महामहिम, अध्यक्ष बायडेन ; दोन्ही राष्ट्रांचे प्रतिनिधी; माध्यम क्षेत्रातील मित्रांनो!
नमस्कार!
सर्वप्रथम, सौहार्दपूर्ण शब्दांबद्दल आणि भारत-अमेरिका संबंधांबाबत व्यक्त केलेल्या सकारात्मक विचारांसाठी मी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे आभार मानतो.
मित्रांनो,
भारत-अमेरिका संबंधांच्या इतिहासात आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आजची आमची चर्चा आणि त्यात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांनी एक नवा अध्याय सुरु केला आहे आणि आमच्या सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारीला एक नवीन दिशा आणि नवी ऊर्जा दिली आहे.
मित्रांनो,
भारत-अमेरिका व्यापार आणि गुंतवणूक भागीदारी केवळ दोन देशांसाठीच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी देखील महत्त्वाची आहे. आज अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. आम्ही व्यापाराशी संबंधित प्रलंबित समस्यांचे निराकरण करून नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. ICET म्हणजेच इनिशिएटिव्ह फॉर क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, आमच्या तंत्रज्ञान विषयक सहकार्यासाठी एक महत्त्वाची व्यवस्था म्हणून उदयास आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स, अंतराळ , क्वांटम आणि दूरसंचार यासारख्या क्षेत्रात आमचे सहकार्य वाढवून, आम्ही एक मजबूत आणि भविष्यवेधी भागीदारी निर्माण करत आहोत. मायक्रॉन , गुगल आणि अप्लाइड मटेरिअल्स सारख्या अमेरिकन कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याचा घेतलेला निर्णय हे या भविष्यवेधी भागीदारीचे प्रतीक आहे.
या भेटीदरम्यान मला अमेरिकेतील इतर काही कंपन्यांच्या सीईओंनाही भेटण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान मला भारताबद्दल उत्साह आणि सकारात्मक दृष्टिकोनही जाणवला. आमची धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी अर्थपूर्ण करण्यासाठी सरकार, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येणे खूप महत्त्वाचे आहे याबाबत आम्ही दोघेही सहमत आहोत. स्वच्छ ऊर्जा संक्रमणामध्ये भारत आणि अमेरिकेच्या सामायिक दृष्टीकोनाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही अनेक महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये हरित हायड्रोजन, पवन ऊर्जा, बॅटरी स्टोरेज आणि कार्बन कॅप्चर यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.
जागतिक अनिश्चिततेच्या काळात, भारत आणि अमेरिका, विश्वासू भागीदार म्हणून, विश्वसनीय, सुरक्षित आणि लवचिक जागतिक पुरवठा साखळी आणि मूल्य साखळी तयार करतील असे आम्ही ठरवले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील घनिष्ठ संरक्षण सहकार्य हे आमच्या परस्पर विश्वासाचे आणि सामायिक धोरणात्मक प्राधान्यक्रमांचे प्रतीक आहे. जुन्या काळातील खरेदीदार-विक्रेता संबंध मागे टाकून आज आपण तंत्रज्ञान हस्तांतरण, सह-विकास आणि सह-उत्पादनाकडे मार्गक्रमण केले आहे. भारतात तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे इंजिन तयार करण्याचा जनरल इलेक्ट्रिकचा निर्णय हा ऐतिहासिक करार आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होतील. यामुळे आगामी काळात आमच्या संरक्षण सहकार्याला नवीन स्वरूप मिळेल. दोन्ही देशांचे संरक्षण उद्योग आणि स्टार्ट अप हे या सहकार्यातील महत्त्वाचे भागीदार आहेत. त्यांना परस्परांशी जोडणे हे आमच्या संरक्षण औद्योगिक आराखड्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आमचे दृढ आणि अनेक वर्षे जुने सहकार्य आहे. आज आम्ही "आर्टेमिस एकॉर्ड्स" मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेऊन आमच्या अंतराळ सहकार्यामध्ये एक मोठी झेप घेतली आहे. थोडक्यात, भारत-अमेरिका भागीदारीला कोणतीही सीमा नाही.
मित्रांनो,
आपल्या संबंधांचा सर्वात महत्वाचा स्तंभ म्हणजे आपल्या देशातील लोकांमधील संबंध. 40 लाखांहून अधिक भारतीय वंशाचे लोक आज अमेरिकेच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत आहेत. आज सकाळी व्हाईट हाऊसमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने भारतीयांची उपस्थिती ही भारतीय अमेरिकन हे आपल्या संबंधांची प्रेरक शक्ती आहेत याचे प्रमाण आहे. हे संबंध आणखी दृढ करण्यासाठी बंगळुरू आणि अहमदाबाद येथे वाणिज्य दूतावास उघडण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्याचप्रमाणे सिएटलमध्ये भारताचे नवीन वाणिज्य दूतावास उघडण्यात येणार आहे.
मित्रांनो,
आजच्या बैठकीत आम्ही अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.हिंद -प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता आणि सुरक्षा ही आमची सामायिक प्राथमिकता आहे. या प्रदेशाचा विकास आणि यश हे संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे आहे यावर आमची सहमती आहे. क्वाड भागीदारांसोबत, आम्ही या प्रदेशातील सर्व देशांसोबत आमचा समन्वय वाढविण्याबाबत विचार सामायिक केले आहेत. दहशतवाद आणि कट्टरतावादाच्या विरोधात भारत आणि अमेरिका खांद्याला खांदा लावून चालत आहेत. सीमेपलीकडील दहशतवाद संपवण्यासाठी ठोस कृती आवश्यक आहे हे आम्ही मान्य करतो. कोविड महामारी आणि युक्रेनमधील युद्धाचा सर्वाधिक फटका ग्लोबल साउथमधील देशांना बसला आहे. या समस्या सोडवण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आमचे मत आहे. युक्रेनमधील संघर्षाला सुरुवात झाल्यापासून भारताने संवाद आणि मुत्सद्देगिरीने हा वाद सोडवण्याचा आग्रह धरला आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व योगदान देण्यास पूर्णपणे तयार आहोत. भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली, आम्ही 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' यावर भर देत आहोत आणि ग्लोबल साउथच्या प्राधान्यक्रमांना आवाज देत आहोत. आफ्रिकन महासंघाला G20 चा पूर्ण सदस्य बनवण्याच्या माझ्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याबद्दल मी अध्यक्ष बायडेन यांचे आभार मानतो.
आपल्या सर्व एकत्रित प्रयत्नांचा मूलमंत्र लोकशाही, लोकशाही मूल्ये आणि व्यवस्था मजबूत करणे हा आहे. जगातील दोन सर्वात मोठी लोकशाही - भारत आणि अमेरिका - एकत्रितपणे जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. मला विश्वास आहे की या मूल्यांच्या आधारे आपण केवळ दोन्ही देशातील लोकांच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करू शकू.
अध्यक्ष बायडेन,
आजच्या फलदायी चर्चेसाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो. या वर्षी जी 20 शिखर परिषदेदरम्यान भारतात तुमचे स्वागत करण्यास संपूर्ण भारत आणि मी वैयक्तिकरित्या उत्सुक आहोत. आणि अध्यक्ष म्हणाले तसे , मला नंतर काँग्रेसला संबोधित करायला जायचे आहे आणि त्यामुळे जास्त वेळ न घेता मी माझे भाषण संपवतो. मी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षांचे आभार मानतो.