सुमारे 1800 कोटी रुपयांच्या तीन महत्त्वाच्या अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे केले उद्‌घाटन
गंगनयानच्या प्रगतीचा घेतला आढावा, चार अंतराळवीर नियुक्तांना दिले अंतराळवीर पंख
"नव्या कालचक्रात जागतिक क्रमवारीतील आपल्या स्थानात भारत सातत्याने वाढ करत असल्याचे आपल्या अंतराळ कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसते"
"चार अंतराळवीर-नियुक्त ही केवळ चार नावे किंवा व्यक्ती नाहीत, तर ते 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा अंतराळात घेऊन जाणाऱ्या चार 'शक्ती' आहेत"
"चार अंतराळवीर-नियुक्त हे आजच्या भारताचा विश्वास, धैर्य, शौर्य आणि शिस्तीचे प्रतीक आहेत"
"40 वर्षांनंतर एक भारतीय अंतराळात जाणार आहे मात्र, यावेळी वेळ, उलटगणना आणि रॉकेट आमचे आहे"
"जगातील सर्वात मोठ्या तीन अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश होईल त्याच वेळी देशाचे गगनयान देखील देशाच्या अंतराळ क्षेत्राला नवीन उंचीवर नेणार आहे"
"भारताची नारी शक्ती अंतराळ क्षेत्रात मोलाची भूमिका बजावत आहे"
"अंतराळ क्षेत्रातील भारताचे यश देशाच्या युवा पिढीमध्ये शास्त्रीय दृष्टिकोनाची बीजे पेरत आहे"
"या अमृत काळामध्ये एक भारतीय अंतराळवीर भारतीय रॉकेटमधून चंद्रावर उतरणार आहे"
"अंतराळ तंत्रज्ञानाचा समाजाला सर्वाधिक फायदा होतो"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळातील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला (व्हीएसएससी) ला भेट दिली. यावेळी त्यांनी सुमारे 1800 कोटी रुपयांच्या तीन महत्त्वाच्या अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील एसएलव्ही इंटिग्रेशन फॅसिलिटी (पीआयएफ); महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये नवीन ‘सेमी-क्रायोजेनिक्स इंटिग्रेटेड इंजिन आणि स्टेज टेस्ट सुविधा’; आणि  तिरुवनंतपुरम येथील व्हीएसएससीमध्ये ‘ट्रायसोनिक विंड टनल’ हे ते तीन प्रकल्प आहेत.

गगनयान मोहिमेच्या प्रगतीचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला चार अंतराळवीर-नियुक्तांना ‘अंतराळवीर पंख’ बहाल केले.

 

अंतराळवीर-नियुक्तांना उभे राहून उपस्थितांनी मानवंदना द्यावी असे आवाहन करून पंतप्रधानांनी भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी सभागृह भारत माता की जयच्या जयघोषाने दुमदुमले.

प्रत्येक देशाच्या प्रगतीच्या वाटचालीत केवळ वर्तमानातीलच नव्हे तर भावी पिढ्यांसाठीचेही खास क्षण असतात असे पंतप्रधानांनी सांगितले. जमीन, आकाश, जल आणि अवकाश असा क्षेत्रात भारताने दिलेल्या ऐतिहासिक योगदानाबद्दल आजच्या पिढीला अभिमान वाटावा अशी आजची घटना असल्याचे पंतप्रधान म्हणाले. अयोध्येत नवीन ‘काल चक्रा’ची सुरुवात करताना त्यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण करून देताना ते म्हणाले की, जागतिक क्रमवारीत भारत सतत अवकाश क्षेत्रातील योगदानाचा विस्तार करत आहे आणि त्याची झलक देशाच्या अंतराळ कार्यक्रमात पाहायला मिळते.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे भारत हे पहिले राष्ट्र ठरले हे भारताच्या चांद्रयान मोहिमेचे यश असल्याचे पंतप्रधान म्हणाले. "आज शिव-शक्ती पॉइंट संपूर्ण जगासमोर भारताच्या पराक्रमाची, धैर्याची ओळख करून देत आहे", असे त्यांनी सांगितले. चार गगनयान प्रवासी, अंतराळवीर-नियुक्त यांचा परिचय होणे हा एक ऐतिहासिक प्रसंग असल्याचे त्यांनी नमूद केले. “ती केवळ चार नावे किंवा व्यक्ती नाहीत, तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा अंतराळात घेऊन जाणाऱ्या  त्या चार ‘शक्ती’ आहेत”,  असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, “एक भारतीय 40 वर्षांनंतर अंतराळात जाणार असला तरी आता  वेळ, उलटगणना तसेच रॉकेटही आपल्या मालकीचे आहेत." अंतराळवीर-नियुक्तांची ओळख झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून संपूर्ण देशाच्या वतीने पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

अंतराळवीर-नियुक्तांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, त्यांची नावे भारताच्या यशाशी जोडली गेली आहेत आणि ते आजच्या भारताचा विश्वास, धैर्य, शौर्य आणि शिस्तीचे प्रतीक आहेत. त्यांनी समर्पित भावनेतून घेतलेल्या प्रशिक्षणाचे त्यांनी कौतुक केले. कधीही पराभव न स्वीकारणाऱ्या भारताच्या अमृत पिढीचे ते प्रतिनिधी आहेत आणि सर्व संकटांना आव्हान देण्याची ताकद त्यांच्यात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या मिशनसाठी सुदृढ शरीर आणि निरोगी मनाची गरज पंतप्रधानांनी विशद केली. योगाभ्यासाचा प्रशिक्षण मॉड्यूलमध्ये समावेश असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.तुमच्याकडे देशाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील गगनयान प्रकल्पाशी संबंधित सर्व कर्मचारी प्रशिक्षकांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या चार अंतराळवीर-नियुक्तांना मिळत असलेल्या सेलिब्रिटी अटेन्शन अर्थात प्रसिद्धीच्या झोतातल्या व्यक्तींविषयी लोकांमधील आकर्षणामुळे त्यांच्या प्रशिक्षणात अडथळा निर्माण होऊ शकतो याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. लक्ष विचलित न होता त्यांचे प्रशिक्षण सुरू रहावे यासाठी अंतराळवीर-नियुक्त आणि त्यांच्या कुटुंबियांना सहकार्य केले जावे , असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

 

पंतप्रधानांना गगनयानबद्दल माहिती देण्यात आली. गगनयानमधील बहुतांश उपकरणे स्वदेशी बनावटीची असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला."जगातील सर्वात मोठ्या तीन अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश होईल त्याच वेळी देशाचे गगनयान देखील देशाच्या अंतराळ क्षेत्राला नवीन उंचीवर नेणार आहे हा सुखावह योगायोग आहे", असे ते म्हणाले.

आज समर्पित केलेल्या प्रकल्पांमुळे नवीन रोजगार तयार होतील आणि भारताची कामगिरी उंचावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारताच्या अंतराळ कार्यक्रमात नारी शक्तीच्या भूमिकेचे कौतुक त्यांनी केले. पंतप्रधान म्हणाले, "महिला शास्त्रज्ञांशिवाय चांद्रयान किंवा गगनयानासारख्या कोणत्याही प्रकल्पाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही". इस्रोमध्ये 500 हून अधिक महिला प्रमुखपदांवर आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

तरुण पिढ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्तीचे बीज पेरणे हे भारताच्या अंतराळ क्षेत्राचे मोठे योगदान आहे हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  इस्रोने मिळवलेले यश आजच्या मुलांमध्ये मोठे होऊन वैज्ञानिक बनण्याची कल्पना रुजवते असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. “यानाची उलटगणती भारतातील लाखो मुलांना प्रेरणा देते आणि आज कागदी विमाने बनवणारे अनेकजण, तुमच्यासारखे शास्त्रज्ञ होण्याची स्वप्ने पाहतात”, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांना संबोधित करताना काढले. युवकांची इच्छाशक्ती राष्ट्राची संपत्ती घडवते, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, चांद्रयान 2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा काळ हा देशातील प्रत्येक मुलासाठी शिकण्याचा अनुभव होता, तर गेल्या वर्षी 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर चांद्रयान 3 यशस्वीपणे उतरण्याने तरुणांना नवीन ऊर्जा दिली.  “हा दिवस आता अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातो”, अशी माहिती त्यांनी दिली. अंतराळ क्षेत्रात देशाने केलेल्या विविध विक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणे, एकाच मोहिमेत 100 हून अधिक उपग्रह प्रक्षेपित करणे आणि पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावरील आपल्या कक्षेत आदित्य एल वन सौर प्रोबचा यशस्वी समावेश करणे या देशाच्या कामगिरीचा त्यांनी उल्लेख केला. खूपच कमी राष्ट्रांनी अशी कामगिरी केल्याचे ते म्हणाले.  2024 च्या पहिल्या काही आठवड्यात साधलेल्या एक्सपो-सॅट आणि इनसॅट-थ्रीडीएसच्या यशाचाही त्यांनी उल्लेख केला.

 

“तुम्ही सर्वजण भविष्यातील संधी-शक्यतांचे नवीन दरवाजे उघडत आहात”, असे पंतप्रधान मोदींनी इस्रो चमूला सांगितले.  अंदाजानुसार, भारताची अंतराळ अर्थव्यवस्था पुढील 10 वर्षांत पाच पटीने वाढेल आणि 44 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. अंतराळ क्षेत्रात भारत जागतिक व्यवसायाचे केंद्र बनत आहे असे पंतप्रधान म्हणाले. येत्या काही दिवसांत भारत पुन्हा एकदा चंद्रावर जाणार आहे.  चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने मिळवण्याच्या नव्या महत्त्वाकांक्षेबद्दलही त्यांनी माहिती दिली. शुक्रावर जाण्याचाही विचार आहे. 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक (स्पेस स्टेशन) असेल असेही त्यांनी सांगितले.  शिवाय, "या अमृत काळामध्ये, भारतीय अंतराळवीर भारतीय यानातून चंद्रावर उतरतील" असे ते म्हणाले.

भारतीय अंतराळ क्षेत्राची 2014 पूर्वीच्या दशकातील आणि गेल्या  10 वर्षातील कामगिरीची तुलना त्यांनी केली. आधीच्या केवळ 33 च्या तुलनेत देशाने गेल्या दहा वर्षात सुमारे 400 उपग्रह प्रक्षेपित केले आणि तरुणांभिमुख अंतराळ स्टार्टअप्सच्या संख्येत पूर्वीच्या दोन किंवा तीन पासून तब्बल 200 पेक्षा अधिकची वाढ झाल्याचा उल्लेख केला. आज त्यांच्या उपस्थितीची नोंद घेत त्यांची दूरदृष्टी, प्रतिभा आणि त्यांच्या उद्योजकतेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. या क्षेत्राला चालना देणाऱ्या अंतराळ सुधारणांनाही त्यांनी भाषणात स्पर्श केला. अंतराळ क्षेत्रात 100 टक्के परदेशी गुंतवणुकीच्या मंजूर केलेल्या थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) धोरणाचा उल्लेख केला. या सुधारणांमुळे, जगातील सर्वात मोठ्या अंतराळ संस्था आता भारतात येऊ शकतील आणि तरुणांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी देऊ शकतील, असे पंतप्रधान म्हणाले.

 

विकसित होण्याच्या भारताच्या संकल्पाचा संदर्भ देत अवकाश क्षेत्राच्या भूमिकेवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. "अवकाश विज्ञान हे केवळ रॉकेट विज्ञान नाही तर ते सर्वात मोठे सामाजिक विज्ञान देखील आहे. अवकाश तंत्रज्ञानाचा समाजाला सर्वाधिक लाभ होतो.  शेतीविषय, हवामान विषयक, आपत्तीचा इशारा, सिंचन विषयक, मार्गदर्शक नकाशे आणि मच्छिमारांसाठी नाविक प्रणाली यासारख्या इतर उपयोगांचा त्यांनी उल्लेख केला. अंतराळ विज्ञानामुळे मिळणाऱ्या सीमा सुरक्षा, शिक्षण, आरोग्य यासारख्या इतर अनेक उपयोगांची माहिती त्यांनी दिली.“विकसित भारताच्या उभारणीत तुम्हा सर्वांचा, इस्रोचा आणि संपूर्ण अंतराळ क्षेत्राचा मोठा वाटा आहे”, असे सांगत पंतप्रधानांनी समारोप केला.

यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केरळचे मुख्यमंत्री  पिनरायी विजयन, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, अवकाश विभागाचे सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष श्री एस सोमनाथ आदी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

देशाच्या अंतराळ क्षेत्रात त्याच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी सुधारणा करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीला आणि या क्षेत्रातील तांत्रिक आणि संशोधन तसेच विकास क्षमता वाढवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला चालना मिळत आहे, कारण त्यांच्या तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्र दौऱ्यादरम्यान तीन महत्त्वाच्या अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्‌घाटन होत आहे.

या प्रकल्पांमध्ये सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथील पी. एस. एल. व्ही. एकत्रीकरण सुविधा (पी. आय. एफ.), महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन संकुलातील नवीन 'सेमी-क्रायोजेनिक्स इंटिग्रेटेड इंजिन आणि स्टेज टेस्ट सुविधा' आणि व्हीएसएस सी, तिरुवनंतपुरम येथील 'ट्रायसोनिक विंड टनेल' यांचा समावेश आहे. अंतराळ क्षेत्रासाठी जागतिक दर्जाच्या तांत्रिक सुविधा पुरविणारे हे तीन प्रकल्प सुमारे 1800 कोटी रुपयांच्या संचयी खर्चाने विकसित करण्यात आले आहेत.

 

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील पी. एस. एल. व्ही. एकत्रिकरण सुविधा (पी. आय. एफ.), पी. एस. एल. व्ही. प्रक्षेपणाची वारंवारता वर्षाला 6 वरून 15 पर्यंत वाढवण्यास मदत करेल. ही अत्याधुनिक सुविधा खाजगी अंतराळ कंपन्यांनी तयार केलेल्या एस. एस. एल. व्ही. आणि इतर लहान प्रक्षेपण वाहनांच्या प्रक्षेपणाची पूर्तता देखील करू शकते.

आय. पी. आर. सी. महेंद्रगिरी येथील नवीन 'सेमी-क्रायोजेनिक्स इंटिग्रेटेड इंजिन आणि स्टेज टेस्ट सुविधा' अर्ध-क्रायोजेनिक इंजिन आणि टप्प्यांचा विकास सक्षम करेल ज्यामुळे सध्याच्या प्रक्षेपण वाहनांची पेलोड क्षमता वाढेल. ही सुविधा द्रवरूप ऑक्सिजन आणि केरोसीन पुरवठा प्रणालींनी सुसज्ज आहे, ज्यामुळे 200 टन घनफूट इंजिनाची चाचणी केली जाऊ शकते.

वातावरणीय व्यवस्थेतील उड्डाणादरम्यान यान आणि विमानांच्या वैशिष्ट्यीकरणाच्या वायुगतिकीय चाचणीसाठी पवन बोगदे आवश्यक आहेत. व्ही. एस. एस. सी. येथे उद्घाटन होत असलेली "ट्रायसोनिक विंड टनल" ही एक गुंतागुंतीची तांत्रिक प्रणाली आहे जी आपल्या भविष्यातील तंत्रज्ञान विकासाच्या गरजा पूर्ण करेल.

पंतप्रधानांनी यावेळी गगनयान मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि नियुक्त अंतराळवीरांना 'ॲस्ट्रोनॅट विंग्ज' अर्थात अंतराळ पंख प्रदान केले. गगनयान मोहीम हा भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम आहे ज्यासाठी इस्रोच्या  विविध केंद्रांवर व्यापक तयारी सुरू आहे.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025

Media Coverage

India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 डिसेंबर 2024
December 24, 2024

Citizens appreciate PM Modi’s Vision of Transforming India