पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जॉर्जटाऊन येथील मोन्युमेंट गार्डन्स मधील भारतीय आगमन स्मारकाला भेट दिली. गयानाचे पंतप्रधान ब्रिगेडियर (निवृत्त) मार्क फिलिप्स त्यांच्या बरोबर होते. पंतप्रधानांनी आगमन स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली, त्यावेळी टास्सा ड्रम्स वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
स्मारकाच्या ठिकाणी आदरांजली वाहताना, पंतप्रधानांनी गयानामधील भारतीय समुदायाचा संघर्ष आणि बलिदानाचे तसेच भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी दिलेल्या महत्वाच्या योगदानाचे स्मरण केले. स्मारकाजवळ त्यांनी बेल पत्राचे रोप लावले.हे स्मारक 1838 मध्ये गयाना येथे करारबद्ध भारतीय स्थलांतरितांना घेऊन आलेल्या पहिल्या जहाजाची प्रतिकृती आहे. भारताने 1991 मध्ये गयानाच्या नागरिकांना दिलेली ही भेट आहे.