पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी कान चित्रपट महोत्सवात ‘सन्माननीय देश ’ म्हणून भारत सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यंदा भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे, कान चित्रपट महोत्सवाचा 75 वा वर्धापन दिन आणि भारत आणि फ्रान्स यांच्यातील राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या महत्त्वपूर्ण योगायोग अशा प्रसंगी भारत सहभागी होत असल्याचे पंतप्रधानांनी एका संदेशात म्हटले आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्मिती करणारा देश असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, आपल्या चित्रपट क्षेत्राचे वैविध्य उल्लेखनीय आहे आणि समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक विविधता ही आपली ताकद आहे. भारताकडे सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि जगाचे आशयविषयक केंद्र बनण्याची अफाट क्षमता या देशात आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
चित्रपट क्षेत्रातील व्यवसाय सुलभता यात सुधारणा करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना, नरेंद्र मोदी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय चित्रपट-सह निर्मिती सुलभ करण्यापासून ते देशभरातील चित्रीकरणाला परवानगीसाठी एक खिडकी मंजुरी यंत्रणा सुनिश्चित करण्यापर्यंत, जगभरातील चित्रपट निर्मात्यांसाठी भारत अमाप संधी पुरवत आहे.
भारत महान दिग्दर्शक सत्यजित रे यांची जन्मशताब्दी साजरी करत असताना कान क्लासिक विभागात सत्यजित रे यांचा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी तो पुन्हा प्रदर्शन-योग्य स्थितीत आणल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
या महोत्सवात अनेक गोष्टी प्रथमच घडत असून भारतातील स्टार्टअप्स देखील सिने-जगताला आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवणार आहेत . इंडिया पॅव्हेलियन हा विभाग भारतीय सिनेमाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवेल आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि शिक्षणाला प्रोत्साहन देईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
पार्श्वभूमी
फ्रान्समधील 75 व्या कान चित्रपट महोत्सवासोबत या महोत्सवासोबतच दरवर्षी आयोजित होणाऱ्या 'मार्चे दू फिल्म्स' अर्थात चित्रपट बाजारपेठेत यावर्षी भारताला अधिकृत सन्माननीय देशाचा मान मिळाला आहे
सन्माननीय देश या दर्जामुळे 'मार्चे दू फिल्म्स' अर्थात चित्रपट बाजारपेठेच्या उद्घाटन कार्यक्रमात भारत, भारतातील चित्रपट, भारतीय संस्कृती आणि वारसा अधोरेखित केला जाईल.
भारत हा “कान नेक्स्टमध्ये सन्माननीय देश आहे, ज्याच्या अंतर्गत 5 नवीन स्टार्टअप्सना दृकश्राव्य उद्योगात प्रवेश करण्याची संधी दिली जाईल. ॲनिमेशन डे नेटवर्किंगमध्ये दहा व्यावसायिक सहभागी होतील. कान चित्रपट महोत्सवाच्या या आवृत्तीत भारताच्या सहभागाचे प्रमुख आकर्षण म्हणून, आर माधवन निर्मित “रॉकेट्री” चित्रपट हा 19 मे 2022 रोजी पॅलेस डेस फेस्टिव्हल ऑफ द मार्केट मध्ये दाखवला जाणार आहे.
या महोत्सवात भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर करत आहेत आणि भारतभरातील चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचा यात समावेश आहे.