"जी -20 बोधचिन्हाद्वारे विश्व बंधुत्वाची कल्पना प्रतिबिंबित होत आहे"
"जी -20 च्या बोधचिन्हामधील कमळ म्हणजे या कठीण काळात आशेचे प्रतीक "
"जी -20 अध्यक्षपद म्हणजे भारतासाठी केवळ राजनैतिक बैठक नव्हे तर ही एक नवीन जबाबदारी आहे आणि भारतावरील जगाच्या विश्वासाचे प्रमाण आहे"
"जेव्हा आपण आपल्या प्रगतीसाठी प्रयत्न करतो, तेव्हा आपण जागतिक प्रगतीचा देखील विचार करतो"
"पर्यावरण हे आपल्यासाठी जागतिक मुद्दा आहे तसेच वैयक्तिक जबाबदारी आहे"
"पहिले जग किंवा तिसरे जग असे न राहता एकच जग असेल असा आमचा प्रयत्न राहील "
"आमचा जी -20 मंत्र आहे - एक पृथ्वी, सर्वांचे एक कुटुंब, एक भविष्य"
“जी -20 फक्त दिल्ली किंवा काही ठिकाणांपुरते सीमित राहणार नाही. प्रत्येक नागरिक, राज्य सरकार आणि राजकीय पक्षांनी यात सहभागी व्हावे”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे भारताच्या जी -20 अध्यक्षपदाच्या बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण केले.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की 1 डिसेंबर 2022 पासून, भारत जी -20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवेल.  देशासाठी ही एक ऐतिहासिक संधी आहे असे ते म्हणाले. जी -20 हा आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा प्रमुख मंच आहे, जो जागतिक जीडीपीच्या सुमारे 85%, जागतिक व्यापाराच्या 75% पेक्षा अधिक आणि जागतिक लोकसंख्येच्या सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो. हा एक महत्त्वाचा प्रसंग असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जी -20 चे अध्यक्षपद ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. जी -20 आणि संबंधित कार्यक्रमांबद्दल वाढती रुची आणि उपक्रमांबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. 

जी-20 बोधचिन्हाच्या अनावरणामध्ये नागरिकांचे योगदान अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की सरकारकडे बोधचिन्हासाठी हजारो अभिनव  कल्पना आल्या . पंतप्रधानांनी सर्वांचे या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि सांगितले की या सूचना जागतिक कार्यक्रमाचा चेहरा बनत आहेत. जी -20 बोधचिन्ह  हे केवळ बोधचिन्ह  नाही, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, हा एक संदेश आहे, एक भावना आहे जी भारताच्या नसानसांत  आहे. ते म्हणाले, “वसुधैव कुटुंबकम’ या माध्यमातून आपल्या विचारांमध्ये सामावलेला हा संकल्प आहे. ते पुढे म्हणाले की,जी 20 बोधचिन्हामधून विश्व बंधुत्वाचा विचार प्रतिबिंबित होत आहे.

यामधील कमळ भारताचा प्राचीन वारसा, श्रद्धा आणि बुद्धिमत्ता यांचे प्रतीक आहे. पंतप्रधान म्हणाले, अद्वैताचे तत्त्वज्ञान सर्व प्राणिमात्रांच्या  एकत्वावर  भर देते आणि हे तत्त्वज्ञान आजच्या संघर्षांचे निराकरण करण्याचे माध्यम असेल. हे बोध चिन्ह आणि संकल्पना  भारतातून अनेक महत्त्वाचे संदेश प्रतिबिंबित  करतात . ते म्हणाले, “युद्धापासून  मुक्तीसाठी बुद्धांचा संदेश, हिंसाचाराविरोधात महात्मा गांधींचे उपाय, जी-20 च्या माध्यमातून भारत त्यांच्या जागतिक प्रतिष्ठेला एक नवी उर्जा  देत आहे”, असे ते म्हणाले.

भारताचे जी -20 अध्यक्षपद हे संकट आणि अनागोंदीच्या काळात येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी अधोरेखित केले की जग शतकात एकदा उदभवणारी   विनाशकारी जागतिक महामारी, संघर्ष आणि कमालीच्या आर्थिक अनिश्चिततेच्या परिणामांना सामोरे जात आहे."जी -20 च्या लोगोमधील कमळ हे अशा कठीण काळात आशेचे प्रतीक आहे," असे ते म्हणाले . जग गंभीर संकटात सापडले असले, तरी ते एक उत्तम स्थान बनवण्यासाठी आपण प्रगती करू शकतो, असे  पंतप्रधानांनी नमूद केले.भारताची संस्कृती अधोरेखित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की ज्ञान आणि समृद्धी या दोन्हीच्या देवता या कमळावर विराजमान आहेत. जी -20 च्या बोधचिन्हामध्ये कमळावर स्थित  पृथ्वीकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले आणि सांगितले की सामायिक ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीवर मात करण्यास मदत करते तर सामायिक समृद्धी आपल्याला शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यास सक्षम बनवते. कमळाच्या सात पाकळ्यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले जे सात खंडांचे  आणि सात सार्वभौमिक संगीत सुरांचे प्रतिनिधित्व करतात. ते पुढे म्हणाले, "जेव्हा संगीताचे सात सूर एकत्र येतात तेव्हा ते परिपूर्ण एकोपा  निर्माण करतात." विविधतेचा आदर करत जगाला सामंजस्याने एकत्र आणणे हे जी-20 चे उद्दिष्ट असल्याचे मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, ही शिखर परिषद केवळ राजनैतिक बैठक नाही. भारत ही एक नवीन जबाबदारी म्हणून स्वीकारत आहे आणि जगाचा भारतावरील  विश्वास म्हणून याकडे पाहत आहे. “आज जगामध्ये भारताला जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची अभूतपूर्व जिज्ञासा  आहे. आज भारताचा एका नव्या दृष्टीने अभ्यास केला जात आहे. आपल्या सध्याच्या यशाचे मूल्यांकन केले जात आहे आणि आपल्या भविष्याबद्दल अभूतपूर्व आशा व्यक्त केल्या जात आहेत”,असे सांगून ते म्हणाले कि “अशा वातावरणात या अपेक्षांच्या पलीकडे जाऊन भारताच्या क्षमता, तत्त्वज्ञान, सामाजिक आणि बौद्धिक सामर्थ्याची जगाला ओळख करून देणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. "आपण सर्वांना एकत्र आणायला हवे आणि जगाप्रति त्यांच्या जबाबदारीसाठी त्यांना जागरूक  केले पाहिजे" असे  ते पुढे म्हणाले.

मोदी म्हणाले की भारताला या टप्प्यावर पोहोचण्यासाठी हजारो वर्षांचा प्रवास करावा लागला आहे. “आपण समृद्धीचा परमोच्च बिंदू पहिला आहे आणि जागतिक इतिहासातला काळाकुट्ट कालखंडही पाहिला आहे. अनेक आक्रमणकर्त्यांचा इतिहास आणि जुलमी राजवटीबरोबर प्रवास करत भारत या जागी पोहोचला आहे. हे अनुभव, आज भारताच्या विकासाच्या प्रवासातलं   सर्वात मोठं बलस्थान आहे. स्वातंत्र्यानंतर आपण सर्वोच्च स्थानाचं लक्ष्य गाठण्यासाठी मोठ्या शून्यापासून सुरुवात केली. यामध्ये गेल्या 75 वर्षांतल्या सर्व सरकारांनी केलेल्या प्रयत्नांचा समावेश आहे. सर्व सरकारं आणि नागरिकांनी भारताला पुढे नेण्यासाठी आपापल्या परीने एकत्रित प्रयत्न केले. याच भावनेने आज आपल्याला सर्व जगाला बरोबर घेण्याच्या उर्जेसह  पुढे जायचं आहे”, ते म्हणाले.

पंतप्रधानांनी भारतीय संस्कृतीने दिलेली मोठी शिकवण अधोरेखित केली “आपण जेव्हा स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतो, तेव्हा जगाच्या प्रगतीचा दृष्टीकोनही ठेवतो”, ते म्हणाले. भारतीय संस्कृतीच्या लोकशाही वारश्यावरही त्यांनी भाष्य केले. त्यांनी निदर्शनास आणून दिले “भारत ही जगातली अत्यंत समृद्ध आणि सळसळती  लोकशाही आहे. आपल्याकडे, लोकशाही या जननीच्या रूपातली मूल्य आणि अभिमानास्पद परंपरा आहे. भारताकडे जेवढी विविधता आहे, तेवढंच वेगळेपणही आहे. “लोकशाही, विविधता, स्वदेशी दृष्टीकोन, सर्वसमावेशक विचारशैली, स्थानिक जीवन पद्धती आणि जागतिक विचारसरणी, आज जग आपल्यापुढील आव्हानांवर या सर्व कल्पनांमध्ये  उपाय शोधत आहे”, ते म्हणाले.

लोकशाही व्यतिरिक्त पंतप्रधानांनी शाश्वत विकास क्षेत्रातील भारताच्या प्रयत्नांच्या  मुद्द्यावरही भर दिला. “आपल्याला शाश्वत विकासाला केवळ सरकारी व्यवस्था नाही, तर वैयक्तिक जीवनाचा LiFE  भाग बनवायचा आहे. पर्यावरण हे आपल्यासाठी जागतिक महत्वाच्या मुद्द्यासह वैयक्तिक जबाबदारी देखील आहे”, पंतप्रधानांनी यावर भर दिला. त्यांनी आयुर्वेदाच्या योगदानावर प्रकाश टाकला आणि योगाभ्यास आणि भरड धान्याबाबत जागतिक उत्साहाची नोंद घेतली.   

पंतप्रधान म्हणाले की भारताने मिळवलेल्या यशाचा जगातील अन्य देश उपयोग करून घेऊ शकतात. विकासामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, समावेशकता, भ्रष्टाचार दूर करणे, व्यवसाय सुलभता वाढवणे  आणि जीवन सुकर करणे  हे अनेक देशांसाठी ठळक मुद्दे ठरू शकतात. जी-20 च्या अध्यक्ष पदाच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचणारे भारताचे महिला सक्षमीकरण, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि, जन-धन खात्याच्या माध्यमातून मिळवलेली आर्थिक समावेशकता यावरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.

जी 7 असो, जी 77 असो की युएनजीए असो, जग आज सामुहिक नेतृत्वाकडे मोठ्या आशेने पाहत आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. अशा परिस्थितीत भारताच्या जी 20 अध्यक्षपदाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. भारत एकीकडे विकसित देशांशी जवळचे संबंध कायम ठेवतो आणि त्याच वेळी विकसनशील देशांचे विचार चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि व्यक्त करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. "याच आधारावर आम्ही अनेक दशकांपासून विकासाच्या मार्गावर भारताचे सहप्रवासी असलेल्या 'ग्लोबल साउथ'च्या सर्व मित्रांसह आमच्या G-20 अध्यक्षपदाचा पथदर्शी आराखडा  तयार करू”, ते पुढे म्हणाले. जगात पहिले अथवा तिसरे जग नसावे, तर केवळ एक जग असावे, या भारताच्या प्रयत्नांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. चांगल्या भविष्यासाठी संपूर्ण जगाला एकत्र आणण्याचा भारताचा दृष्टीकोन आणि समान उद्दिष्ट पुढे नेत पंतप्रधानांनी एक सूर्य, एक जग, शाश्वत उर्जेच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठीची भारताची एक ग्रीड ही घोषणा, आणि एक पृथ्वी, एक आरोग्य ही जागतिक आरोग्य मोहीम याचे उदाहरण दिले. ते पुढे म्हणाले की एक पृथ्वी, सर्वांचे एक कुटुंब, एक भविष्य, हा जी-20 चा मंत्र आहे. “भारताचे हेच विचार आणि मूल्य जगाच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करतात ”, ते पुढे म्हणाले, "मला खात्री आहे की, हा कार्यक्रम केवळ भारतासाठीच संस्मरणीय ठरणार नाही, तर भविष्यात जगाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा प्रसंग म्हणून त्याचे मूल्यमापन होईल."

जी 20 हा केवळ केंद्र सरकारचा कार्यक्रम नाही याकडे लक्ष वेधत सर्व राज्य सरकारांनी आणि राजकीय पक्षांनी या  उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा अशी विनंती पंतप्रधानांनी केली. हा उपक्रम भारतीयांनी आयोजित केला असून अतिथी देवो भव या आपल्या परंपरेची झलक दाखवण्याची महत्वपूर्ण संधी जी 20 च्या माध्यमातून आपल्याला मिळणार असल्याचं त्यांनी म्हटल आहे. जी 20 उपक्रमाशी संबंधित कार्यक्रम केवळ दिल्ली अथवा काही ठिकाणाशी संबंधित नसून देशाच्या कानाकोपऱ्यात आयोजित केले जाणार असल्याचं त्यांनी म्हटल आहे.आपल्या प्रत्येक राज्याची स्वतःची वैशिष्ट्य, वारसा, संस्कृती, सौंदर्य, वलय आणि आदरातिथ्य आहे असं मोदी यांनी सांगितलं. राजस्थान, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या आदरातिथ्याचं उदाहरण देत या ठिकाणांचा पाहुणचार आणि वैविध्याचं जगाला नवल वाटतं असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे

पुढच्या आठवड्यात भारताच्या जी 20 अध्यक्ष पदाची औपचारिक घोषणा होणार असून त्यासाठी आपण इंडोनेशिया इथं जाणार असून भारतातल्या सर्व राज्य आणि राज्य सरकारांनी यामधली आपली भूमिका विस्तारण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. देशातले सर्व नागरिक आणि विद्वानांनी या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी पुढे यावं असं ते म्हणाले. नव्यान सुरू केलेल्या जी 20 संकेतस्थळावर भारत जगाच्या कल्याणासाठी आपल्या भूमिकेची व्याप्ती कशी वाढवू शकेल याबाबत सर्वांनी आपली मतं नोंदवावीत अशी सूचना पंतप्रधानांनी केली आहे. जी 20 सारख्या उपक्रमांच्या यशस्वितेत आपण यामुळे नवीन उंची गाठू शकू असं ते म्हणाले. हा कार्यक्रम केवळ  भारतासाठी संस्मरणीय नसून जागतिक इतिहासात या स्मृती जतन केल्या जातील असं ते म्हणाले.

पार्श्वभूमी          

पंतप्रधानांचा  दृष्टीकोन अंगीकारत  जागतिक पटलावर अग्रेसर भूमिका निभावण्याच्या दृष्टीने भारताचं परराष्ट्र धोरण आकार घेत आहे. भारताला जी 20 अध्यक्ष पदाचा 1 डिसेंबर 2022 रोजी मिळणारा संभाव्य बहुमान या दिशेन एक  महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जी 20 अध्यक्षपदाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडींबाबत जागतिक पटलावर आपली भूमिका जोरकसपणे मांडण्यात योगदान देण्याची अनोखी संधी भारताला मिळणार आहे. आपल्या जी 20 अध्यक्षपदाचं बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळ भारताचा संदेश आणि महत्त्वाकांक्षी प्राधान्यक्रम जगापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जी-20 ही आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याबाबत महत्वपूर्ण परिषद  जीडीपीच्या 85 टक्के, जागतिक व्यापाराच्या 75 टक्के आणि जागतिक लोकसंख्येच्या दोन तृतीयांश घटकांचं प्रतिनिधित्व करते.  जी-20 अध्यक्षपदादरम्यान भारत 32 विविध क्षेत्रांमध्ये देशाच्या अनेक ठिकाणी सुमारे 200 बैठका घेणार आहे. पुढच्या वर्षी होणारी जी 20 परिषद भारताच्या यजमान पदाखाली आयोजित अत्युच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये महत्त्वाची ठरणार आहे.

जी-20 भारत संकेतस्थळ पुढील ठिकाणी उपलब्ध आहे: https://www.g20.in/en/

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi