पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोलंडमधील वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक इथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
हे स्मारक दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलिश लोकांप्रति कोल्हापूर संस्थानाने दाखवलेल्या औदार्याला समर्पित आहे. युद्धकाळात कोल्हापूर जवळच्या वालिवडे गावात उभारण्यात आलेल्या छावणीत पोलिश लोकांना आश्रय देण्यात आला होता. या छावणीत महिला आणि लहान मुलांसह सुमारे 5,000 निर्वासितांची व्यवस्था करण्यात आली होती. स्मारकाच्या ठिकाणी पंतप्रधानांनी कोल्हापूर छावणीत राहिलेल्या पोलिश लोकांची आणि त्यांच्या वंशजांची भेट घेतली.
या स्मारकाला पंतप्रधानांनी दिलेली भेट भारत आणि पोलंड यांच्यातील एक विशेष ऐतिहासिक संबंध अधोरेखित करते आणि हे संबंध आणखी बळकट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.