पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनक्रम अगदी भरगच्च असतो, पण अगदी तुरळक लोकांनाच माहिती असेल की जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा आपल्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून ते लोकांची पत्रे वा संदेशांना उत्तरे देण्यात हयगय करत नाहीत. असेच एक पत्र मिळाले आहे, उत्तराखंडातील नैनीतालच्या खीमानंद यांना. त्यांनी नरेंद्र मोदी ॲप (नमो ॲप) च्या माध्यमातून पंतप्रधानांना संदेश पाठवून पंतप्रधान पीक विमा योजनेची पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच सरकारच्या इतर प्रयत्नांबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. आता पंतप्रधानांनी खीमानंद यांना पत्र लिहून आपले मौल्यवान विचार मांडल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.
“कृषीसहित अन्य विविध क्षेत्रात सुधारणा व देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांवर आपण आपले मौल्यवान विचार मांडलेत त्याबद्दल आभार. असे आत्मीय संदेश मला प्राणपणाने देशसेवेला जोडून घेण्यासाठी नवीन ऊर्जा पुरवतात”, असे पंतप्रधान मोदी यांनी पत्रात म्हटले आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेच्या यशाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी म्हटले आहे की “हवामानातील अनिश्चिततेशी जोडली गेलेली जोखीम कमी करून शेतकरी बंधुभगिनींच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्याच्या कामी पंतप्रधान पीक विमा योजना सातत्याने प्रमुख भूमिका बजावत आहे. शेतकरी लाभाच्या या विमा योजनेचा फायदा आज कोट्यवधी शेतकरी घेत आहेत. “
शेती व शेतकरी कल्याणाचा संकल्प सोडलेल्या सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी पत्रात पुढे लिहीले आहे की, “मागील पाच वर्षात व्यापक संरक्षण व पारदर्शक दावा निकाल प्रक्रियेच्या माध्यमातून ही योजना शेतकरी कल्याणाशी समर्पित आमच्या संकल्पित प्रयत्नांचे व ठाम निश्चयाचे प्रमुख उदाहरण बनून उभी आहे.आज बियाणांपासून बाजारापर्यंत शेतकरी बंधूभगिनींच्या लहानमोठ्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच अन्नदात्याची समृद्धी व शेतीची प्रगती निश्चित करण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत.”
याबरोबरच देशाच्या प्रगतीत देशवासियांचे योगदान व त्यांची भूमिका यांची स्तुती करताना पंतप्रधानांना लिहिले आहे की, “सर्वांगिण व सर्वस्पर्शी विकासाचा दृष्टीकोन घेऊन देश आज एक सशक्त, समृद्ध व आत्मनिर्भर भारताच्या निर्माणाकडे वेगाने मार्गक्रमणा करत आहे. सर्व देशवासियांच्या विश्वासाच्या उर्जेने देश राष्ट्रीय लक्ष्य साधण्यासाठी एकनिष्ठ आहे आणि देशाला जगात एका नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी आपले प्रयत्न यापुढे आधिक वेग घेतील याचा मला पूर्ण विश्वास आहे”
याआधी खीमानंद यांनी पंतप्रधान मोदींना आपल्या संदेशात पीक विमा योजनेने पाच यशस्वी वर्षे पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकार विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून नागरिकांची उन्नती व राष्ट्राची प्रगती व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे असेही खीमानंदांनी म्हटले होते.