पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला ते आर जे शंकरा नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन करतील. हे रुग्णालय विविध नेत्र विकारांसाठी सर्वसमावेशक वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध करून देईल. रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर दुपारी 4.15 च्या सुमाराला ते वाराणसीमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
संपर्कव्यवस्था वाढवण्यासाठीच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून पंतप्रधान वाराणसीमधील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुमारे 2870 कोटी रुपये खर्चाच्या विमानतळ धावपट्टी विस्तार आणि नव्या टर्मिनल इमारतीची उभारणी तसेच तत्संबंधित कामांच्या प्रकल्पांची पायाभरणी करतील. ते आग्रा विमानतळावरील 570 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या दरभंगा विमानतळावरील 910 कोटी रुपये खर्चाच्या आणि बागडोगरा विमानतळावरील सुमारे 1550 कोटी रुपये खर्चाच्या न्यू सिव्हील एन्क्लेवची देखील पायाभरणी करतील.
पंतप्रधान रेवा विमानतळ, माँ महामाया विमानतळ, अंबिकापूर आणि सरसवा विमानतळावरील 220 कोटी रुपये खर्चाच्या नव्या टर्मिनल इमारतींचे उद्घाटन करतील.
नव्या सुविधांमुळे या विमानतळांची प्रवासी हाताळणीची एकत्रित वार्षिक क्षमता 2.3 कोटी प्रवाशांपेक्षा जास्त होईल. या भागातील वारसा स्थळांमधील सामाईक घटकांपासून प्रेरणा घेत या विमानतळांची अंतर्गत रचना करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रासाठी सर्वोत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनानुसार खेलो इंडिया योजना आणि स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत वाराणसी क्रीडा संकुलाच्या 210 कोटी रुपयांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान करतील.
अनेकविध सुविधा असलेल्या अत्याधुनिक क्रीडा संकुलाची उभारणी करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश असून त्यामध्ये नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स, क्रीडापटूंचे वसतिगृह, क्रीडा विज्ञान केंद्र, विविध खेळांच्या सरावाचे कक्ष, इनडोअर शूटिंग रेंज, कॉम्बॅट स्पोर्ट्ससाठी जागा असतील. 100 मुले आणि मुलींची राहण्याची सोय असलेल्या वसतिगृहाचे आणि डॉ. भीमराव आंबेडकर क्रीडा स्टेडीयम, लालपूर येथे एका सार्वजनिक आसनव्यवस्थेचे देखील ते उद्घाटन करतील.
सारनाथ येथे बौद्ध धम्माशी संबंधित भागांच्या पर्यटन विकास कामांचे देखील पंतप्रधान उद्घाटन करतील. या सुविधांमध्ये पादचारी-स्नेही पथ उभारणी, नव्या मैला वाहिन्या आणि अद्ययावत सांडपाणी वहन प्रणाली, स्थानिक हस्तकला विक्रेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आधुनिक डिझायनर व्हेंडींग कार्ट्ससह ऑर्गनाईज्ड व्हेंडिंग झोन यांचे उद्घाटन पंतप्रधान करतील.
बाणासूर मंदिर आणि गुरुधाम मंदिर येथे पर्यटन विकास कामे, सुशोभीकरण आणि उद्यानांचा पुनर्विकास अशा विविध उपक्रमांचे देखील पंतप्रधान उद्घाटन करतील.