पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तौते चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज गुजरातचा दौरा केला.पंतप्रधानांनी गुजरातमधील उना (गीर - सोमनाथ), जाफराबाद (अमरेली), महुआ (भावनगर) आणि दीव येथे चक्रीवादळग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.
त्यानंतर, गुजरात आणि दीवमध्ये राबविण्यात येत असलेल्या मदत आणि पुनर्वसन उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी अहमदाबाद येथे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
गुजरात राज्यातील तातडीच्या मदतकार्यासाठी त्यांनी 1,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. त्यानंतर, केंद्र सरकार राज्यातील नुकसानीच्या प्रमाणाचे मूल्यांकन करण्याच्या अनुषंगाने एक आंतर-मंत्रालयीन पथक तैनात करणार असून त्या आधारे पुढील मदत दिली जाईल.
या कठीण काळात, केंद्र सरकार राज्य सरकारच्या बरोबरीने काम करेल, बाधित क्षेत्रातील पायाभूत सुविधांची पुनर्स्थापना आणि पुनर्बांधणीसाठी शक्य ते सहाय्य करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी राज्यातील नागरिकांना दिली.
आपल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी कोविड महामारी संबंधित परिस्थितीचीही माहिती घेतली. राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत प्रशासनाने पंतप्रधानांना माहिती दिली आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनाही सुनिश्चित करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला.
या दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत मुख्यमंत्री श्री. विजय रुपाणी आणि अन्य अधिकारी देखील होते.
पंतप्रधानांनी भारताच्या विविध भागातील चक्रीवादळग्रस्त सर्वांप्रती संपूर्ण ऐक्याची भावना व्यक्त केली आणि आपत्तीदरम्यान आपले नातेवाईक गमावलेल्या कुटूंबियांबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.
केरळ, कर्नाटक , गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यातील आणि दमण आणि दीव ,आणि दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसाला 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली.
पंतप्रधान म्हणाले की, चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार प्रभावित राज्यांच्या सरकारांच्या बरोबरीने काम करीत आहे.
संबंधित राज्य सरकारांनी त्यांचे नुकसानीचे मूल्यांकन केंद्राकडे पाठविल्यानंतर या राज्यांना तातडीने आर्थिक मदतही दिली जाईल.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित वैज्ञानिक अभ्यासाकडे आपण अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.राज्यांतर्गत समन्वय वाढविण्यासाठी तसेच बाधित क्षेत्रातून लवकर स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी दळणवळणाच्या आधुनिक तंत्रांचा वापर करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच बाधित क्षेत्रातील नुकसानग्रस्त घरे आणि मालमत्ता दुरुस्त करण्यासाठी तत्काळ लक्ष देण्यासही त्यांनी सांगितले.