पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर 2023 रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. वाराणसी येथे दुपारी 1.30 च्या सुमाराला पंतप्रधान आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची कोनशिला बसवतील. दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमाराला पंतप्रधान रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संमेलन केंद्र येथे दाखल होतील आणि काशी संसद सांस्कृतिक महोत्सव 2023च्या सांगता समारंभात सहभागी होतील. उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या 16 अटल निवासी शाळांचे ते उद्घाटन करतील. वाराणसी येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम म्हणजे क्रीडा क्षेत्रात जागतिक दर्जाच्या आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला साकार करण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे. वाराणसीमध्ये गंजरी, राजतलब येथे 30 एकर जागेत सुमारे 450 कोटी रुपये खर्चाने हा आधुनिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारला जाणार आहे.
या स्टेडियमच्या रचने संदर्भातली प्रेरणा ही भगवान शिवाकडून घेण्यात आली असून यासाठी विविध प्रकारच्या रचना विकसित केल्या जाणार आहेत, यात चंद्रकोरीच्या आकाराचे छताचे आवरण असेल, त्रिशुळाच्या आकाराचे फ्लड-लाइट (प्रकाश योजना), घाटाच्या पायऱ्यांवर आधारित आसन व्यवस्था, स्टेडियमच्या दर्शनी भागावर बिल्वपत्राच्या (बेलाच्या पानाच्या) आकाराचे धातूचे पत्रे बसवले जातील. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ही 30,000 पर्यंत असेल.
राज्यात दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता अधिक वाढवण्याच्या उद्देशाने, संपूर्ण उत्तर प्रदेशात सुमारे 1115 कोटी रुपये खर्च करून सोळा अटल आवासीय विद्यालय बांधली गेली आहेत. ही विद्यालये केवळ कामगार, बांधकाम कामगार आणि कोविड-19 महामारीमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी सुरू करण्यात आली आहेत. अशा मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि या मुलांच्या सर्वांगीण विकासात मदत करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. यातली प्रत्येक शाळा ही 10-15 एकर परिसरात उभारण्यात आली असून यामध्ये वर्गखोल्या, क्रीडा मैदान, मनोरंजन क्षेत्र, एक मिनी सभागृह, वसतिगृह संकुल, भोजन व्यवस्था आणि कर्मचार्यांसाठी निवासी सदनिका इत्यादी सुविधांचा यात समावेश असेल. या निवासी शाळांमधून प्रत्येकी 1000 विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा मानस आहेत.
काशीचे सांस्कृतिक चैतन्य अधिक प्रभावी करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे काशी संसद सांस्कृतिक महोत्सवाची संकल्पना पुढे आली आहे. या महोत्सवात 17 कलाप्रकारामधील 37,000 हून अधिक कलाकारांचा सहभाग होता, ज्यांनी गायन, वाद्य वादन, नुक्कड नाटक, नृत्य इत्यादीमध्ये आपले कौशल्य प्रदर्शित केले. गुणवंत सहभागींना रुद्राक्ष इंटरनॅशनल कोऑपरेशन आणि कन्वेंशन सेंटर च्या कार्यक्रमादरम्यान त्यांचे सांस्कृतिक कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळेल.