केंद्र सरकार वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी असून, त्यांच्या मदतकार्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. मदत आणि बचाव कार्यात केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी सहाय्य करेल, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी आज केरळमध्ये वायनाड येथील भूस्खलनग्रस्त भागाची हवाई पाहणी केल्यानंतर आपत्तीग्रस्त भागांना भेट दिली आणि पाहणी केली.
पंतप्रधानांनी आज वायनाड मधील नैसर्गिक आपत्तीत जखमी झालेल्यांची भेट घेतली आणि मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आयोजित आढावा बैठकीत ते म्हणाले की, या दु:खद प्रसंगी केंद्र सरकार आणि देश आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्र्यांकडून सविस्तर निवेदन पाठवले जाईल, असे त्यांनी सांगितले.
Our prayers are with those affected by the landslide in Wayanad. The Centre assures every possible support to aid in relief efforts.https://t.co/3fS83dFmrp
— Narendra Modi (@narendramodi) August 10, 2024
पंतप्रधान म्हणाले की ते वायनाडमधील बचाव कार्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचा निधी यापूर्वीच जारी करण्यात आला असून, उर्वरित निधीही तातडीने जारी केला जाईल, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीचा सामना करू शकतील अशा सर्व केंद्रीय यंत्रणा तैनात करण्यात आल्या असून, आपत्तीग्रस्तांना सहाय्य करत आहेत. पंतप्रधानांनी एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, राज्य पोलीस, स्थानिक वैद्यकीय दल, स्वयंसेवी संस्था आणि इतर सेवा-केंद्रित संस्थांच्या पथकांची प्रशंसा केली, जे आपत्तीग्रस्त भागात त्वरित पोहोचले आणि त्यांनी शोध आणि बचाव कार्य सुरू केले.
या नैसर्गिक आपत्तीने प्रभावित झालेल्यांना, विशेषत: ज्या मुलांनी आपले कुटुंब गमावले आहे, त्यांना आधार देण्यासाठी नवीन दीर्घकालीन योजना तयार करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. केंद्राकडून आवश्यक ते सर्व सहकार्य प्राप्त करून, राज्य सरकार यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी वायनाडच्या नागरिकांना आश्वासन दिले की, देश आणि केंद्र सरकार या प्रदेशातील जीवन पूर्वपदावर आणण्यामध्ये कोणतीही कसर सोडणार नाही, मग ते घरे असोत, शाळा असोत, रस्ते आणि पायाभूत सुविधा असोत, की मुलांचे भविष्य असो.