“घर म्हणजे केवळ विटा आणि सिमेंटचे बांधकाम नाही, तर त्याच्याशी आपल्या भावना, आपल्या आकांक्षा जोडलेल्या असतात. घराची संरक्षकभिंत आपल्याला केवळ सुरक्षाच देत नाहीत तर आपल्यामध्ये उज्वल भविष्याचा आत्मविश्वासही निर्माण करते.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील सुधीर कुमार जैन यांना लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पक्के घर मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत, जैन यांना स्वतःचे छत आणि घर मिळाल्याचा आनंद अनमोल असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
पंतप्रधानांनी सुधीर यांना पत्रात पुढे लिहिले की, “प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून तुमचे स्वतःचे घराचे स्वप्न साकार झाले आहे. या यशानंतर तुमचे समाधान पत्रातील तुमच्या शब्दांवरून सहज जाणवते. हे घर तुमच्या कुटुंबाच्या सन्माननीय जीवनासाठी आणि तुमच्या दोन्ही मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी नवीन पायाभरणीसारखे आहे.”
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी लाभार्थ्यांना त्यांची पक्की घरे मिळाली आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. प्रत्येक गरजू कुटुंबाला घरे देण्याच्या उद्दिष्टाप्रती सरकार कटीबद्ध आहे. सरकार विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून देशवासीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे असे ते म्हणाले.
"लाभार्थ्यांच्या जीवनातील संस्मरणीय क्षण राष्ट्रसेवेसाठी अथक, अविरत कार्य करत राहण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा देतात" असे पंतप्रधानांनी सुधीर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सुधीर यांना नुकतेच पीएम आवास योजनेअंतर्गत स्वतःचे पक्के घर मिळाले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांचे आभार मानले. बेघर गरीब कुटुंबांसाठी वरदान अशा शब्दात पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सुधीर यांनी पंतप्रधान आवास योजनेचे वर्णन केले आहे. ते भाड्याच्या घरात राहत होते आणि 6-7 वेळा त्यांना घरे बदलावी लागली होती. वारंवार घर बदलण्याच्या त्याच्या वेदनाही त्यांनी पत्रात सांगितल्या.