पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या समवेत सिंगापूरमधील सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी एईएम ला भेट दिली. यावेळी त्यांना जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीतील एईएम ची भूमिका, तिचे कार्य आणि भारतासाठीच्या योजना यांबाबत माहिती देण्यात आली. सिंगापूर सेमीकंडक्टर उद्योग संघटनेनें सिंगापूरमधील सेमीकंडक्टर परिसंस्थेचा विकास आणि भारताबरोबर सहकार्याच्या संधी याविषयी थोडक्यात माहिती दिली. या क्षेत्रातील सिंगापूरमधील अन्य विविध कंपन्यांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. ग्रेटर नोएडा येथे 11-13 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या सेमिकॉन इंडिया प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी सिंगापूरच्या सेमीकंडक्टर कंपन्यांना आमंत्रित केले.
भारतात सेमीकंडक्टर उत्पादन व्यवस्था विकसित करण्याचे भारताचे प्रयत्न आणि या क्षेत्रातील सिंगापूरची ताकद लक्षात घेत, दोन्ही देशांनी द्विपक्षीय सहकार्य आणखी विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेच्या दुसऱ्या बैठकीदरम्यान, द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी एक आधारस्तंभ म्हणून सेमीकंडक्टर्सवर लक्ष केंद्रित करून प्रगत निर्मितीची जोड देण्याबाबत उभय देशांमध्ये सहमती झाली. दोन्ही देशांनी भारत-सिंगापूर सेमीकंडक्टर परिसंस्था भागीदारीबाबत सामंजस्य करारही केला आहे.
एईएम येथे दोन्ही पंतप्रधानांनी सिंगापूरमध्ये प्रशिक्षण घेत असलेले ओदिशाच्या जागतिक कौशल्य केंद्रातील भारतीय प्रशिक्षणार्थी तसेच सीआयआय -एंटरप्राइझ सिंगापूर इंडिया रेडी टॅलेंट कार्यक्रम अंतर्गत भारताला भेट दिलेल्या सिंगापूरच्या इंटर्नशी आणि एईएम मध्ये काम करणाऱ्या भारतीय अभियंत्यांशी संवाद साधला.
दोन्ही पंतप्रधानांच्या या भेटीतून या क्षेत्रात सहकार्य विकसित करण्याप्रति दोन्ही देशांची वचनबद्धता अधोरेखित होते. या भेटीत सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान वाँग यांचे आभार मानले.
Semiconductors and technology are important facets of India-Singapore cooperation. This is also a sector where India is increasing its presence. Today, PM Wong and I visited AEM Holdings Ltd. We look forward to working together in this sector and giving our youth more… pic.twitter.com/Bdh8nU1w6Y
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2024
It was wonderful to interact with interns from Odisha’s World Skill Center who are visiting Singapore and interns from Singapore who have been to India as a part of the CII-Enterprise Singapore India Ready Talent Programme. I also met a team of Indian engineers working at AEM… pic.twitter.com/orXSLE1GEk
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2024