पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड, केंद्रीय मंत्रीमंडळातले माझे सहकारी पीयुष गोयल, बाबुल सुप्रियो, उपस्थित मान्यवर, उपस्थित महिला आणि पुरुष वर्ग, पश्चिम बंगालमध्ये रेल्वे आणि मेट्रो कनेक्टिविटी विस्तारासाठी आपणा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! आज ज्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि उद्घाटन करण्यात आले आहे त्यामुळे हुगळीसह अनेक जिल्ह्यातल्या लोकांचे जीवन सुलभ होणार आहे.
मित्रहो,
आपल्या देशात वाहतुकीची साधने जितकी उत्तम, आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेच आपला संकल्प तितकाच बळकट होईल. कोलकात्यासह हुगळी,हावडा आणि उत्तरी 24 परगणा या जिल्ह्यातल्या जनतेलाही आता मेट्रो सुविधेला लाभ मिळणार आहे याचा,मला आनंद आहे. आज नाओपाडा ते दक्षिणेश्वर पर्यंतच्या भागाचे उद्घाटन झाले असून यामुळे दीड तासाच्या अंतराला केवळ 25-35 मिनिटे लागणार आहेत.
दक्षिणेश्वर ते कोलकात्याच्या "कवि सुभाष" किंवा "न्यू गड़िया" पर्यंत मेट्रोने केवळ एका तासात पोहोचणे शक्य होणार आहे, रस्ता मार्गाने हे अंतर अडीच तासाचे आहे. या सुविधेमुळे शाळा- महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी,कार्यालयात- कारखान्यात काम करणारे कर्मचारी, कामगार यांना मोठा लाभ होणार आहे. विशेष करून इंडियन स्टेटॅस्टिकल इन्स्टिट्यूट, बारानगर कॅम्पस, रवीन्द्र भारती विश्वविद्यालय आणि कलकत्ता विश्वविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागापर्यंत आता सुलभतेने पोहोचता येणार आहे. इतकेच नव्हे तर कालीघाट आणि दक्षिणेश्वर मध्ये कालीमातेच्या मंदिरापर्यंत पोहोचणेही आता भाविकांसाठी सुलभ झाले आहे.
मित्रहो,
देशाची पहिली मेट्रो होण्याचा मान कोलकाता मेट्रोला दशकांपूर्वीच प्राप्त झाला आहे. मात्र या मेट्रोला आधुनिक रूप आणि विस्तार मात्र गेल्या काही वर्षापासूनच सुरु झाला आहे. मेट्रो असो किंवा रेल्वे प्रणाली आज भारतात जे निर्मिती कार्य सुरु आहे त्यात मेड इन इंडियाची छाप स्पष्ट दिसत आहे. लोह मार्ग ते रेल्वे गाड्यांचे आधुनिक इंजिन आणि आधुनिक डब्यापर्यंत उपयोगात आणले जाणारे सामान आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात भारताचे स्वतःचे आहे. यामुळे आपल्या कामाचा वेग वाढला आहे, गुणवत्ता सुधारली आहे,खर्च कमी झाला आहे आणि गाड्यांचा वेगही वाढला आहे.
मित्रहो, पश्चिम बंगाल, देशाच्या आत्मनिर्भरतेचे एक महत्वाचे केंद्र राहिले आहे आणि इथून ईशान्येपासून आपल्या शेजारी राष्ट्रांसमवेत व्यापाराच्या अपार संधी आहेत. हे लक्षात घेऊनच गेल्या काही वर्षापासून इथले रेल्वे जाळे मजबूत करण्याचा कसोशीने प्रयत्न सुरु आहे. सिवोक-रैंगपो नवी लाइन, सिक्किमला रेल्वे मार्गे प्रथमच पश्चिम बंगालशी जोडणार आहे. कोलकात्याहून बांग्लादेशसाठी गाड्या धावत आहेत. हल्दीबाड़ी हून भारत-बांग्लादेश सीमेपर्यंत नुकताच रेल्वे मार्ग सुरु करण्यात आला आहे.गेल्या सहा वर्षात पश्चिम बंगाल मध्ये अनेक उड्डाण पूल आणि अंडर ब्रिजचे काम सुरु करण्यात आले आहे.
मित्रहो,
आज ज्या चार प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले आहे त्यामुळे इथले रेल्वे जाळे अधिक मजबूत होणार आहे. हा तिसरा मार्ग सुरु झाल्याने खड़गपुर-आदित्यपुर विभागात रेल्वेगाड्यांची ये-जा सुकर होणार असून हावडा- मुंबई मार्गावर रेल्वे गाड्यांना होणारा विलंब कमी होणार आहे. आजिमगंज ते खागड़ाघाट रोड दरम्यान दुपदरीकरणामुळे मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या रेल्वे जाळ्यावरचा भार कमी होणार आहे. या मार्गामुळे कोलकाता-न्यू जलपायगुडी-गुवाहाटी साठी पर्यायी मार्गही उपलब्ध होईल त्याच बरोबर ईशान्ये पर्यंत कनेक्टिविटीही उत्तम होईल. डानकुनी-बारूइपारा दरम्यान चौथ्या मार्गाचा प्रकल्प खूपच महत्वाचा आहे. हा तयार झाल्याने हुगळीच्या रेल्वे जाळ्यावरचा भार कमी होणार आहे.याच प्रमाणे रसुलपुर आणि मगरा हा विभाग एक प्रकारे कोलकात्यासाठी प्रवेश द्वार आहे मात्र खूपच गर्दीचा आहे. नव्या मार्गामुळे या गर्दीच्या समस्येपासून दिलासा मिळणार आहे.
मित्रहो,
हे सर्व प्रकल्प पश्चिम बंगालच्या कोळसा उद्योग, पोलाद उद्योग, खत कारखाने आणि धान्य उत्पादक भागांनाही जोडत आहेत. म्हणजेच या नव्या रेल्वे मार्गामुळे जन जीवन सुखकर होण्याबरोबरच उद्योगानाही नवे पर्याय मिळतील आणि उत्तम पायाभूत सुविधांचे हेच उद्दिष्ट असते. हाच तर सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आहे. आत्मनिर्भर भारताचे हेच तर अंतिम उद्दिष्ट आहे. याच उद्दिष्टासाठी आपण सर्व काम करत आहोत, पीयुषजी आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे मी अभिनंदन करतो. पश्चिम बंगालमधल्या रेल्वे क्षेत्रात, रेल्वे पायाभूत क्षेत्रात काही वर्षांपासून ज्या उणीवा आहेत त्या दूर करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. या उणीवा आम्ही नक्कीच दूर करू आणि आणि पश्चिम बंगालची स्वप्नेही पूर्ण करू. या अपेक्षेसह आपणा सर्वाना अनेक-अनेक धन्यवाद !