पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या तरुण पिढीचे विशेषत: विद्यार्थ्यांचे मनोबल त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधून वाढवत असतात. ‘मन की बात’ असो, ‘परीक्षा पे चर्चा’ असो किंवा वैयक्तिक संवाद असो, पंतप्रधान मोदींनी नेहमीच तरुणांना त्यांच्या चिंता आणि जिज्ञासांना विविध माध्यमांतून समजून घेऊन प्रोत्साहन दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधानांनी डेहराडूनमधील 11वीचा विद्यार्थी अनुराग रामोला याच्या पत्राला उत्तर देत त्याच्या कला आणि कल्पनांचे पुन्हा एकदा कौतुक केले आहे.
अनुरागच्या विचारांनी प्रभावित होऊन पंतप्रधानांनी पत्रात लिहिले, "तुमची वैचारिक परिपक्वता पत्रातील तुमच्या शब्दांतून आणि 'भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' या चित्रकलेसाठी निवडलेल्या संकल्पनेतून दिसून येते. पौगंडावस्थेपासूनच राष्ट्रीय हिताशी निगडीत मुद्दे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या विकासात तुमची भूमिका काय याबाबत तुमची समज विकसित झाली आहे याचा मला आनंद आहे.”
आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये सर्व देशवासीयांच्या योगदानाचे कौतुक करताना पंतप्रधानांनी पुढे लिहिले आहे की, “स्वातंत्र्याच्या या अमृत काळात देश सामूहिक शक्तीच्या बळावर आणि ‘सबका प्रयास' या मंत्राने वाटचाल करत आहे. आगामी काळात एक मजबूत आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी आमच्या तरुण पिढीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अनुरागला यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी विश्वास व्यक्त केला आहे की, तो अपेक्षित यशासह सर्जनशीलतेसह जीवनात मार्गक्रमण करेल.
अनुरागला प्रेरणा देण्यासाठी नरेंद्र मोदी ॲप आणि narendramodi.in या संकेतस्थळावरही हे पेंटिंग अपलोड करण्यात आले आहे.
हे लक्षात घेतले पाहिजे की अनुरागने यापूर्वी पंतप्रधानांना पत्र लिहून राष्ट्रहिताशी संबंधित विषयांवर विचार व्यक्त केले होते. अनुरागने आपल्या पत्रात लिहिले आहे की, प्रतिकूल परिस्थितीतही संयम न गमावण्याची, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणे ध्येयाकडे वाटचाल करण्याची आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची प्रेरणा पंतप्रधानांकडून मिळते.
टीप: अनुराग रमोलाला कला आणि संस्कृतीसाठी 2021 साठी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.