामना करत आपण देशाला इथवर आणलं आहे. मला विश्वास आहे की, जनभागीदारीची ही ताकद कोरोनाच्या या वादळालाही परास्त करेल.  आपण आज आपल्या आजुबाजुला बघत आहोत की कसे अनेक लोक, अनेक सामाजिक संस्था गरजुंपर्यंत मदत पोहचवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. औषधं पोहचवणं असो, खाणं किंवा राहण्याची व्यवस्था करणं असो

लोक मनापासून काम करत आहेत. मी या सर्वांच्या सेवाभावाला नमन करतो आणि देशवासीयांना आवाहन करतो की त्यांनी अधिकाधिक संख्येनं पुढे यावं आणि या संकटकाळात गरजुंची मदत करावी. समाजाच्या पुरुषार्थ आणि सवेच्या संकल्पानेच आपण ही लढाई जिंकू शकू.

माझं, तरुण मित्रांना आवाहन आहे की त्यांनी आपल्या सोसायटीमधे, गल्लीत, इमारतीत छोटया छोट्या समित्या स्थापन कराव्यात आणि कोविड विरोधात शिस्तीचं पालन व्हावं यासाठी मदत करावी. आपण असं केलं तर सरकारांना कधी प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्याची गरज येणार नाही, ना संचारबंदी लावण्याची गरज भासेल आणि टाळेबंदीचा तर प्रश्नच येत नाही. गरजच भासणार नाही. स्वच्छता अभियानावेळी , देशात जागरूकता निर्माण करण्यासाठी माझ्या बाल मित्रांनी खूप मदत केली होती. छोटे-छोटे बालक 5वी, 7वी, 10वी, मधे शिकणारे.. त्यांनी घरातल्यांना समजावलं होतं. त्यांना यासाठी तयार केलं होतं. त्यांनी मोठ्यांनाही स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज मी पुन्हा एकदा आपल्या बाल मित्रांना विशेषकरुन एक गोष्ट सांगू इच्छीतो. माझ्या बाल मित्रांनी, घरात असं वातावरण निर्माण करावं की कामा शिवाय, विनाकारण घरातल्या कोणीही बाहेर जाऊ नये, तुमचा हट्ट, जिद्द खूप मोठा परिणाम घडवू शकते. या संकटकाळात लोकांना जागरुक आणि सतर्क करण्याचा प्रयत्न करत असलेल्या प्रसारमाध्यमांनाही माझं कळकळीचं सांगणं आहे की, त्यांनी हे प्रयत्न वाढवावेत. याबरोबरच लोकांमधे भीती, अफवा आणि संभ्रम पसरु नयेत यासाठी देखील काम करावं.

 

मित्रांनो,

आपल्याला आज टाळेबंदीपासून देशाला वाचवायचं आहे. मी राज्यांनाही आवाहन करतो की त्यांनी टाळेबंदी हा शेवटचा पर्याय म्हणूनच स्विकारावा. टाळेबंदी टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. आणि मायक्रो कंटेन्टमेंट झोनवर (सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र) लक्ष केंद्रीत करायचं आहे. आपण आपली अर्थव्यवस्थाही सुधारु आणि आपल्या देशवासींयाच्या आरोग्याचीही काळजी घेऊ.

 

मित्रांनो,

नवरात्रीचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या रामनवमी आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा आपल्या सर्वांसाठी हाच संदेश आहे की आपण मर्यादांचं पालन करावं. कोरोनाच्या या संकटकाळात, कोरोनापासून वाचण्यासाठी उपलब्ध जे उपाय आहेत, कृपया त्यांचं संपूर्णतः पालन करा. दवाई भी, कड़ाई भी अर्थात औषधही आणि अनुशासनही हा मंत्र कधी विसरु नका. हा मंत्र आवश्यक आहे. लस घेतल्यानंतरही आवश्यक आहे. रमजानाच्या पवित्र महीन्याचाही आज सातवा दिवस आहे.  रमजान आपल्याला धैर्य, आत्मसंयम आणि अनुशासनची शिकवण देतो.  कोरोना विरोधातलं युद्ध जिंकण्यासाठी अनुशासनाचीही गरज आहे.  निकड असेल, तेव्हाच बाहेर जा, कोविड संदर्भात अनुशासनाचं पूर्णतया पालन करा, माझं आपल्या सगळ्यांना हेच आवाहन आहे.  मी आपल्याला पुन्हा एकदा विश्वासानं सांगतो की, आज उद्भवलेली परिस्थिती बदलण्यासाठी तुमच्या साहस, धैर्य और अनुशासनाच्या साथीनं, देश कोणतीही कसर सोडणार नाही. तुम्ही सगळे, तुमचे कुटुंबिय निरामय निरोगी राहा या कामनेसह मी आपलं म्हणणं समाप्त करतो. आपले खूप- खूप धन्यवाद !

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

Prime Minister Shri Narendra Modi paid homage today to Mahatma Gandhi at his statue in the historic Promenade Gardens in Georgetown, Guyana. He recalled Bapu’s eternal values of peace and non-violence which continue to guide humanity. The statue was installed in commemoration of Gandhiji’s 100th birth anniversary in 1969.

Prime Minister also paid floral tribute at the Arya Samaj monument located close by. This monument was unveiled in 2011 in commemoration of 100 years of the Arya Samaj movement in Guyana.